आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवे वर्ष - नवे विधान!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅन विदाउट थॉट्स इज, मॅन विदाउट लाइफ... म्हणजेच विचार न करणारी माणसे चालत्या-फिरत्या पार्थिवासारखी असतात. व्यवस्थेला अशी सुस्थापित "डेड' माणसे हवी असतात, ती मिळत राहावी यासाठी ही व्यवस्था मोफत डेटापासून मोफत घरांपर्यंतच्या नाना क्लृप्त्या लढवत असते. तिचा कावेबाजपणा ओळखून सामान्य वाचकाचे विचारांच्या अंगाने सबलीकरण घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न आजवर "रसिक'ने  केले आहेत. नवे वर्षही त्याला अपवाद नसेल... 

 

प्रिय वाचकहो,

नववर्षाभिनंदन!
सत्ता मग ती डावी असो वा उजवी, जन्मत:च असुरक्षित असते. किंबहुना, असुरक्षितता, ‘इनसिक्युरिटी’ हेच तिचं व्यवच्छेदक लक्षण असते. याच लक्षणाला अनुसरून दरदिनी तिची पावले पडत असतात. सशस्त्र उठावाची, प्रासंगिक बंडाची या सत्तेला फारशी तमा नसते, तिला कायमस्वरुपी भय असते, ते विचारांचे, त्या विचारांना मूर्त रूप देणाऱ्या विविध क्षेत्रांतल्या बुद्धिवंतांचे. असे विचारांचे भय वसाहतवादी ब्रिटिशांनाही होते, आणि आजच्या नव-भांडवलशाहीवादी सत्तेलाही आहे. तेव्हा खुद्द गांधीजी होते आता त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे असंख्य धैर्यशील  आहेत. त्याचमुळे बुद्धिवंतांना खलनायक ठरवणे, त्यांच्यावर गुन्हेगारी शिक्का मारणे, त्यांचे खच्चीकरण होईल, अशारितीने राजकीय कारस्थानाला कायद्याचे वेष्टन घालून पूर्णत्व देणे, असे प्रकार तेव्हाही घडत होते, आजही घडत आहेत. पण तरीही विचार संपलेले नाहीत, ते काही काळापुरते दबले गेले असतील, पराभूत झालेले नाहीत.

 

याच मानवतावादी,समताकेंद्री आणि मुख्य म्हणजे लोकशाहीवादी शाश्वत विचारांची "रसिक' पुरवणीने धैर्य एकवटून प्रारंभापासूनच कड घेतली. तसे करण्यात प्राथमिक आणि अंतिम उद्देश एकच होता, वंचिताचे भागधेय वाट्याला आलेल्या अगदी तळाच्या माणसास जगण्याचे बळ देणे, त्याला त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देत, त्याच्यामध्ये उद्याच्या आशा जागवणे. त्या उद्दिष्टाचा एक नवा टप्पा, नव्या वर्षापासून सुरू झाला आहे. स्मरणरंजनात मग्न होत, आत्मप्रेमाचे शब्दसोहळे साजरे करत आपल्याच अभिजनी थाटात मळलेल्या वाटांवरून गोंगाट करत जाणे आम्ही यापूर्वीही नाकारले होते. येत्या वर्षातही धाडसाने नाकारणार आहोत. तीच हिंमत राखून नव्या वर्षाच्या पुरवणीची रचना करण्यात आली आहे. त्याच आत्मविश्वासाने मराठीच्या विचारविश्वात प्रभाव राखून असलेल्या नाटककार-कथाकार जयंत पवारांपासून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संशोधन केलेल्या नवतरुण राही श्रु. ग.पर्यंतच्या नव्या-जुन्या पिढीतल्या बुद्धिवंतांना साद घातलेली आहे. आमच्यादृष्टीने ‘रसिक’ हा केवळ साप्ताहिक उपचार कधीच नव्हता, ते एक विधान, म्हणजेच ‘स्टेटमेंट’ होते. यंदाच्या वर्षात नामवंत लेखक-लेखिकांच्या साथीने या विधानाला अधिक धार येईल, ते अधिक ठसठशीत होत जाईल. सत्ताबदल हा राजकीय पक्षांचा उद्देश असेल तर विचारांतून व्यवस्थाबदल हा हेतू ‘रसिक’ने नेहमीच डोळ्यांपुढे ठेवला असल्याने   प्रवाहाबाहेरच्याआशय-विषयांची जाणीवपूर्वक मांडणी केली जाईल.

 

मॅन विदाउट थॉट्स, इज मॅन विदाउट लाइफ... म्हणजेच विचार न करणारी माणसे चालत्या-फिरत्या पार्थिवासारखी असतात. व्यवस्थेला अशी सुस्थापित "डेड'माणसे हवी असतात, ती मिळत राहावी यासाठी ही व्यवस्था मोफत डेटापासून मोफत घरांपर्यंतच्या नाना क्लृप्त्या लढवत असते. व्यवस्थेच्या फाश्यात अडकलेल्या अशा माणसांना प्रश्न पडत नाहीत, अन्यायाविरोधात जाब विचारण्याचा त्यामुळेच प्रश्नही उद्भवत नाही. मात्र,  राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-कलाविषयक घटितांमागचे प्रभाव-परिणाम उलगडून सामान्य वाचकाचे विचारांच्या अंगाने सबलीकरण घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न आजवर "रसिक'ने  केले आहेत. नवे वर्षही त्याला अपवाद नसेल.

 

अर्थातच, नवे वर्ष सत्तासंघर्षाचा बिगुल वाजवतच उगवले आहे. सत्ताधाऱ्यांनी जागोजागी धर्मव्यवस्थेच्या प्रभावाची नेपथ्यरचना केलेली आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कुंभमेळ्यापासून कोर्टापर्यंत आणि सोशल मीडियापासून सिनेमांपर्यतच्या परिघात पटकथा रचणे सुरु झाले आहे. स्वत:ला "स्टेट्समन' म्हणवून घेणारा सर्वोच्च नेताच चिखलफेकीत अग्रेसर आहे. विरोधकांचे विस्कटणे थांबलेले नाही. सत्तासंघर्षाच्या या धुमश्चक्रीत विचारांचे महत्त्व म्हणूनच अनन्यसाधारण असणार आहे. आताचा काळ हा गरज असो वा नसो, सर्व काही विकण्याचा- विकत घेण्याचा काळ आहे. ऑनलाइन-ऑफलाइन लोक काही ना काही विकत आहेत. ‘बेचो... बेचते रहो’ हा या घडीचा बाजारमंत्र आहे. आजची बाजारव्यवस्था सत्ताधाऱ्यांच्या मदतीने आधी विचारांची कोंडी करून मग ते विचार इतर वस्तूंप्रमाणे ‘सेल’मध्ये विकण्याच्या, पर्यायाने त्याचे महत्त्व कवडीमोल ठरवण्याच्या प्रयत्नांत आहे. अशा आव्हानात्मक समयी सुजाण वाचक या नात्याने तुमची साथसोबत महत्त्वाची ठरणार आहे. अर्थातच या आधीही ती पुरेपूर लाभली आहे,  यापुढेही ती मिळत राहो, ही मनोमन इच्छा आहे.  
पुन्हा एकदा सर्व वाचकांना नव्या वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
- संपादक