आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेरे चेहरे से वो अपनी हर निशानी ले गया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. इक्बाल मिन्ने
 

गझलकार स्वत:ला शब्दांच्या वादळात, भावनांच्या वणव्यात आणि संवेदनशीलतेच्या महासागरात झोकून देतो. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून अवतरलेले शब्द तावून-सुलाखून निघाल्यासारखे आणि सटीक असतात. अशाच तावून सुलाखून निघालेल्या डॉ. इफ्फत झरीन यांच्याबद्दल आज...
 
गझल लिहिणारा शायर किंवा शायरा मूलत: प्रतिभावान आणि संवेदनशील कवी अथवा कवयित्री असते. गझल म्हणजे शायराच्या आयुष्याचं प्राणतत्त्व असतं. गझलकार आत्ममग्न असला तरी तो समाजाचा घटक असल्यामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या चढ-उताराबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या बऱ्यावाईट घटनांचा परिणाम त्याच्यावर होतो. म्हणून शायर विविध विषयात, विविध आशयात, वेदनेत, यातनेत, आनंदात, सुखात, दु:खात, विवंचनेत,अगतिकतेत, सामाजिक जाणिवेत, मानवी संवेदनेत आपल्या भावनांची गुंतवणूक करतो. गझलकाराची भावनांची ही गुंतवणूक हळूहळू वाढत जाते. मेंदूच्या विशेष कप्प्यातून शब्दांचं वादळ घोंगावायला लागतं. हे वादळ तेव्हाच शांत होतं जेव्हा गझलकार उत्स्फूर्तपणे आमद बनून आलेल्या आणि वादळाचं रूप धारण करणाऱ्या शब्दांना कागदावर घट्ट खोचून ठेवत नाही. गझलकार स्वत:ला शब्दांच्या वादळात, भावनांच्या वणव्यात आणि संवेदनशीलतेच्या महासागरात झोकून देतो. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून अवतरलेले शब्द तावून-सुलाखून निघाल्यासारखे आणि सटीक असतात. मुळातच गझलेच्या प्रत्येक शेरात गझलकाराच्या आत्मानुभवाबरोबरच सामाजिक जाणिवांचा विश्वानुभव असतो. त्यामुळे गझलेमध्ये वैश्विक चिंतनाचा आलेख आढळतो. 

गझलकार नेहमीच आत्ममग्न, बेफिकीर, हळुवार, संयमी, संवादी,संवेदनशील, कलंदर वृत्तीचा  आणि आपल्याच धुंदीत आणि आपल्याच अटींवर जगणारा असतो. तो स्वप्नांचे इमले प्रत्यक्षात उतरू पाहणारा, आशा, आकांक्षा, अपेक्षांनी ओतप्रोत असतो. पण त्याचबरोबर आयुष्यातील आनंदाची उत्कटपणे अनुभुतीही शायर घेत असतो. तर दुसऱ्या बाजूला विदारक स्वप्नभंग आणि त्यातून आलेले आत्यंतिक नैराश्य पचवताना शायर शब्दांचा आधार घेत मोडलेल्या भावनांचा खेळ गझलेच्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो. असाच शब्दांचा खेळ करणारी, शब्दांना आपल्या म्हणण्यानुसार वागायला, वाकायला लावणारी शायरा म्हणजे विख्यात शायर डॉ. इफ्फत झरीन. 


देख कर इन्सान की बेचारगी
शाम से पहले परिंदे सो
गये

असे उत्तमोत्तम शेर लिहिणाऱ्या डॉ. इफ्फत झरीन यांचा जन्म १० आॅक्टोबर १९५८ रोजी दिल्ली इथं झाला. घरातच वडलांच्या शायरीचे बाळकडू प्यायलेल्या डॉ. इफ्फत यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण कोलकात्याच्या  फोर्ट विल्यम महाविद्यालयातून झाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पीएचडी केली. डॉ. इफ्फत यांच्या शायरीने मानवी भावनांच्या अनेक कंगोऱ्यांना नकळत स्पर्श केला आहे. अत्यंत सोप्या शब्दात विश्वाचे तत्त्वज्ञान सांगणे हे त्यांच्या शायरीचे वैशिष्ट्यं आहे. इफ्फत यांचे शेर हळव्या मनाला गवसणी घातल्याशिवाय राहत नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात एक दुखरा कोपरा असतो. तो कोपरा कायमस्वरूपी नष्ट करण्याचा कुणीच आणि कधीही प्रयत्न करत नाही. किंबहुना ह्या कोपऱ्यामधुून एक इवलीशी जखम भळभळत रहाते. पण डॉ. इफ्फ्त यांचे शेर अशा जखमांवर  मलम लावतात. 


कौन पहचानेगा ‘झरीन’ मुझको इतनी भीड में
मेरे चेहरे से वो अपनी हर निशानी ले
गया

डॉ. इफ्फत यांची गझल हळुवार, नाजूक तर आहेच, पण ती प्रासादिकही आहे. शायराची जी वृत्ती असते तशीच या शायराची गझलेची प्रकृती असते. त्यामुळे त्यांच्या गझलेतून तशाच प्रकृतीचे शब्द योजले जातात. आपण जसं आपलं रूप, आपली प्रतिमा आरशात पाहतो तसं रसिक-वाचक स्वत:च्या सुख-दु:खाचं, स्वत:च्या अनुभूतीचे प्रतिबिंब गझलेमध्ये  पाहत असतो. ते त्याला दिसलं की ती गझल त्याला त्याची वाटू लागते. ती गझल रसिक आपल्या हृदयाच्या जवळ करतो. अशा गझला डॉ. इफ्फत झरीन यांच्या वाचकांना जवळच्या वाटतात. 


अगर वो मिलके बिछड ने का हौसला रखता
तो दरमियाँ न मुकद्दर का फैसला रखता
भटक रहे हैं मुसाफिर तो रास्ते गुम हैं
अंधेरी रात में दीपक कोई जला
रखता
 
डॉ. इफ्फत यांचा पहिला गझलसंग्रह २००० साली ‘बेसाहिल दर्या’ या नावाने प्राकाशित झाला. १९९२ साली ‘फोर्ट विल्यम कॉलेज की नशरी दास्ताने’,‘लखनऊ का दबिस्तान ए शरे’ २००० साली, ‘बिसवी सदी मे उर्दू गझल’ २००१ आणि ‘झरीन नामा’२०१४ अशी त्यांच्या पुस्तकांची सूची आहे.

लेखकाचा संपर्क : ७०४०७९११३७

बातम्या आणखी आहेत...