आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरार.. हेलकावणाऱ्या विमानाचे औरंगाबादेत हार्डलँडिंग, प्रवाशांचा हृदयाचा ठोका चुकला, भुजबळही होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मुंबई-औरंगाबाद मार्गावरील जेट विमानात प्रवाशांनी उड्डाणानंतर अनुभवला भयंकर थरार

- सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप, तिघांना उलट्या, डॉक्टरला श्वसनाचा त्रास
- मुंबईहून निघाल्यानंतर वीस मिनिटांनी खराब हवामानामुळे विमान हेलकावल्याची माहिती

 

औरंगाबाद- जेट एअरवेजचे मुंबईहून निघालेले विमान उड्डाणानंतर वीस मिनिटांनी अचानक हेलकावे खाऊ लागले. विमान हवेत वेगाने खाली येत असल्याची जाणीव होताच आम्हा प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले. काही वेळाने पुन्हा ठरावीक उंची गाठून विमान स्थिरावले आिण दहा मिनिटांच्या या थरारक अनुभवानंतर प्रवाशांचा जीव कसाबसा भांड्यात पडला. पण हा थरार एवढ्यावरच थांबला नाही. औरंगाबादेत पुन्हा तोच अनुभव...धावपट्टीवर उतरताना जोरदार धक्के बसू लागले. यात एका प्रवाशाचे डोके आदळले, काहींना उलट्यांचा त्रास झाला आणि अखेर कसेबसे विमानाचे हार्ड लँडिंग झाले. या विमानात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत इतर प्रवाशांसोबत ते देखील बालंबाल बचावले.


शुक्रवारी मुंबईहून सायंकाळी ४.४६ वाजता निघालेल्या या विमानातील प्रवासी प्रिया जैस्वाल (रा. टीव्ही सेंटर चौक, हडको) यांनी दिव्य मराठी कार्यालयात येऊन सांगितलेला हा थरारक अनुभव त्यांच्याच शब्दांत...


विमान वेगाने खाली येऊ लागले आणि हृदयाचे ठोके चुकले
मुंबईतून विमानाने उड्डाण घेतले आणि वीस मिनिटांनंतर अचानक हेलकावे सुरू झाले. प्रवासी घाबरलेले होते. या अवस्थेत खाद्यपदार्थांची पाकिटे देण्यात आली. प्रवाशांनी एक-दोन घास घेतले असतील... इतक्यात विमान वेगाने खाली येऊ लागले. मला तर वाटले विमान आता कोसळते की काय? एक-दीड मिनिटांनी विमान त्याच अवस्थेत पुन्हा वरती येऊ लागले. हवामान खराब असल्याची सूचना विमानात देण्यात आली आिण प्रवासी जोरजोरात ओरडू लागले. यातच एका प्रवाशाचे डोके लगेच बॉक्सवर आदळले. बॉक्सचा बाहेरील भाग तुटला. तिघांना उलट्या झाल्या. एवढे सगळे होत असताना एअर होस्टेस फिरकल्या नाहीत हे विशेष. चिकलठाणा विमानतळावर हार्ड लँडिंग झाल्यावर उलट्याचा त्रास झालेल्या तिघांवर उपचार करण्यात आले. 

 

डॉक्टरला श्वसनाचा त्रास
अचानक घडलेल्या या प्रकाराने  बंगळुरू येथून आलेल्या एका ईएनटी तज्ज्ञ डॉक्टरांना श्वसनाचा त्रास झाला.त्यांनी जेट व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात प्रथमोपचार करुन नंतर सुटी देण्यात आली. उलट्या झालेल्या प्रवाशांनी मात्र काेणतीही तक्रार केली नाही.


हे असू शकते कारण
सूत्रांनुसार, वातावरण खराब असल्याने विमान हेलकावले. चालकाच्या तांत्रिक चुकीमुळे हार्ड लँडिंग झाले. रँपलिंगवर चाक आदळले किंवा रनवेच्या किंचित पुढे गेल्यावर ब्रेक लावल्याने हे घडले असावे. जेट एअरवेजचे चिकलठाणा विमानतळावरील समन्वयक स्वामिनाथन म्हणाले की, असे काहीही झालेच नाही. प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या काही लोकांना उलट्या होतात. अनवधानाने एखाद्याचे डोके समोरच्या आसनावर आदळूही शकते. परंतु जखम होण्याइतकी दुखापत होत नाही.

बातम्या आणखी आहेत...