आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅरीची आर्त हाक...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश युवा पॅाप गायक हॅरी स्टाइल्स याच्या गाण्याचा व्हिडिओ २०१७ च्या मेमध्ये आला. यूट्यूबवरील या व्हिडिओला आतापर्यंत तब्बल ५३ कोटींपेक्षा जास्त भेटीची नोंद झाली आहे. "साइन ऑफ द टाइम' या शीर्षकाचे हे शोकगीत आहे. पाच मिनिटांनंतर मरणाऱ्या बाळंतीण आईने नवजात लेकराशी साधलेला हा संवाद, अशी कल्पना आहे. हे इंग्रजी गाणे भाषा आणि देशाच्या सीमा ओलांडत जगभर अत्यंत लोकप्रिय झाले आहे.

 

अवघ्या २५ वर्षांच्या पॉपस्टर हॅरी स्टाइल्स या प्रतिभावंत गायकाने 'साइन ऑफ द टाइम' या गाण्यात जीव ओतला आहे. हे गाणे अतिशय आर्त अशा स्वरूपाची आत्म्याची हाक वाटते. मुलाखतीदरम्यान हॅरीने सांगितले की, बाळ सुखरूप आहे. पण बाळंतीण आई जगू शकणार नाही. तिच्याकडे फक्त पाचच मिनिटे वेळ आहे.  त्या पाच मिनिटांत आई तिच्या बाळाला काही सांगत निरोप घेते, अशी भावूक करणारी कल्पना करून हे गाणे लिहिले आहे.
हॅरी मस्तच गातो. हे गाणेही त्याने फार छान गायले आहे. व्हिडिओचे चित्रीकरणही खास आहे. त्याचे वर्णन इथे करत नाही. ते पाहिले पाहिजे, असेच आहे. त्याची निर्मिती पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला अमेरिकन संगीतकार-गीतकार जेफ भास्कर याने केली आहे. हाही मोठा अवलिया. जेफची आई जर्मन आणि वडील भारतीय वंशाचे आहेत. तो या गीताचा सहलेखकही आहे. हॅरीसह मिच रोलॅण्ड, रायन नासी, अॅलेक्स सॅलिबियन आणि टेलर जॉन्सन या मंडळींचेही हे गाणे लिहिण्यात योगदान आहे. 


हा  व्हिडिओ ९ मे २०१७ रोजी रिलीज करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत यूट्यूबवरील या व्हिडिओला ५३ कोटी २८ लाख ५३ हजार ३७३ लोकांनी भेटी दिल्या आहेत. पण, यात उत्तरोत्तर वाढ होतच आहे. हे गाणे हॅरीचे स्वत:च्याच नावाचे शीर्षक असलेल्या हॅरी स्टाइल्स या पहिल्यावहिल्या अल्बममधील आहे. हॅरी हा अलीकडच्या काळात जगभर गाजलेल्या पाच जणांच्या वन डायरेक्शन बँडमधील एक गायक. वयाच्या सोळाव्या वर्षी एक्स फॅक्टर या टॅलेंट शोधाच्या मालिकेतून तो पुढे आला. २०११ ते २०१५ या काळात या बँडने पाच अल्बम दिले आहेत. तेही खूप गाजले. झेएन मलिक, निल होरान, लियाम पेन आणि लुई टॉमिलसन यांच्यासह हॅरीने जगाचे तीन टूर करत १५ देशांत २० शो केले. प्रचंड प्रतिसाद मिळाला.


संपत्तीच्या दर्शनानेच डोळे दीपल्यानंतरच ज्यांना समोरच्याची खरी प्रतिभा लक्षात येते त्यांच्या माहितीसाठी... या दौऱ्यातून त्यांनी सुमारे २०० मिलियन ड़ॉलर (सुमारे १४०० कोटी) कमाई केल्याचा अंदाज आहे. पाश्चात्य देशात भांडवल आणि संगीताचे वेगळे नाते आहे. संगीताची बाजारपेठ मोठी आहे. अतिशय नेटकेपणाने संगीतातील कार्पोरेट कंपन्या कारभार करत आहेत. पैशाला पैशाच्या खोऱ्याने ओढत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. स्वत: हॅरीची कमाई ७५ दशलक्ष डॉलर (५०० कोटी रुपये) आहे. असो.अल्बमच्या दहा लाख प्रती विकल्या गेल्या.


हॅरी स्टाइल्स अल्बम १२ मे रोजी आला. त्याने दहा लाखांपेक्षा जास्त रेकॉर्ड विकण्याचा विक्रम केला. सीडी, डिजिटल, विनायल (तबकडी) (पाश्चात्य देशात पुन्हा तबकडीला मागणी येत आहे) अशा अनेक माध्यमातून ते विकले, डाऊनलोड केले गेले. (मोफत डाऊनलोड करणाऱ्यांची मोजदादच नाही) जगभरातील अनेक पुरस्कारही मिळाले. संगीताला वाहिलेल्या नियतकालिकांनी या अल्बमला डोक्यावर घेतले. समीक्षकांनी स्वागत केले. या अल्बमच्या मुखपृष्ठाचीही खूप चर्चा झाली. गु़लाबी पाण्यात पाठमोरा ओल्या अंगाने बसलेला हॅरी, त्याच्या पाठीवर सोनसाखळी, तिच्या पानावर कमळाचे फूल आहे. कलासमीक्षक या सर्वांचा अर्थ जन्म-पुनर्जन्म या कल्पनेशी जोडतात. वन डायरेक्शन बॅण्ड सोडून जणू पुनर्जन्म घेतल्याचे हॅरी सांगत आहे.


या अल्बममध्ये दहाच गाणी आहेत. त्या सगळ्यांची चाल निरनिराळी आहे. ती सगळीच कानाला गोड वाटतात. त्यातल्या त्यात टू घोस्ट, फ्रॉम डायनिंग टेबल आणि स्वीट क्रिएचर ही गाणी खासच आहेत. हॅरीच्या चाहत्यांनी त्याच्या सर्वच गाण्यांना पसंती दिली आहे. मात्र, साइन ऑफ द टाइम हे गाणे सर्वाधिक लोकप्रिय झाले आहे. हे गाणे त्यातील अल्प कथेची पूर्वकल्पना नसतानाही ऐकले तरी हेलावून सोडते. हेडफोन लावून ऐकण्यात तर मौज औरच आहे. अशात डोळ्याच्या कडा पाणावल्या नाही तर नवलच. सहज गाण्याच्या प्रभावी शैलीने हॅरी मुग्धही करतो. शेवटचे कडवे वुई गॉट टू गो अवे हे गाताना तर हॅरीच्या आक्रोशाचा जणू स्फोट होत आहे, असेच वाटत राहते. ऐकणारा स्तब्ध राहतो.


आईचे आश्वासन, सगळं ठीक होईल …
हॅरीच्या साइन ऑफ द टाइम या गाण्याचा आशय ढोबळ मानाने सांगायचे तर, ‘सगळं ठीक होईल, आता तुला एकट्याने पुढे जायचे आणि तुझे आयुष्य जगायचे आहे. आपण इथे पूर्वी भेटलो होतो हे आठवणारही नाही. पण या नाही दुसऱ्या जगात आपली पुन्हा भेट होणार आहे. दु:खाला चिकटून राहायचे नाही आणि त्यापासून पळायचेही नाही. काळ सांगावा घेऊन आला आहे, आता निघावे लागेल, आपल्याला निघावे लागेल. आपण पुरेसे बोललो नाही, आपण मोकळेपणाने बोलले पाहिजे, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण लक्षात ठेव सर्व काही ठीक होईल.’
गाण्याच्या सुरुवातीला गंभीर पियानोचे काही बीट ऐकू येतात. भिंतीवरील जुन्या लंबक घडाळ्याच्या ठोक्यांचा जणू आवाज वाटावा. आईवर झडप घालण्यासाठी पडणारी काळाची पावले जणू. त्यानंतर वाऱ्याचा मंद शीळ. मग, हॅरीच्या गंभीर आवाजात....
जस्ट स्टॉप युवर क्राइंग,
इट्स अ साइन ऑफ द टाइम्स
वेलकम टू द फायनल शो
होप यू आर वेअरिंग युवर बेस्ट क्लॉथ्स
यू कांट ब्राइब द डोअर ऑन युवर वे टू द स्काय
यू लूक प्रीटी गुड डाऊन हियर,
बट यू आरन्ट रियली गुड
ही ओळ ऐकू येते. त्यानंतर रुदन वाटावे असे स्त्री आवाजातील कोरस ऐकू येते.
वुई नेव्हर लर्न, वुई हॅव बीन हियर बिफोर
व्हाय आर वुई ऑलवेज स्टक अँड रनिंग फ्रॉम
द बुलेट्स
द बुलेट्स....


असंच हळुवार आवाजात हॅरी गाणे पुढे नेतो. शेवटच्या कडव्याला मात्र त्याचा बांध फुटतो. स्वर टिपेला जातो. त्यातून रुदन प्रकट होते. तसेच त्याच्या गायन क्षमतेचे दर्शनही घडते. पूर्ण गाण्यात गायनसौंदर्याच्या अनेक जागाही आहेत. या गाण्याचा अनुभव घेणेच योग्य. कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरणार आहे. स्वत: हॅरीने या गाण्याचा अनुभव सांगितला आहे. हे गाणे त्याने खूपवेळा गायले आहे. लाइव्ह कन्सर्टमध्ये, टीव्ही आणि रेडिओच्या शोमध्ये हे गाणे आ‌वर्जून गायले आहे. मात्र, आजही हे गाणे गाऊन झाल्यानंतर तो भावूक होतो आणि डोळे पाणावतात, अगदी तसेच जसे पहिल्यांदाच गायल्यानंतर झाले होते.


हॅरीच्या या गाण्यात निरोप घेत्या आईचा संवाद आहे. पण निव्वळ तेच नाही. या संवादाच्या निमित्ताने हॅरी आणि त्याच्या सहगीतकारांनी सर्व मनुष्यजातीला काळाची हाक ऐकण्यासाठी सावध केले आहे. हॅरी एका मुलाखतीत म्हणतो की, प्रत्येक पिढीपुढे त्यांच्या त्यांच्या काळात ‘न्याय व समान अधिकाराचे’ मूलभूत प्रश्न उभे असतात. त्यांची उत्तरे शोधणे काळाची गरज असते. मानवी संकटे मोठी असतात. त्या संकटांना, प्रश्नाला कवटाळूनही बसायचे नसते आणि त्यापासून पळून जायचेही नसते. त्यातून धैर्याने मार्ग काढत पुढे जायचे असते. अर्थात काळ ओळखून.


> लेखकाचा संपर्क - 9922419053

बातम्या आणखी आहेत...