पराभवानंतर निराशा / भाजपला हरवायचे काम काँग्रेसने स्थानिक पक्षांना सोपवले आहे का? प्रणव मुखर्जी यांच्या कन्येनी उडवली खिल्ली

  • चिदंबरम यांचे आपच्या बाजूने ट्विट, माजी राष्ट्रपती कन्या नाराज
  • चाको यांचा राजीनामा, शीला दीक्षित यांना धरले जबाबदार

दिव्य मराठी नेटवर्क

Feb 13,2020 09:25:00 AM IST

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये उदासीनता आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने ट्विट केले. चिदंबरम यांनी म्हटले की, दिल्लीच्या लोकांनी भाजपच्या फुटीर आणि धोकादायक अजेंड्याला पराभूत केले. मी दिल्लीकरांना सलाम करतो. ज्यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये इतर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी उदाहरण दिले आहे. यावर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करत चिदंबरम यांची खिल्ली उडवली. शर्मिष्ठा यांनी लिहिले आहे की, सर, मला माहिती करून घ्यायची अाहे की, काँग्रेसने भाजपला हरवायचे काम स्थानिक पक्षांना सोपवले आहे का? जर नाही, तर आपण आपल्या पराभवावर चिंता व्यक्त करण्याऐवजी आपच्या विजयात आनंद का मानतोय? दिल्लीतील पराभवानंतर पी. सी. चाको यांनी काँग्रेस प्रभारी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी सांगितले की, २०१३ मध्ये शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तेव्हापासूनच काँग्रेसच्या पतनाची सुरुवात झाली होती. आपने काँग्रेसचे मतदार हिरावून घेतले.

आप | केजरीवाल सरकारात पहिल्यांदाच राघव चढ्ढा, आतिशी बनू शकतात मंत्री

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन कायम राहतील. तसेच दोन नवे चेहरे राजेंद्रनगरातून विजयी राघव चढ्ढा आणि कालकाजीतून विजयी आतिशी यांना मंत्रिमंडळात जागा मिळू शकते. हे दोन्ही आपचे महत्त्वाचे सदस्य आहेत. आतिशींना शिक्षणमंत्री केले जाऊ शकते. दिल्लीचा अर्थसंकल्प तयार करण्यात राघव सरकारची मदत करत असतात.

भाजप : तिवारी यांची राजीनाम्याची तयारी; विजयवर्गीय-हनुमान चालिसा शिकवा

> दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले. अाम्ही मूल्यमापन करू. आपण कधी कधी निराश होतो, मात्र कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची तिवारी यांनी कार्यालयात भेट घेतली.


> भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांच्या ट्विटवर म्हटले आहे की, आता हनुमान चालिसा शाळा, मदरशांमध्ये शिकवणे आवश्यक आहे.

X
COMMENT