आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औैरंगाबाद: जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोयाबीन, मका, कापूस आणि तुरीच्या पिकाला फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद - तब्बल ३० दिवसांच्या खंडानंतर औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी आठ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात १३०.६ मिलिमीटर पाऊस झाला. रात्री साडेआठ ते ११.३० पर्यंत २७.६ मिमी पाऊस झाला. एमजीएम वेधशाळेने मात्र रात्री ११ वाजेपर्यंत ११४.६ मिमी पाऊस झाल्याचे सांगितले. या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी एरवी नकोशा वाटणाऱ्या अतिवृष्टीमुळे औरंगाबादकरांना चिंब चिंब दिलासा मिळाला आहे. नेहमीप्रमाणेच शहरात सखल भागात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्हाभरात औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी लावली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आजवर अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस, तुरीच्या पिकांना फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.

 

सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ६८.३ मिमी पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने हा आकडा रात्री साडेआठ वाजता १०३ मिलिमीटरवर पोहोचला. यापूर्वी जिल्ह्यात १७ जुलै रोजी १२.२५ मिमी इतका पाऊस झाला होता. त्यानंतर मोठा पाऊस झाला नव्हता. गुरुवारी ३० दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस झाला. बुधवारीही पावसाने हजेरी लावली, मात्र त्यात फारसा जोर नव्हता. बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली.

 

वैजापुरातील २० गावांना फायदा नाही
वैजापूर तालुुक्यातील २० गावांत अत्यंत कमी पाऊस झाल्याने तेथील पिके आधीच जळून गेली आहेत. त्यामुळे तेथील पिकांना काहीच फायदा होणार नाही. हा पाऊस झाला नसता तर जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णत: जळूनच गेले असते, असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात अजूनही ३३४ गावे टँकरवर
औरंगाबाद जिल्ह्यात अजूनही ३३४ गावांना ३६१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ४३ गावांना ५७, फुलंब्रीतील २५ गावांना ३२, पैठणमधील ३५ गावांना ४०, गंगापुरातील ९३ गावांना ८४, वैजापुरातील ६६ गावांना ७३,खुलताबादेतील २३ गावांना २७, कन्नडमधील १८ गावांना १७, सिल्लोडमधील ३१ गावांना ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...