आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिजवर आरोप निश्चित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई हल्ल्याचा मास्टरमांइड असलेल्या हाफिज सईदला ७ डिसेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले होते. - Divya Marathi
मुंबई हल्ल्याचा मास्टरमांइड असलेल्या हाफिज सईदला ७ डिसेंबरला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

इस्लामाबाद : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला बुधवारी लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून दिल्याच्या प्रकरणात आरोप निश्चित केले आहेत.

वृत्तानुसार लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश मलिक अर्शद भुट्टा यांनी हाफिज सईद तसेच जमात उद दावा या संघटनेशी संबंधित इतर चार जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर न्यायाधीशांनी बुधवारी हाफिज आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाची कार्यवाही गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली.

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाने १७ जुलै रोजी हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात पंजाब राज्यातील अनेक शहरांमध्ये दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून दिल्याच्या आरोपात २३ गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सईदला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदला कडक सुरक्षा व्यवस्थेत कोट लखपत कारागृहात ठेवण्यात आले आहे. शनिवारी या प्रकरणातील एक आरोपी उपस्थित नसल्याने न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

पंजाबचे उपअभियोजक जनरल अब्दुल रउफ यांनी सांगितले की, सईद आणि त्याचे सहकारी दहशतवादाला निधी पुरवण्यामध्ये सहभागी आहेत आणि तसे पुरावेही सादर करण्यात आले. न्यायालयात सुनावणीदरम्यान या वेळी पत्रकारांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

आंतरराष्ट्रीय संस्थांकडून दबाव आल्याने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्कर-ए- तोयबा, जमात-उद-दावा, फलाइ-ए-इन्सानियत फाउंडेशनसारख्या संघटनांची चौकशी केली. जमात-उद-दावा ही संघटना लष्कर-ए-तोयबाचे दुसरे रूप आहे. याच्या संघटनेने २००८ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. या बॉम्बस्फोटात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. यात सहा अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता.

ट्रस्टच्या माध्यमातून कमावला निधी

हाफिज अब्दुल सलमान बिन माेहंमद, मोहंमद अशरफ, जफर इक्बाल यांनाही न्यायालयाने दाेषी ठरवले आहे. आता या सर्वांवर खटला चालवला जाणार आहे. हाफिज सईदवर लाहोर, गुजरानवाला, मुलतान येथून दहशतवादासाठी पैसा गोळा केल्याचा आरोप आहे. त्यात तथ्य दिसून आल्याने त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. त्यांच्यावर बुधवारी आरोपनिश्चिती झाल्यानंतर त्यांना आरोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत. दहशतवादाच्या नावाखाली पैसा गोळा करून त्यांनी स्वत:च्या मालमत्ता वाढवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हाफिज सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अल अनफाल ट्रस्ट, दावातुल इर्शाद ट्रस्ट, मुआज बिन जबाल ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला.