आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिन्नर- आरोग्य अधिकारी व सहायकाच्या त्रासाला कंटाळून आपण जीव देत असल्याचे चिठ्ठीत लिहून आरोग्य सेविकेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील देवपूर येथे घडली. कल्पना पंढरीनाथ शेळके (28) असे मृताचे नाव आहे.
मूळच्या वावी येथील रहिवासी कल्पना शेळके या 2 वर्षांपासून देवपूर आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. गावातीलच गणेश जाधव यांच्या कौलारू खोलीत त्या राहायच्या. बुधवारी ड्यूटी करून रूमवर परतल्या. गुरुवारी सकाळी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी जायचे असल्याने सहकारी सेविकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून वारंवार संपर्क साधला. मात्र, संपर्क न झाल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी शेळकेंच्या देवपूर-पंचाळे रस्त्यावरील खोलीकडे पोहोचले. त्या वेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. घटनास्थळी तुटलेली ओढणीही आढळून आली. त्यामुळे ओढणीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर नायलॉन दोरीने गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिठ्ठीत उल्लेख: त्रास असह्य झाल्याने टोकाचा निर्णय
प्रामाणिकपणे काम करूनही आरोग्य अधिकारी दाणी व सहायक वाघ नाना आपल्या कामात नेहमीच चुका काढत. नियमित कामाव्यतिरिक्त ओपीडीचे काम करूनही बीडीओपुढे माझी काम करत नसल्याची वाईट प्रतिमा निर्माण केली. गेल्या दोन वर्षांपासून मी त्रास सहन करत आहे. आता असह्य झाल्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे कल्पना शेळके यांनी मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत नमूद केले आहे. आई-वडिलांची माफी मागण्याबरोबरच भाऊ आणि बहिणींनी अभ्यास करून मोठे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या आजीच्या घरात आत्महत्या केली त्यांचीही माफी मागितली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.