आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णेची पाणीपातळी 33 फूट; नाशकातही गोदावरीला पूर, अलमट्टी धरणातून 2 लाख 20 हजार क्युसेकने विसर्ग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी ३३ फूट झाली आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे. कोयना धरणातील विसर्ग कमी करून साेमवारी दुपारी १२ वाजता ४५ हजार २६७ क्युसेक करण्यात आला आहे. वारणा धरणातून ११ हजार ८९४ क्युसेक, अलमट्टी धरणातून २ लाख २० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे लवकरच पूरपरिस्थिती नियंत्रणात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सकाळपासून धरणक्षेत्रात पाऊस कमी झाला असून कोयना येथे २१ मिलिमीटर, नवजा येथे २५ मिलिमीटर, महाबळेश्वर येथे २३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी स्थिर होऊन ती कमी होईल. जिल्हा प्रशासन पूर्ण सतर्क असून आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील भिलवडी पूल येथील पाणी पातळी कमी होत आहे. सध्या कोणत्याही शहरी भागात पाणी शिरले नसून खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथील १० कुटुंबे महापालिकेच्या शाळा क्रमांक १ येथे स्थलांतरित केली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात ३ बोटी व २५ जवान आहेत. एक पथक इस्लामपूर भागात व दुसरे जिल्हा मुख्यालय येथे आहे. सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. कोणत्याही मदतीची गरज भासल्यास टोल फ्री क्रमांक १०७७, ०२३३-२६००५००, ९३७०३३३९३२, ८२०८६८९६८१, पाटबंधारे नियंत्रण कक्ष ०२३३-२३०१८२०, २३०२९२५  या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरणात ८.२९ टीएमसी पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजामधून ४२५६, सकाळी ११ वाजता ३९ फूट १० इंचांवर असलेली राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी सायंकाळपर्यंत स्थिर होती. मात्र, जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ८.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. बंधाऱ्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील सात राज्यमार्ग व १७ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी घाटातील सुमारे ९० फूट लांबीचा रस्ता खचल्याने वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी जुन्या पुलावर पाणी आले आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही पाणी आल्याने सात राज्यमार्ग व १७ जिल्हामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने बंद करण्यात आले आहे. भंडारदरा-निळवंडेतून सोडले पाणी, मुळा धरणाचेही ११ दरवाजे उघडले अकोले | भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात भाद्रपद सरींची जोरदारपणे वृष्टी सुरू असल्याने निळवंडे धरणातून सोमवारी संध्याकाळी प्रवरा नदीच्या पात्रात २७ हजार ४९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. प्रवरा नदीवरील सर्व लहान पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. प्रवरा नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सहाला संपलेल्या १२ तासांत भंडारदरा धरण परिसरात ८३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. घाटघरला १३०, रतनवाडीस १४५, पांजरे येथे ८७, वाकी येथे ७५ आणि अकोले येथे २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी सकाळी साडेसहाला भंडारदरा धरणातून १९ हजार ४७६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सायंकाळी त्यात वाढ होऊन तो २१ हजार १४५ करण्यात आला. निळवंडे धरणातूनसुद्धा पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी २७ हजार ४९८ क्युसेकने पाणी प्रवरा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे जाऊन जायकवाडी धरणात जमा होत आहे. मुळा धरणाचे सोमवारी रात्री ११ दरवाजे उघडले. जायकवाडीकडे २ हजार क्युसेकने पाणी झेपावले आहे. दारणातून ७ हजार ४०८ तर गंगापूरमधून ३ हजार ४२६ क्युसेकने विसर्ग सुरू नाशिक : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, आंबोलीसह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर व दारणा धरणातून  सोमवारी (दि. ९) सकाळी ९ वाजेपासून पाणी विसर्गास सुरुवात झाली. गंगापूर व दारणा धरण १०० टक्के भरल्याने आवक होणाऱ्या पाण्याचा तत्काळ विसर्ग केला जात आहे. त्यामुळे विसर्गात वाढ होत असून दुपारी ३ वाजता गंगापूर धरणातून ३ हजार ४२६ तर दारणातून ७ हजार ४०८  क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे नांदूर-मधमेश्वरमधून ८ हजार ९३५ क्युसेकने मराठवाड्याच्या दिशेने पाणी सुरू होते. विसर्गामुळे गोदावरी व दारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.  गत २० दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये दमदार पाऊस होत आहे. हे दोन्ही तालुके धरणांचे पाणलोट क्षेत्र असल्याने धरणांमध्ये पुन्हा पाण्याची वेगाने आवक होत आहे. शिवाय, गंगापूर व दारणा समूहातील धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे अावक हाेणाऱ्या पाण्याचा तत्काळ धरणातून विसर्ग केला जात आहे. शनिवारी (दि. ७) गंगापूर धरणातून ६०० क्युसेक पाणी विसर्ग करण्यात आला होता. परंतु, रविवारी सायंकाळपासून मुसळधार सुरू झालेल्या पावसाने पाण्याची अावक वाढली. त्यामुळे सोमवारी (दि.९) सकाळपासून गंगापूर, दारणा, भावली, कश्यपी, मुकणे, नांदूर-मधमेश्वर धरणातून विसर्ग केला जात आहे. गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजता ३ हजार ४२६ व दारणातून ७ हजार ४०८ क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. सकाळपासून विसर्ग वाढत होता. त्यामुळे गोदावरी व दारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. नाशिक शहरातील गोदापात्रही दुथडी भरून वाहू लागले आहे. शेकडो भाविक रामकुंडावर धार्मिक विधीसाठी येतात. पाण्याची पातळी वाढल्याने या ठिकाणी भाविकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. 

बातम्या आणखी आहेत...