Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Haider found in 20 hours, accused absconding

पळवलेला 'हैदर' २० तासांत सापडला, आरोपी मात्र फरार

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 11:05 AM IST

सकाळी उठल्यावर 'हैदर' नेहमी दारात दिसायचा. परंतु बुधवारी सकाळी ६ वाजता हैदर जागेवर नसल्याने मालक नादिरखान सिलावर खान यां

  • Haider found in 20 hours, accused absconding

    नगर- सकाळी उठल्यावर 'हैदर' नेहमी दारात दिसायचा. परंतु बुधवारी सकाळी ६ वाजता हैदर जागेवर नसल्याने मालक नादिरखान सिलावर खान यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठले. आपला लाडका हैदर जागेवर नाही, त्याला कोणी तरी चोरून नेले असल्याचे खान यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देखील तत्काळ खान यांची फिर्याद नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. अखेर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका शेतात हैदर सापडला. पोलिसांच्या कामगिरीमुळे चोरट्यांच्या हाती लागलेला हैदर सुखरूप परत मिळाल्याने खान सुखावले. हैदर दुसरा-तिसरा कुणी नसून पांढऱ्या रंगाचा एक रुबाबदार व देखणा काटेवाडी जातीचा घोडा आहे.


    टिळक रोड परिसरातील ४८ वर्षीय नादिरखान यांनी हैदरचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. मात्र, सुमारे ५० हजार रुपये किंमत असलेल्या या हैदरला चोरट्यांनी पळवले. सकाळी उठल्यावर हैदर दारात न दिसल्याने मालक खान यांना मोठा धक्का बसला. आपल्या हैदरची कुणीतरी चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी खान यांची फिर्याद रितसर नोंदवून घेतली.


    हैदरचा रंग, त्याची उंची, त्याच्या अंगावरील एखादी खूण अशी प्राथमिक माहिती घेत तपासाला सुरुवात केली. हैदरला नगर शहराबाहेर पळवून नेल्याची शंका पोलिसांना होती. त्यानुसार त्यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अज्ञात चोरट्यांनी हैदरला बालिकाश्रम रोड मार्गे पळवल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. परंतु हैदरला कुठे नेले असेल, याबाबत पोलिस अनभिज्ञ होते. त्यामुळे पोलिसांनी नगर - मनमाड महामार्गावरील देहरे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हैदर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका शेतात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हैदरसह आरोपी कैलास नाना गायकवाड (घुलेवाडी) याला ताब्यात घेतले. एक आरोपी मात्र पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. हैदरला त्याचे मालक खान यांच्या स्वाधिन करण्यात आले. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर भांबरकर, रमेश गांगर्डे, शरद गायकवाड, संदीप गवारे, शाहिद शेख, दीपक केतके यांनी ही कामगिरी केली.

Trending