आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेत घरी न गेल्यास पत्नी करेल बॉसकडे तक्रार, कुटुंब-कार्यालयीन कामकाजाचा उत्कृष्ट मेळ साधण्यासाठी एसबीआयचा उपक्रम 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - कुटुंबाला आवश्यक तेवढा वेळ दिला नाही तर चिडचिडेपणा वाढतो. कार्यालयातून घरी जाण्यासाठी उशीर झाल्यास अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडणही होते. या सर्व गोष्टींचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत असतो. ही अडचण लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत आठवड्यातून किमान एक दिवस तरी वेळेवर घरी जाण्याची सूट देण्यात आली आहे. सूट दिल्यानंतरही वेळेवर घरी न पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्याची पत्नी बॉसकडे त्याची तक्रार करू शकते. 

 

कर्मचाऱ्याने कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. "नवी दिशा' या कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या १५०० शाखांमध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली. प्रायोगिक तत्त्वावर ग्वाल्हेरमध्ये ४० पैकी ११ शाखांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात पती-पत्नींमध्ये दररोज भांडण होऊ नये म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवणे किती गरजेचे आहे, हे कर्मचाऱ्यांना समजावण्यात येईल. कुटुंब आणि कार्यालयीन कामकाजाचा उत्कृष्ट पद्धतीने मेळ कसा साधायचा यासंदर्भातील विविध प्रेरणादायी व्हिडिओ दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत पती-पत्नीला दाखवले जात आहेत. ट्रेनरही या वेळी उपस्थित असतात. बँकेत काम करणारा पती जर वेळेवर घरी येत नसेल तर पत्नीला कार्यालयातील वरिष्ठांकडे तक्रार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात पत्नीला एक कोड दिला जातो. स्वत:च्या मोबाइलमध्ये हा कोड स्कॅन करून आपले म्हणणे ती टाइप करू शकते. तक्रार करताना पतीचे नाव आणि त्याचा पीएफ नंबर तिला यात नमूद करावा लागतो. तो मेसेज पाठवताच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत तक्रार पोहोचते. 

 

अधिकारी-कर्मचारी तणावमुक्त राहिले तरच बँकेची प्रगती 
एसबीआयने एक वर्षापूर्वी "वर्क लाइफ बॅलन्स'वर पत्रक जारी केले होते. यात कर्मचाऱ्यांनी वेळेत घरी जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्यासंदर्भात सांगितले गेले होते. बँकेत सध्या सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत काम चालते. परंतु कामाचा भार जास्त असल्याने देशभरातील अधिकारी-कर्मचारी रात्री ९ वाजेपर्यंत काम करत आहेत. "नवी दिशा' या उपक्रमांतर्गत कर्मचारी तणावमुक्त होऊन काम करू शकतील. तसेच कुटुंबालाही पुरेपूर वेळ देता येईल. शिवाय यातून बँकेची प्रगती साध्य होईल, असे ग्वाल्हेरच्या एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव अवधेश अग्रवाल यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...