आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांना मिळणार 6 हजार मदतनीस भत्ता; 3500 रुपयांनी झाली वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विशेष शैक्षणिक गरजा (दिव्यांग) असणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासन दरमहा दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतनीस भत्ता देते. यंदाच्या वर्षापासून भत्त्यात वाढ करण्यात आली असून या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ६०० रुपयांप्रमाणे वार्षिक ६००० हजार रुपये मदतनीस भत्ता दिव्यांगांना मिळणार आहे. पूर्वी प्रतिमाह २५० रुपयांप्रमाणे वार्षिक २५०० रुपये मदतनीस भत्ता मिळत होता. आता त्यात ३५०० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. याशिवाय दिव्यांग मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखणे आणि पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा २०० रुपयांप्रमाणे वार्षिक २००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

 

दिव्यांग मुले स्वत:हून शाळेत येण्या-

जाण्यासाठी सक्षम नसतात. पालक किंवा स्वयंसेवकांच्या माध्यमातून ते शाळेत येतात. ते नियमित शाळेत यावेत आणि शिक्षणाविषयी आवड टिकवून ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरमहा प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. आता मदतनीस भत्त्यात झालेली वाढ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आधार देणारी आहे. शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि सवलती महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या समावेशित शिक्षण अंतर्गत देण्यात येतात. अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल पुस्तिका तसेच अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी ठळक अक्षरातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. तसेच लो व्हिजन साहित्यही त्यांना उपलब्ध करून दिले जाते. शिवाय वेळोवेळी आरोग्य तपासणी, अपंगत्व निदान व उपचारात्मक शिबिर, दृष्टी व श्रवण मूल्यमापन, मानसशास्त्रीय मूल्यमापन नियमित व विनामूल्य केले जाते, असे समावेशित शिक्षणचे समन्वयक अविनाश शिंदे यांनी सांगितले. 

 

शहरात २०६५ दिव्यांग विद्यार्थी 
सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या हद्दीत महापालिकेच्या ५९ शाळांसह एकूण ४१९ शाळा आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते बारावीत २०६५ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात अंशत: अंध ६६३, कर्णबधिर ३३७, मतिमंद २३४, अस्थिव्यंग २०७, अंध १६४, वाचादोष १२६, मानसिक आजार ९१, अध्ययनअक्षम ११३, सेरेब्रल पाल्सी ३८, स्वमग्न १४, बहुविकलांग ६२, शारीरिक वाढ खुंटणे ५, मस्क्युलर डिस्ट्रॉफी ९ आदी २०६५ दिव्यांगांचा समावेश आहे.

 

महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने दिव्यांगासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतनीस, प्राेत्साहन भत्ता व इतर योजनाची अंमलबजावणी होते. दिव्यांग मुले अपंगत्वामुळे शाळाबाह्य राहू नयेत. त्यांच्यासाठी आवश्यक सहाय्यभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते. - सुधा साळुंखे, प्रशासनाधिकारी 

 

बातम्या आणखी आहेत...