Home | Maharashtra | Mumbai | Harisals problem will be solved said by Vinod Tawade

हरिसालमध्ये उत्तम डिजिटल व्यवस्था, त्रुटी असल्यास दूर करू : विनोद तावडे

विशेष प्रतिनिधी | Update - Apr 17, 2019, 09:58 AM IST

डिजिटल गावाची राज यांनी केली होती पोलखोल

 • Harisals problem will be solved said by Vinod Tawade

  मुंबई- हरिसाल गावाच्या प्रगतीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोटे आहेत. तेथील शाळांमधील संगणकांची व्यवस्था उत्तम आहे. मुलांना इंटरनेटचे ज्ञान आहे. तेथे एटीएमचा नियमित वापर होतो. प्रत्येकाला तज्ज्ञ डॉक्टरच्या सेवा दिल्या जातात. वायफायला तिथे २ एमबीपीएसचा स्पीड असून काही तांत्रिक कमतरता असल्यास त्या दूर केल्या जातील, असे स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी मंगळवारी दिले. दोन दिवसांपूर्वी सोलापूरात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी सरकार करत असलेली हरिसालची “डिजिटल’ गावाची जाहिरात आणि तेथील वस्तुस्थितीची पोलखोल केली होती. या जाहिरातीतील मॉडेललाही त्यांनी भरसभेत लोकांसमोर आणले होते.


  यावर पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गुफ्तगू करण्यासाठी मार्ग बदलून सोलापूरला आले. कदाचित मनसेच्या टुरिंग टॉकिजच्या पुढच्या शोची स्क्रिप्ट देण्यासाठीच पवारसाहेबांनी तसे केले असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या प्रचारसभांचा खर्च भाजप पक्षखर्चात धरला जातो.निवडणूक आयोगाला त्याची पूर्ण माहितीही देण्यात येते. पण राज ठाकरे हे नेमक्या कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत हे त्यांनी सांगावे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानपदी मोदी पुन्हा आले तर आमचे काही खरे नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचीच ही लढाई असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर तावडे म्हणाले, त्यांचे प्रदेशाध्यक्ष लढायला तयार नव्हते. आमदारही तोंडदेखले काम करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असेच चित्र यामुळे अधोरेखित होते.


  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या त्या जाहिरातीविरोधात तक्रार
  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एक जाहिरात केली आहे. त्यात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर सरकार त्याच्या कुटुंबीयांना १० रुपयांचा धनादेश देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुळात १० रुपयांची मदत एकाही मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना देण्यात आलेली नाही. तसेच सरकार मदत धनादेशाने करते की आरटीजीएसने हेदेखील यांना माहिती नाही. ही जाहिरात पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याने तिच्यावर तत्काळ बंदी घालण्यात यावी आणि संबंधितांवर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केल्याचेही तावडे यांनी सांगितले.

Trending