आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांप्रती अशी संवेदनशीलता दाखविणारा जिल्हाधिकारी आपण पाहिलात का ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा - आपल्या जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता सुरु असलेल्या दौऱ्यादरम्यान शासकीय सोपस्कार व आपण जिल्हाधिकारी असल्याची बाब बाजुला सारुन ते स्वतःच शेतात येतात आणि हातात फावडा घेऊन काम देखील करतात. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता, संवेदनशीलता दाखवणाऱ्या जिल्हाधिकारी यांचे नाव शिव प्रसाद नकाते असे आहे. ते श्रीगंगानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील उपळाई (बुद्रूक) गावचे रहिवासी असलेले शिवप्रसाद नकाते हे आपल्या पथका समवेत नुकसान झालेल्या शेताची पाहणी करत होते. या दरम्यान नकाते यांनी एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्याच्या हातातील खोरे घेत पाण्यात उतरुन पिकांना पाणी दिले. पाण्यापासून वंचित व दुष्काळी पट्टा अशी या जिल्ह्याची ओळख.


श्रीगंगानगर जिल्ह्यातील भारत-पाक सीमेलगत असलेल्या अनुपगढ या भागातील शेतावर टिड्डी रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. टिड्डी हा किटक असुन तो पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर या भागात येतो. या किटक रोगाचा प्रतिबंध  घालण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढे सरसावले आहे.

जिल्हाधिकाऱ्याला आपल्या शेतात काम करताना पाहून शेतकरी भारावला


नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना रस्त्याच्याकडेला एक शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असल्याचे नकाते यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आपल्या गाड्यांचा ताफा त्या शेतकऱ्याच्या शेताच्या दिशेने वळवला. टिड्डी किटकांचा पिकांवर प्रादुर्भाव सुरू असताना देखील शेतकऱ्यांची पिके जोपसण्यासाठी सुरू असलेली त्यांची तळमळ व धडपड बघून शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवप्रसाद नकाते यांनी आपल्याला जीवनात कठीण परिस्थितीची जाण राखत आयएएस अधिकारी होण्यापूर्वीचा काळ त्यांना आपसुकच जागृत झाला. अन् त्या शेतकऱ्याच्या हातातील फावडे (खोरे) घेऊन शेतातील पिकांस पाणी देण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी आपल्या शेतात पाण्यात उतरून हातात (फावडे) खोरे घेऊन पाणी देत असल्याचे पाहून तो शेतकरी भारावून गेला.

 

प्रशासनाबद्द्ल आत्मियता निर्माण व्हावी


माझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आहे. मी शालेय वयाच्या कालावधीत वडिलांसोबत शेतातील कामे व पाणी द्यायला जात असायचो. मी हे भोगलंय. शेतकरी व प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद व्हायला हवा. प्रशासनाबद्द्ल सर्वांच्या मनात आत्मियता निर्माण व्हावी. या हेतुनेच मी शेतात जाऊन काम केले. यातुन फार मोठे समाधान व आनंद वाटला - जिल्हाधिकारी शिव प्रसाद नकाते