आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीहून हुबळीला जाणारा १३ लाख रुपयांचा गुटखा पाडळसिंगीत पकडला

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
गेवराई पाेलिस ठाण्यामध्ये गुटख्याच्या साहित्याचा ट्रक जप्त करून लावण्यात आला. - Divya Marathi
गेवराई पाेलिस ठाण्यामध्ये गुटख्याच्या साहित्याचा ट्रक जप्त करून लावण्यात आला.
  • संशय आल्याने गस्तीवरील पाेलिसांनी केली ट्रकची तपासणी
  • पहिल्या थरावर फॅनचे बाॅक्स व खाली तंबाखू, सुपारी मटेरियलची पाेती

गेवराई - पहाटेच्या वेळी पाडळशिंगी टोलनाका परिसरामध्ये जास्त मालाची साठवणूक करुन जाणारा दहाचाकी ट्रक दाखल झाला. या ट्रककडे पाहताच महामार्ग पोलिसांना संशय अाला. ट्रक लाेडिंग असल्याने गती कमी हाेती. पाेलिसांनी चालकास ट्रक माेकळ्या जागेत घेण्याचे सांगितले. चालकाकडे चाैकशी केली त्यानेही उडवाउडवी केली अन‌् घाबरलेल्या स्थितीत जाणवताच पाेलिसांनी खाक्या दाखवला अन‌् ट्रकचे फाळके काढण्याचा दम भरला. गुटख्याची तस्करी करणाऱ्या लोकांनी गुटख्याच्या पोत्यांच्या पहिल्या थरावर विविध कंपन्यांच्या फॅनचे बॅाक्स ठेवलेले होते. त्यानंतर खालील सर्व पोत्यांत सुपारीचे मटेरियल व तंबाखूच्या जर्दाची पोती आढळून आली. चाैकशी केली असता दिल्ली येथून हुबळीला जाणारा गुटखा असून ताे सरासरी १३ लाख रुपयांचा असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथून कर्नाटक राज्यातील हुबळी येथे जात असलेला लाखो रुपयांचा विविध कंपनीचा कच्चा माल ( गुटखा) पाडळसिंगी येथे महामार्ग पोलिस गस्त घालत असताना हा गुटखा पकडला. सदरील गुटखा बीड येथील अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन गेवराई पोलिस ठाण्यात आणला. ही कारवाई तालुक्यातील पाडळसिंगी येथे मंगळवारी ( दि.३) करण्यात आली. दिल्ली येथून कर्नाटक राज्यातील हुबळी येथे दहाचाकी ट्रकमधून (एचआर ५५ एई०८०६ ) सुपारी व जर्दा पत्ती या मालाचा गुटखा हुबळी येथे पॅकिंग पुड्या करण्यासाठी संपूर्ण ट्रकमध्ये पोत्यात भरुन चालला होता. मंगळवारी पहाटे गढी येथील महामार्ग ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीणकुमार बांगर व त्यांचे कर्मचारी वाहनांची तपासणी पाडळसिंगी येथील टोलनाक्यावर करत होते. यादरम्यान वरील नंबरच्या ट्रकमध्ये मर्यादेपेक्षा जास्त लोड दिसल्याचे लक्षात आले. या ट्रकची तपासणी करत असताना पोलिसांना संपूर्ण ट्रकमध्ये भरलेल्या पोत्यांवरून संशय आला. 

पाडळसिंगी येथील टोलनाक्यावर हा ट्रक थांबवून बीडच्या अन्न औषध प्रशासन कार्यालयाला ही माहिती दिली. या विभागाचे उपायुक्त ए.बी.भिसे घटनास्थळी आले.पोलिसांकडून सर्व माहिती घेऊन हा गुटख्याने भरलेला ट्रक गेवराई ठाण्यात आणला. शेकडो पोत्यांत भरलेल्या ट्रकमधील गुटख्याची किंमत लावण्यासाठी पोलिस यंत्रणा संबंधित विभागाच्या लोकांसमोर एक पेच निर्माण झाला. ह्या गुटख्याची शेवटपर्यंत किंमत न काढता आल्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाने सॅम्पल काढून संपूर्ण ट्रक सील करुन गेवराई ठाण्यात रीतसर कारवाई सुरू केली. अन्न औषध प्रशासनाच्या मतानुसार हा गुटखा पाच पुड्यांमधील नसल्यामुळे अंदाजे २७ लाख रुपयांचा असू शकतो, तर वाहनाची किंमत १४ लाख, असे ए.बी.भिसे यांनी बोलताना सांगितले. तर या वेळी गेवराई ठाण्यात आलेले व्यापारी संघाचे अध्यक्ष बाळू बरगे म्हणाले की, या गुटख्याच्या पुड्या तयार झाल्या असत्या तर त्यांची किंमत जवळपास दोन कोटींच्या वर गेली असती. गेवराई पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.गेवराई तालुक्यातील सर्वात माेठी कारवाई :


हा चाकांच्या गाडीत असलेल्या व पूर्ण पोत्यात गुटखा असलेला ट्रक गेवराई पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आला आहे.गेवराई तालुक्यात आजवरची गुटख्याची ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा ट्रक बघण्यासाठी गेवराई शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...