आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटार हे यशाचे आणि पायी चालणे हे गरिबीचे चिन्ह नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

गेल्या सोमवारी मी छत्तीसगड सरकारच्या कार्यक्रमासाठी रायपूरला गेलो होतो. मोकळ्या वेळेत तिथल्या थिएटरमध्ये एक विनोदी चित्रपट पाहत असताना शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने सर्वांना संताप आणला होता. चित्रपट अर्धा झाला आणि त्याचा मोबाइल वाजू लागला. समोर पडद्यावर चित्रपट रंगात आलेला असताना तो मोबाइलवर धुसफुसत होता. त्याचा आवाज आजूबाजूच्या सर्वांना ऐकू येत होता. लोक त्याच्यावर चिडले होते, पण कोणाचे त्याला बोलायचे धाडस नव्हते. कारण तो माणूस रायपूरमधील तथाकथित “रिच क्लास’चा होता. संपूर्ण चित्रपटाच्या कालावधीत त्याने तीन वेळा अशा प्रकारे आपला मोबाइल वार्तालाप चालू ठेवला होता. चित्रपट संपत असतानाच तो मोबाइलवर बोलत बोलतच उठला आणि मला जाण्यासाठी जागा मागू लागला. शेवटी माझाही संयम संपला आणि त्याला म्हणालो, “”एक्सक्यूज मी, पुढच्या वेळी चित्रपट पाहायला येताना आपला मोबाइल बंद ठेवला तर सर्वांवर मोठी कृपा होईल.’ पण माझ्या या बोलण्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण कोणाशी तरी तावातावाने बोलण्यात तो इतका बेपर्वा होता की, ताे माझ्या पायावर पाय देऊन निघून गेला, शिवाय माफीही मागितली नाही. काही वेळानंतर मी थिएटरबाहेर आलो आणि माझ्या हॉटेलकडे चालू लागलो. तेव्हा एक मोटार जवळपास “ओरडत’ माझ्या मागे आली. ती लिमोझिन कार होती. त्या मोटारीची विंडो ग्लास खाली आली तेव्हा मी पाहिले की, ड्रायव्हिंग सीटवर थिएटरमध्ये मोबाइलवर जोरजोराने बोलणारा माणूसच बसला होता. मला पाहून तो म्हणाला की, “हॅलो, आमच्यासारख्या कामात गर्क असणाऱ्या लोकांना काय करावे लागते ते तुम्हाला माहीत आहे का? ते ठीक आहे, पण तुम्ही मला आत थिएटरमध्ये काय म्हणाला होता?’ मी त्याला आत जे बोललो, त्याचा पुनरुच्चार केला. ते ऐकून त्याने मला असे डोळे वटारले की जणू मी त्याच्यावर बाॅम्बच टाकला आहे. नंतर मग तो म्हणाला, “सगळ्या जगाला सुधारायला जाऊ नका, त्यापेक्षा जीवनात काही कमाई करा.’ मी त्यास मोठ्या विनम्रतेने उत्तर देत म्हणालो की, “”महागडी कार म्हणजे तुमच्या यशाचे आणि माझे पायी चालणे हे गरिबीचे चिन्ह नाही.’ हे ऐकून त्याने तोंड वाकडे केले आणि वेगाने निघून गेला. या घटनेनंतर मी हॉटेलवर आलो आणि ग्लासभर हळद घातलेले दूध मिळण्यासाठी उशीर झाल्याबद्दल हॉटेल स्टाफवर राग काढणार होतो. पण डोके शांत ठेवले आणि लक्षात आले की थिएटरात भेटलेल्या त्या असभ्य माणसाने माझा मूड खराब केला आणि त्याचा राग मी इतरांवर काढायला निघालो होतो. यानंतर मी शांत झालो. जवळ भरपूर पैसा असलेल्या अनेक लोकांना मी भेटलो आहे. हे लोक स्वत:च्या सुखासाठी बराच पैसा खर्च करू शकतात, पण तरीही ते तणावात बुडालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला असे लोक पाहिले आहेत की, त्यांना मॉलमध्ये, मल्टिप्लेक्स थिएटरांमध्ये पैसे खर्च करणे जमत नाही आणि ते कमी दरातील मॉर्निंग शो पाहण्याचा विचार करत असतात. तरीही हे लोक प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. या विरोधाभासाबद्दल कोणत्याही समाजशास्त्रज्ञाला विचारा. तोही हेच सांगेल की, माणसाच्या जीवनात जेव्हा आराम वाढतो तेव्हा आव्हानांचा सामना करण्यात ते कमी पडतात.

फंडा असा : महागड्या कार, कपडे, घर आणि कोट्यवधींची संपत्ती असणे माणसाच्या यशाचे प्रतीक नाही आणि रस्त्याने चालणे हे तर अजिबात गरिबीचे चिन्ह नाही. आपल्यासारख्या लोकांचा सन्मान करणे हीच समृद्धी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...