आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये अघोषित सेन्सॉरशिप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या राजकारणात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या नेत्यांच्या राजकारणाच्या तुलनेत आपल्या राजकारणाला पाकिस्तानातील खासगी पण स्वतंत्र भूमिका मांडणाऱ्या मीडियाने बराच अवकाश प्राप्त करून दिल्याने आपण पंतप्रधान झालो, अशी कबुली इम्रान खान यांनी अनेक वेळा दिली आहे. २००२ मध्ये पाकिस्तानात खासगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या त्या वेळी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या एकाच पक्षाचे उमेदवार म्हणून इम्रान खान कामकाजात भाग घेत असत. आता १६ वर्षांनंतर त्यांना नॅशनल असेंब्लीमध्ये १७६ सदस्यांचा पाठिंबा आहे. इम्रान खान यांचे सुदैव असे  की त्यांच्या मागे पाकिस्तानचे लष्कर व सर्वोच्च न्यायालय उभे आहे. पण पाकिस्तानच्या मीडियात त्यांच्यावर सातत्याने टीका होत असल्याने ते सध्या चिंतित आहेत.

 

नवाझ शरीफ, अासिफ अली झरदारी यांच्यावर मीडियाने केलेल्या टीकेचा फायदा त्यांना झाला होता, पण आता त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला त्यांनी हरकत घेणे हे मला योग्य वाटत नाही.  काही आठवड्यांपूर्वी त्यांनी टीव्हीवरून पाकिस्तानातील कट्टरवादी संघटनांनी कायदे हातात घेऊ नये असे इशारे दिले होते, पण याला २४ तास उलटण्याअाधीच इम्रान यांची भूमिका मवाळ झाली. इम्रान व सर्वोच्च न्यायालय िवरोधी पक्षांवर प्रचंड प्रमाणात दबाव आणत आहेत. पण ज्या कट्टरवादी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची हत्या केली होती, पाकिस्तानच्या लष्कराला बंड करण्याचे आवाहन केले होते त्या कट्टरतावादी संघटनांवर मात्र ही मंडळी दबाव टाकताना दिसत नाहीत. इम्रान खान यांना सत्तेवर येऊन तीन महिने झाले आहेत. या काळातच त्यांनी मीडियाचा पाठिंबा गमावला आहे.

 

आता पाकिस्तानमधील पत्रकार संघटना मीडियावरच्या सरकारच्या अघोषित सेन्सॉरशिपवरून, मीडियाच्या स्वातंत्र्यावर आक्रमण केल्यावरून तक्रार करत आहेत. पाकिस्तानच्या राज्यघटनेतील कलम १९ मध्ये मीडियाला स्वातंत्र्य दिले आहे. त्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यात इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरल्याचे पत्रकार संघटनांचे म्हणणे आहे. 


पाकिस्तानातील पत्रकारिता नेहमी धोकादायक मानली जाते. तीस वर्षांपूर्वी माझे वडील वारिस मीर यांनी मला सांगितले होते की, तू पत्रकार होण्याचा प्रयत्न करू नको. कारण पाकिस्तानात पत्रकार होणे हे जिवाशी खेळण्यासारखे आहे. वारिस मीर लाहोरमधील पंजाब विद्यापीठात पत्रकारिता विभागात अध्यापन करत होते व ते वृत्तपत्रात स्तंभलेखन करत असत. माझ्या महाविद्यालयीन काळात मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी लिहिण्यास सुरुवात केली तेव्हा ते त्याला प्रोत्साहन देत नसत. त्यांनी तत्कालीन हुकूमशहा झिया उल हक यांच्या धोरणांवर टीका केली होती. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्या वेळी ते म्हणत, ‘सरकार माझ्यावर खुश नाही. अनेक कट्टरवादी मंडळी माझ्या मागे दिवस-रात्र लागली आहेत.

 

हे लोक माझी केव्हाही हत्या करू शकतात किंवा ते मला विष देऊन मारू शकतात. या देशात सत्य लिहिणे हे अत्यंत धोकादायक आहे. तू लेखनापासून दूर राहा, जमल्यास क्रिकेटवर लक्ष केंद्रित कर.’ माझ्या वडिलांची अशी मते ऐकून मी हताश होत असे. पण त्यांचे म्हणणे किती खरे होते ते काही महिन्यांतच मला कळून चुकले. एके दिवशी त्यांचा रहस्यमय असा मृत्यू झाला. मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहांगीर यांनी माझ्या वडिलांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करावे, अशी मागणी केली होती, पण काही अधिकाऱ्यांनी काही तासांतच मृतदेहाचे दफन केले. सुदैव वा दुर्दैव म्हणा, मी माझ्या वडिलांचा सल्ला मानला नाही. माझ्या आईच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच मी पत्रकारितेला सुरुवात केली. माझी आई अतिशय धाडसी होती. तिने मलाच नव्हे तर माझ्या छोट्या भावालाही पत्रकार होण्यास प्रोत्साहन दिले.   


गेल्या तीन दशकांतील परिस्थिती पाहता पाकिस्तानातील पत्रकारितेची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आज पाकिस्तानात हुकूमशाही नाही, इम्रान खान लोकशाही मार्गाने पंतप्रधान झाले आहेत. पण प्रख्यात स्तंभलेखक वसातुल्लाह खान यांनी सध्याच्या सरकारपेक्षा हुकूमशहा बरे होते, असे मत लाहोरमधील फैज इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले यावरून कल्पना करता येते. ‘काही वर्षांपूर्वी आम्हाला आमचा शत्रू वा मित्र माहिती असत. आता आम्हाला आमचा शत्रू कोण आहे हेही लक्षात येत नाही. आमचे जीव, आमच्या नोकऱ्या संकटात आहेत.’ 


एक मात्र खरे की गेल्या दशकाच्या तुलनेत मीडियाचा विस्तार झाला आहे. अनेक तरुण मीडियाच्या स्वातंत्र्यावरून व समाजपरिवर्तनाचा एक भाग म्हणून या क्षेत्राकडे आकर्षिले जात आहेत. पण वास्तव असेही आहे की मीडियाला आपल्या स्वातंत्र्याची चांगलीच किंमत चुकवावी लागत आहे. ९/११ च्या घटनेनंतर १२० पत्रकार मारले गेले आहेत. यातील बहुतांश पत्रकारांचे अपहरण करून त्यांची हत्या केली गेली आहे. अनेकदा मारेकरी कोण आहेत हे माहीत असते, पण ही मंडळी कायद्यापेक्षा शक्तिशाली असल्याचे आढळून येते. मी जवळपास डझनभर पत्रकारांना ओळखतो, ज्यांच्यावर पत्रकारिता सोडण्याचा दबाव आणला गेला आहे. त्यांना त्यांच्या गावातून, शहरातूनही बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांनी असे दबाव झिडकारले त्यांची हत्या करण्यात आली. हे वातावरण सेन्सॉरशिपचा कळस आहे. जेव्हा आम्ही मीडियावर दबाव असल्याचा आरोप करतो तेव्हा इम्रान खान व त्यांच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, ‘हा दबाव टाकणारी मंडळी कोण आहेत’ असे विचारतात.

 

काही दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ पत्रकार व निवेदक नुसरत जाविद यांना ‘डॉन’ वृत्तपत्राने राजीनामा देण्यास सांगितले. जाविद हे इम्रान खान यांचे टीकाकार आहेत. डॉनच्या व्यवस्थापनाचे असे म्हणणे आहे की, सरकारने जाहिराती देण्यास बंद केल्याने या वृत्तसमूहाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. दुनय्या टीव्हीतील मोईल पीरजादा यांच्याबाबतीतही असेच घडले. कोणालाही समजत नाही की मीडियावर कोणाचा दबाव आहे. काही दिवसांपूर्वी कराची प्रेस क्लबवर काही बंदूकधाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्याबाबत असे खुलासे झाले की, काही दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकला गेला. दुसऱ्या दिवशी नसरुल्लाह या एका स्थानिक पत्रकाराला विना वॉरंट घरातून उचलून नेले. याला पत्रकारांनी जोरदार विरोध केला असता नसरुल्लाह यांना दहशतवादविरोधी न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

 

नसरुल्लाह यांच्या घरी जिहादी संघटनेचे पत्रक सापडल्याच्या कारणावरून त्यांचा रिमांड मागितला, असे पोलिसांनी सांगितले. सिंधमधल्या पीपीपी सरकारला याची माहिती नाही की नसरुल्लाह यांना अटक करण्याचा आदेश कोणी दिला? डॉनचे ज्येष्ठ पत्रकार सायरिल अल्माडा यांनी नवाझ शरीफ यांची मुलाखत घेतली म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि ही घटना शरीफ यांचे सरकार सत्तेत असताना झाली होता. त्या शरीफ सरकारने या पत्रकाराला मदत केली नाही आताचे इम्रान खान सरकारही ती करत नाही.    


काही जणांना वाटते की, पाकिस्तानमध्ये मीडिया शक्तिशाली आहे. त्यांना असेही वाटते की वृत्तनिवेदक, स्तंभलेखक प्रभावशाली असतात .पण मी अत्यंत साधे जगणेही जगू शकत नाही. माझ्या शरीरात अजूनही दोन गोळ्या आहेत. २०१४ मध्ये कराचीत माझ्यावर ६ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. आज त्या प्रकरणावरून एकालाही अटक करण्यात आलेली नाही. मी बुलेटप्रूफ वाहन व सुरक्षा रक्षकांशिवाय घरातून बाहेर पडू शकत नाही. देशाच्या राजधानीत माझे असे हाल असतील तर देशातल्या शेकडो पत्रकारांची परिस्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी.   


गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानात २६ पत्रकारांची हत्या झाल्याचा अहवाल फ्रीडम नेटवर्क पाकिस्तानने दिला आहे. १६ खटले न्यायालयात आहेत, पण ६ खटल्यांवर सुनावणी सुरू आहे. पत्रकारांचे केवळ जगणेही नाही तर त्यांच्या नोकऱ्याही संकटात सापडल्या आहेत.  
इम्रानवर टीका करणारे ‘वक्त न्यूज’ हे चॅनल बंद केले गेले. भविष्यात काही टीव्ही चॅनलही बंद होतील. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही पत्रकार लढत राहू, आम्ही शरणागती पत्करणार नाहीत. ३० वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी मला पत्रकारितेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला माझ्या मुलीला देण्याचे माझ्या मनात आहे, पण ती हा सल्ला मानणार नाही. पाकिस्तानमधील नवी पिढी अघोषित सेन्सॉरशिपला स्वीकारणार नाही. इम्रान खान मीडियाच्या पाठीशी उभे राहणार नसतील तर इतिहासात त्यांची नोंद लोकशाहीविरोधी शक्तींचा गुलाम अशीच राहील.

 

हामिद मीर
कार्यकारी संपादक जिओ टीव्ही 
Twitter : @HamidMirPAK

बातम्या आणखी आहेत...