Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | gutkha transport sell is crime aurangabad high court

गुटखा विक्रीसह साठवणूक, वाहतूक करणाराही दोषी, हायकोर्टाचा निकाल; आरोपी सुटण्याच्या प्रक्रियेला ब्रेक

प्रतिनिधी | Update - Feb 22, 2019, 08:45 AM IST

2012 पासून आतापर्यंत 141.13 कोटींचा साठा जप्त 

 • gutkha transport sell is crime aurangabad high court

  आैरंगाबाद - भारतीय दंड विधान कायद्याचे कलम ३२८ चा आधार घेत गुटखा साठवणूक व वाहतूक करणारे सुटका करून घेत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी संबंधित कायदा गुटखा विक्री करणारासह त्याची साठवणूक करणारा व वाहतूक करणारा दोषी राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासंबंधी आैरंगाबाद खंडपीठात दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, अशा स्वरूपाचा दिलासा मागणारे अनेक अर्ज मागे घेण्यात आले आहे. अन्न व सुरक्षा कायदा २००६ कलम ३ चा आधार घेत तांत्रिक मुद्दा उपस्थित करून व्यावसायिक यातून सुटका करून घेत होते. परंतु सर्व तरतुदींचा विचार केल्यानंतर खंडपीठाने गुटखा व्याख्येत बसणाऱ्या सर्व पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक यासाठी भादंवि कलम ३२८ लागू राहील, असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी विषारी वस्तू म्हणून गुटखा स्वत:हून इतरांना देत असेल तर त्यालाच दोषी ठरवले जात होते. याचा फायदा घेत आरोपी सुटत होते.


  राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी एक तर स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित किंवा कोणत्याही उक्त अपमिश्रकांसोबत मिसळवली जाते आणि अन्य नावाने चालणारी गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट सुगंधित तंबाखू, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, खर्रा, मावा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी मिश्रणे. ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरीत्या सुलभ होईल, अशा रीतीने विकलेली किंवा वितरित केलेली स्वादिष्ट संबंधित तंबाखू आणि अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखू, गुटखा, पानमसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थ एक उत्पादन म्हणून आवेष्टित केलेले अथवा खुले स्वरूपात विक्री , निर्मिती, साठवणूक , वितरण, वाहतूक यास जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी २० जुलै २०१८ पासून प्रतिबंध घालण्यात आला.


  अन्न सुरक्षा विभागाची कारवाई : अन्न सुरक्षा आयुक्त,अन्न व आैषध प्रशासनाच्या वतीने गुटखा विक्री, साठा व वाहतूक करणारांवर कारवाई करण्यात आली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. निरगुडे यांनी भादंवि ३२८ नुसार कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. या विरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले असता २० सप्टेंबर २०१८ रोजी न्या. एस. ए. बोबडे व एल. नागेश्वरराव यांनी प्रकरण हायकोर्टाकडे पुनर्विचारासाठी पाठवले, खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे यांनी १० जानेवारी २०१७ व ३ ऑक्टोबर २०१८ रोजी साठवणूक व वाहतूक करणारा दोषी असल्याचे स्पष्ट केले. प्रकरण खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर सुनावणीस आले. प्रकरणात गुन्हा दाखल असलेले मनोज बगडिया, तुषार गेडाम, शरद पाटील, सय्यद अय्युब, प्रशांत पाटणी, सय्यद वाजीद सय्यद फारुख, सलीम तांबोळी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्या. व्ही. के. जाधव यांनी साठा, वाहतूक व विक्रीसाठी भादंवि ३२८ लागू होत असल्याचे स्पष्ट नमूद केल्याने सर्वांनी जामिनासाठी दाखल अर्ज मागे घेतले. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील भूषण विर्दे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड.विनायक कागणे, अॅड. पवन लखोटिया, अॅड. अनिल बासरकर यांनी साहाय्य केले.


  २०१२ पासून आतापर्यंत १४१.१३ कोटींचा साठा जप्त
  ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे ऑफ इंडिया यांनी २००९-१० मध्ये ३५ टक्के प्रौढ तंबाखूचा वापर करत असल्याचा अहवाल दिला. राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेच्या अहवालात १६ कोटींपेक्षा अधिक लोक तंबाखूचे सेवन करत असल्याचे म्हटले आहे. राज्यातील २६ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशांनी गुटखा किंवा पानमसाला यावर प्रतिबंध घातला. अन्न व आैषध प्रशासनाने महाराष्ट्रात २०१२-१३ मध्ये २०.७४ कोटींचा गुटखा साठा जप्त केला. २०१३-१४ मध्ये १५.६६ कोटी, १४-१५ मध्ये १७.५३ कोटी, १५-१६ मध्ये २४.३७ कोटी, १६-१७ मध्ये २२.९८ कोटी, १७-१८ मध्ये ३९.८४ कोटी अशा प्रकारे आजपर्यंत १४१. १३ कोटींचा साठा जप्त केला.


  आर्थिक बोजा २२.४ यूएस बिलियन डॉलर
  सन २०११ मध्ये तंबाखू सेवनामुळे १ लाख ४५०० कोटींचा (२२.४ बिलियन यूएस डॉलर) भार देशातील रुग्णांना सोसावा लागला. महाराष्ट्रात २०११ मध्ये २२९० कोटी रुपये खर्च ३५ ते ६९ वयातील वैद्यकीय सेवा तर ३८ टक्के अप्रत्यक्ष रोगग्रस्तांसाठी खर्च केले. कर्करोग, क्षयरोग, हृदयविकार, श्वसनाचे रोगावर ७६९ कोटी खर्च झाले.


  कर्करोगसह अन्य रोगांचे प्रमाण वाढले
  प्रशासनाच्या वतीने खंडपीठात विविध अहवाल सादर केले. गुटखा सेवन केल्याने अॅक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, कोरल सब म्युकस फायब्रोसिस, मुखाचा कर्करोग, ल्युक्योप्ल्याकिया, अन्न नलिकेचा कॅन्सर, पोटाचा कर्करोग, मेटाबाॅलिक अबनॉरमॅलिटी, प्रजनन, स्वास्थ्य, जठर व आतड्यांसंबंधीचे आजार होतात. शासकीय दंत महाविद्यालय नागपूर यांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मुख कर्करोग झाल्याचे ८० टक्के रुग्ण आढळले. टाटा मेमोरियल हाॅस्पिटल मुंबई यांना २०१५ मध्ये तंबाखूमुळे १६९१६ जणांना कर्करोग झाल्याचे अहवालात नमूद केले. हे प्रमाण एकूण कर्क रुग्णांच्या तुलनेत ५६.१९ टक्के (३०१०७ पैकी १६९१६)इतके होते.

Trending