आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड जिल्ह्याला जलाशयाचे रुप; भीषण पूरस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर, पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झालाय. त्यामुळेच अनेक ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री, आंबा, कुडंलिका नदीने पहाटेच धोक्याची पातळी ओलांडली. महाड आणि नागोठणे शहरातील खालच्या भागांमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. रोहा तालुक्यातील रोठ आणि वरोसे गावाला पाण्याने वेढा दिलाय. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणही ओव्हरफ्लो झाल्याने सोलनपाडा गाव रात्रीच स्थलांतरीत करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील बिरदोले गावाला पाण्याने वेढा दिला असून येथील उल्हास नदी किनारी अनेक गावांमध्ये पाणी साचले आहे. यासोबतच कुडंलिका नदीनेही सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे नागोठणे-रोहा मार्गावरील पुल बंद करण्यात आला आहे. 


वाहतुकीवर परिणाम
माणगाव ते श्रीवर्धन रोडवरील मोर्बापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. खोपोली-पाली-वाकण मार्ग बंद करावा लागला आहे. आंबा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांचा सपंर्क तुटला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भातशेतीचे बांध तुटल्यामुळे लावणीसाठी आणलेली रोपे वाहुन गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

बातम्या आणखी आहेत...