आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशामध्ये इ. स. 2100 पर्यंत दरवर्षी उष्णतेच्या लाटेमुळे 42 हजार लोकांचा बळी जाण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - ओडिशात इ. स. २१०० पर्यंत उष्णतेमुळे दरवर्षी ४२,३३४ बळी जाण्याची शक्यता एका नवीन अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. ही संख्या राज्यात दरवर्षी हृदयविकाराने बळी जात असलेल्या संख्येपेक्षा पाच पटींनी जास्त आहे.  क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटच्या सहकार्याने भारतातील हवामान बदलाचा मानवी आणि आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम या विषयावर अभ्यास केला. त्या मालिकेतील हा पहिला निष्कर्ष मांडण्यात आला आहे. हा अभ्यास सोमवारी प्रकाशित करण्यात आला. हे निष्कर्ष मांडण्यात आल्यानंतर तज्ञांच्या एका गटाने ओडिशात हवामान बदलाचा परिणाम या विषयावर चर्चाही केली. या अभ्यासात म्हटले आहे की, उन्हाळ्यातील सरासरी तापमानात होत असलेली प्रचंड वाढ आणि अतिशय उष्ण दिवस यांचा परिणाम जीवितहानीवर होत आहे. ओडिशात सध्या १.६२ दिवस अतिशय उष्ण असतात. हरितवायू उत्सर्जनाचा सध्याचा दर शतकाअखेरपर्यंत असाच वाढत राहिला तर त्यात ३० पट वाढून इ. स. २१०० पर्यंत या उष्ण दिवसांची संख्या ४८.०५ पर्यंत पोहोचेल, असा अंदाज या अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. इ. स. २१०० पर्यंत पंजाब हे देशातील सर्वाधिक तापमान असलेले राज्य राहण्याची शक्यता आहे. तेथे सरासरी वार्षिक तापमान ३६ अंश सेल्सियस राहील.  संपूर्ण भारतात सध्या सरासरी ५.१ दिवस अत्यंत उष्ण असतात. इ.स. २१०० पर्यंत त्यात आठ पट वाढ होऊन त्यांची संख्या ४२.८ दिवस एवढी होईल.ओडिशाच्या सरासरी उन्हाळी तापमानात ३.३२ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. २०१० मध्ये असलेल्या सरासरी २८.८ अंश सेल्सियस तापमानात वाढ होऊन २१०० मध्ये ते ३२.१ अंशांपर्यंत जाईल. या काळात राष्ट्रीय सरासरी तापमान २४ अंशांवरून २८ अंशांपर्यंत जाईल. आंध्र प्रदेशात सरासरी तापमान वाढ ३ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. 

१९९८ मध्ये उष्णतेच्या लाटेचे ओडिशात २ हजारांवर बळी
उष्णतेच्या लाटेमुळे जीवितहानी होण्याचे प्रकार ओडिशात याआधीही घडले आहेत. १९९८ मध्ये राज्यात उष्णतेच्या लाटेने २,०४२ लोकांचा बळी गेला होता, अशी माहिती ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाचे मुख्य व्यवस्थापक प्रदीपकुमार नायक यांनी दिली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने १९९८ नंतरच्या काळात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी दरवर्षी तेथे अनेक लोकांचा मृत्यू होतो. २०१० ते २०१८ या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे ६१०० जणांचा मृत्यू झाला. ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पश्चिम बंगालमध्ये त्यापैकी ९० टक्के बळी गेले होते, असे अभ्यासात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...