मराठवाड्यात पुन्हा एकदा वादळी वार्यासह पाऊस झाला. त्यामुळे नांदेड, परभणी, उस्मानाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही गारपिटीने मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढले होते. एकूणच निसर्गाच्या ऋतुचक्रात झालेला हा बदल मानवी जीवनावर परिणाम करणारा ठरत आहे. जागतिक तापमान वाढ आणि ऋतूंचे बदलते चक्र पाहता बळीराजाने केवळ निसर्गावर अवलंबून राहणे सोडावे. शेती हा आपला प्रमुख व्यवसाय असला तरी केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास हाती शून्य येण्याची वेळ येऊ शकते. बहुतांश शेतकर्यांनी काळाची पावले ओळखत शेतीला पूरक जोडधंदा सुरू केला आहे. पण जे शेतकरी अजूनही फक्त शेतीवर अवलंबून आहेत त्यांनी शेतीला समांतर असा दुसरा एखादा धंदा करणे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला दुसर्या नोकरीत गुंतवणे अशी पावले उचलणे आवश्यक आहे.