temperature / नागपूर की आगपूर, चंद्रपूर झाले सूर्यपूर; राज्यात उष्णतेची लाट

चंद्रपूर @ ४७.८, नागपूर @ ४७.५ 

प्रतिनिधी

May 29,2019 09:18:00 AM IST

नागपूर - राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सूर्य अक्षरश: आग ओकतो आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. राज्यात २ जूनपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. चंद्रपूर येथे सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यापूर्वी २९ मे २०१८ रोजी ४८ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. नागपूर येथे यापूर्वी २३ मे २०१३ रोजी ४७.९ म्हणजेच अंश असे सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे.

चक्रवात स्थितीमुळे लाट
देशात पूर्व मध्य प्रदेश, नैऋत्य राजस्थान व गुजरात तसेच मध्य महाराष्ट्र ते कामोरीन अशी चक्रवाताची स्थिती आहे. यामुळे हवा आकाशाकडून जमिनीच्या दिशेने वाहते. गरम हवा वरच्या दिशेने जाऊ शकत नाही. उष्ण हवा जमिनीलगत राहते. त्यामुळे तापमान वाढते व उष्णतेच्या लाटेचा अनुभव येताे. ही स्थिती २ जूनपर्यंत राहण्याची शक्यता आहे. - ए.के. श्रीवास्तव, विभागप्रमुख, हवामान अंदाज विभाग, पुणे.


प्रमुख शहरांतील तापमान असे
चंद्रपूर ४७.८, ब्रह्मपुरी ४६.९, नागपूर ४७.५, परभणी ४६.१, औरंगाबाद ४२, बीड ४४.२, नांदेड ४४.५, उस्मानाबाद ४३.३, जळगाव ४३.६, सोलापूर ४३.८ अंश सेल्सियस.

X
COMMENT