आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...त्याने सोन्याची चेन फेकली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मला आठवते - फेब्रुवारी 2009 मधील घटना असावी. तेव्हा मी सिल्लोड येथे नोकरीस होतो. कार्यालयीन कामासाठी औरंगाबादला नेहमी येणेजाणे होते. सिल्लोड बसस्थानकातून मी औरंगाबादला जाणा-या बसमध्ये बसलो. नेहमीप्रमाणे बसमध्ये गर्दी होती. मधल्या मोकळ्या जागेत आम्ही 10 ते 15 प्रवासी उभे होतो. मी 13-14 क्रमांकाच्या सीटजवळ उभा होतो. त्या सीटवर एक जोडपे बसलेले होते. मुलेही सोबतच होती. त्यांचा अल्पोपाहार चालू झाला. त्यांनी केळी खाण्यास सुरुवात केली. ती बाई केळी खाऊन झाल्यानंतर साल खिडकीतून बाहेर टाकण्यासाठी नव-या जवळ देत होती. काही वेळाने तिने आपल्या गळ्यातील सोन्याची चेन काढून नव-या जवळ ठेवण्यासाठी दिली. तो कोणत्या विचारात होता कोणास ठाऊक? त्याने ती खिडकीच्या बाहेर फेकून दिली. नव-या ने चेन बाहेर फेकताच ती मोठ्याने ओरडली, ‘अहो, काय केलेत? माझी सोन्याची चेन फेकलीत!’ नव-या च्या लक्षात आपली चूक आली आणि त्याला घाम फुटला. काय करावे त्याला क्षणभर सुचलेच नाही.

मोठ्याने ओरडून त्याने कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितली. तोपर्यंत बसने दोन-तीन किलोमीटर अंतर पार केले होते. हा प्रकार आळंद गावाच्या पुढे घडला. गाडीतून काही प्रवासीही खाली उतरले होते. त्यांनी सल्ले देण्याचा सपाटा लावला. बस ज्या वेगाने जात होती, त्याअर्थी ती शेतात जाऊन पडली असणार, म्हणजे ती सापडणे कठीण आहे असे कोणीतरी म्हटले. शेवटी त्या जोडप्याने अन्य वाहनाच्या मदतीने तेथे जाऊन त्या चेनचा शोध घ्यावा, असे ठरले. त्या वेळी झालेल्या चर्चेत समजले होते की, सोन्याची चेन 30 ग्रॅमची होती. ज्या जागी ती चेन फेकली गेली होती ती नेमकी शोधणार कशी ? निश्चित स्थान समजले तर पाहिजे. त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. त्यांचेही हाल झाले असतील. प्रवासात असा गलथानपणा करावा का ? प्रवासात असे वेगवेगळे अनुभव येतातच, पण हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहिला आहे.