आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या दारात उपोषण करेन, परंतु फुले मार्केटचा विषय मार्गी लावणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना-शहरातील फुले मार्केटसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ते काम तांत्रिक अडचणीत अडकले आहे. याच विषयावर मंगळवारी शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांच्या दारात उपोषणाचीही तयारी आहे. परंतु मुख्यमंत्री आपले कोणतेच काम प्रलंबित ठेवत नाहीत. त्यामुळे फुले मार्केटसाठी त्यांना भेटून हा विषय मार्गी लावणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. शहरातील भोकरदन नाका येथे आयोजित रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. रामतीर्थ येथे आणखी एक पूल उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. 


राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यात जालना ते सिंदखेडराजा रस्त्याचे भूमिपूजन, मंठा चौफुली ते कन्हैयानगर चौफुली या जालना वळण रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण आणि विशाल कॉर्नर ते अग्रसेन चौक या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा समावेश होता. यानिमित्त भोकरदन नाका येथील अग्रसेन चौकात भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे,भानुदास घुगे, उद्योजक किशोर अग्रवाल, कैलास लोया, अरुण अग्रवाल,अर्जुन गेही, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, अभिमन्यू खोतकर, पांडुरंग डोंगरे, सुखदेव बजाज, किशोर टेकवानी, विजय केलानी, मयूर ठाकूर,कार्यकारी अभियंता ओ.आर.चांडक, उपअभियंता सी.एन.नागरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मंत्री खोतकर म्हणाले की, शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. भोकरदन नाका ते विशाल कॉर्नर या रस्त्यांबाबतही अनेकांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. यातून या संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. पुढील २५ वर्षे हा रस्ता खराब होणार नाही याची काळजी घेतली जाईल. कंत्राटदारांनीही दर्जाबाबत तडजोड करू नये काही अडचण असेल तर थेट आपल्याशी संपर्क करावा, असे मंत्री खोतकर याप्रसंगी म्हणाले. खोतकर यांचे भाषण सुरू असतानाच काही व्यापाऱ्यांनी फुले मार्केटचा विषय मार्गी लावण्याची मागणी केली. हे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने आपल्याला त्याची खंत वाटते आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना भेटून यातील तांत्रिक अडचणी दूर करू, असे मंत्री खोतकर याप्रसंगी म्हणाले. 


भूमिपूजन समारंभात बोलताना मंत्री अर्जुन खोतकर, याप्रसंगी उपस्थित भास्कर अंबेकर, संतोष सांबरे, किशोर अग्रवाल, कैलास लोया, सुखदेव बजाज आदी. 


तिरुखेंच्या नावासाठी ठराव 
भोकरदन नाका ते विशाल कॉर्नर या रस्त्यावर अपघात झाल्याने पत्रकार राजेंद्र तिरुखे यांच्यावर काळाने झडप घातली होती. त्यामुळे या रस्त्याला तिरुखे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी काही पत्रकारांनी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या आगामी सभेत हा विषय ठेवून तसा ठराव मांडावा, अशा सूचना मंत्री खोतकर यांनी केल्या. 


जायकवाडी योजना आमचीच 
जायकवाडी जल योजनेसाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. भूमिगत गटार योजनाही मंत्री खोतकर यांच्या प्रयत्नामुळेच मंजूर झाली. परंतु नंतरच्या सरकारने त्यासाठी निधी दिला नाही, असे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले तर जायकवाडी योजनेला निधी मिळत नसल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर ५० कोटींचा हप्ता मिळाल्याचे खोतकर म्हणाले. 

 

पर्यायी पूल आवश्यक 
रामतीर्थ पुलावर वाहनांची कायम गर्दी असतेच परंतु भविष्यात त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते.त्यामुळे रामतीर्थ पुलाशेजारी असलेल्या दुसऱ्या छोट्या पुलाच्या जागेवर नवीन मोठा पूल बांधला जाणार अाहे. त्यासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हे कामही लवकरच सुरू होईल, असे मंत्री खोतकर याप्रसंगी म्हणाले. 


टॅक्सबाबत सोमवारी बैठक 
कर आकारणीबाबत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आपण सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेणार आहोत. चुकीच्या कर आकारणीचा नागरिकांना त्रास होणार नाही, ज्या नागरिकांना यासंदर्भात काही अडचणी आहेत त्या तत्काळ निकाली काढण्यासंदर्भात सूचना केल्या जाईल असे मंत्री खोतकर या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...