आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • He Gave His Hotel On Rent To Help Cancer Sufferers, Meal For 700 People A Day, Establishing A Hospital For Those Who Are Not Treated Elsewhere

कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आपले हॉटेल भाड्याने दिले, रोज 700 लोकांना जेवण, ज्यांचे उपचार इतरत्र होत नाहीत अशांसाठी स्थापन करत आहेत रुग्णालय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध टाटा कर्करोग रुग्णालयाच्या दुसऱ्या बाजूला फुटपाथवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना एक व्यक्ती नेहमी मदत करत असलेली दिसते. त्यांचे नाव हरखचंद सावला. त्यांचे जीवन ज्योती कॅन्सर रिलिफ अँड केअर ट्रस्ट रोज ७०० पेक्षा जास्त लोकांना दोन्ही वेळचे जे‌वण देते. ते हे काम २७ वर्षांपासून करत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी सुमारे १० लाख लोकांना मोफत जेवण दिले आहे. एक चूक सुधारण्याच्या इच्छेने सेवेचा हा प्रवास सुरू झाला होता.

सावला सांगतात की, त्या दिवसांत मी लोअर परळ मित्रमंडळाशी जोडलेला होतो आणि लहान-मोठ्या कामांत लोकांना मदत करत होतो. एक दिवस एक मुलगी तिच्या कर्करोगग्रस्त आईला घेऊन आली आणि उपचाराची माहिती विचारली. मी त्यांना घेऊन माझ्या हॉटेलसमोर टाटा मेमोरियलला गेलो. तेथे उपचारासाठी खूप खर्च येईल असे समजल्याने त्यांना घेऊन सायन रुग्णालयात गेलो. नंतर मला समजले की, मी त्यांना चुकीने टाटा मेमोरियलमध्ये सवलतीच्या विभागाऐवजी खासगी विभागात नेले होते आणि या चुकीमुळे त्यांचा खूप पैसा खर्च झाला. मी त्यांची माफी मागितली, पण मुलगी म्हणाली की, आईच्या जिवापेक्षा दुसरी गोष्ट मोठी नाही. त्या दिवसापासून मी कर्करोगाच्या रुग्णांना मदत सुरू केली. मी दोन-चार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोफत जेवण देऊ लागलो. दरम्यान, मोफत जेवण करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. १२ वर्षे मी एकटाच हे काम करत होतो, पण नंतर आपल्या सीमित संसाधनांमुळे काम होणार नाही असे वाटले. त्यामुळे हॉटेल भाड्याने देऊन रक्कम जमवली आणि जीवन ज्योती कॅन्सर ट्रस्ट सुरू केले. गरजूंना मोफत औषधी देण्यासाठी औषध बँक उघडली. स्वयंसेवक म्हणून तीन डॉक्टर आणि तीन फार्मासिस्ट येथे रोज सेवा देतात. कर्करोगग्रस्त मुलांसाठी खेळणी बँकही आम्ही तयार केली. ट्रस्टचे सध्या ६० पेक्षा जास्त सेवा उपक्रम सुरू आहेत. मुंबईशिवाय जळगाव, कोलकाता यांसारख्या शहरांत ट्रस्टची १२ केंद्रे उघडली आहेत. मुंबईच्या केंद्रात रोज ५ रुग्ण मदत किंवा मार्गदर्शनासाठी येतात. या कामांसाठी पैशाची तरतूद ट्रस्ट देणग्यांतून करते. ट्रस्टने काही केंद्रे उघडली आहेत, तेथे लोक जुनी वृत्तपत्रे, रद्दी साहित्य दान करतात. या वस्तू रिसायकलिंग केंद्रांना विकतो. ट्रस्टने अलीकडेच इगतपुरीत सुमारे १०० एकर जमीन खरेदी केली आहे. तेेथे ५० एकर जमिनीवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची योजना आहे. सावला सांगतात की, 'इतर रुग्णालये ज्या रुग्णांना ठेवण्यास नकार देतात अशा रुग्णांना या केंद्रात ठेवले जाईल. त्याशिवाय १०० गाईंची गोशाळा, एक वृद्धाश्रमही उभारण्याची योजना आहे. एक नॅचरोपॅथी सेंटर, वर्किंग वुमन होस्टेल आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालयही होणार आहे. उरलेल्या ५० एकरमध्ये सेंद्रिय शेतीची योजना आहे. लवकरच सरकारकडून मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.'

सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत १४ तास रुग्णांच्या सेवेत
दिवसाचे १४ तास मानवसेवेत व्यतीत करणाऱ्या सावलांची दिनचर्या सकाळी ५ वाजता सुरू होते. सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतचा त्यांचा वेळ कर्करोगाच्या रुग्णांच्या सेवेतच जातो.

२४ तास चालते स्वयंपाकघर, जेवणावर रोज २५ हजार रु. खर्च
कर्करोग रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण पुरवणारे स्वयंपाकघर २४ तास चालते. तेथे ८ स्वयंपाकी आहेत. सकाळी ९ वाजता जेवण बनवण्यास सुरुवात होते. ११ वाजेपर्यंत तयार झालेल्या जेवणाचे पॅकिंग होते. दुपारी एक वाजेपर्यंत जेवण वाटपास सुरुवात होते. असेच दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ वाजता पुन्हा जेवण बनवण्यास सुरुवात होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पॅकिंगचे काम पूर्ण होऊन वाटप सुरू होते. जेवणावर रोज २५ हजार रुपये खर्च होतो. आठवड्याचे रेशन आणि भाज्या एकदाच स्थानिक बाजारातून खरेदी केल्या जातात. ट्रस्टच्या मुंबई कार्यालयात ३५ लोकांचा स्टाफ आहे.