आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी पावसाने मुंबईकरांची दैना : शाळा, कार्यालयांना दिल्या सुट्या, आता काेणती यंत्रणा आणावी : आदित्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या मान्सूनच्या पावसाने मुंबई चार दिवस अक्षरश: थबकून गेली. सोमवारी मध्यरात्री बेदरकार पाऊस बरसला. रात्री १ ते ३ दरम्यान बरसलेल्या पावसाने ४५ वर्षांतील विक्रम मोडीत काढले. त्याच्या धो..धो..कोसळण्याने पालिका प्रशासन हतबल ठरले असून धावती मुंबई पूर्ण कोलमडून गेली आहे. 


मागील सलग चार दिवस मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवल्यानंतर सोमवारी सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दुपारी ४ नंतर त्याने पुन्हा फेर धरला. मध्यरात्री सरीवर सरी बरसत होत्या. रात्री १० नंतर पुन्हा जोर धरला. १ नंतर तो जोरात कोसळू लागला. एका तासात इतका बरसला की कुर्ला येथे २०७ मिमी, कांदिवलीत २०० मिमी, विक्रोळीत १९७ मिमी, दिंडिशीत १८८ मिमी आणि मालाड येथे १८३ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली.


रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने रात्री ११ वाजता एकएक लोकल मार्ग ठप्प होत गेले. मंगळवारी सकाळी तिन्ही लोकल मार्ग पाण्याखाली होते. पश्चिम लोकलची वाहतूक मंगळवारी दुपारी १२ वाजता तर हार्बर व मध्य लोकलची वाहतूक दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४ वाजता सुरु झाली. 


प्रशासनाकडून मंगळवारी सुटी 
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मंगळवारी ठाणे, मुंबई व मुंबई उपनगर, पालघर या जिल्ह्यांतील शाळा, सरकारी व खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. गरज असेल तर बाहेर पडा, असा इशारा दिला होता. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती.


अनेक संसार उघड्यावर : ३७ घरे कोसळली, कारमध्ये दोघे गुदमरले
1. शहर व उपनगरात ३७ घरे कोसळली असून ६७ ठिकाणी शाॅर्टसर्किट झाले. मालाड सबवेत तुंबलेल्या पाण्यात स्कॉर्पिओतील दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. विलेपार्ले येथे युवकाचा विजेचा धक्क्याने ठार झाला. मुलुंड येथे सुरक्षा रक्षकाचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू ओढावला. पालघरमध्ये ६० वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेली.


2. पालिका हद्दीत २४ तासांत ६१ वृक्ष कोसळले आहेत. चांदिवलीत जमीन खचल्याने बाजूच्या इमारती रिकाम्या कराव्या लागल्या. मध्यरात्री मिठी नदीची पातळी वाढल्याने १,६०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. घाटकोपर पूर्वेला पंतनगरात गुडघाभर पाणी साचले. गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या चाळीत पाणी शिरले.


मुंबई : ५२ उड्डाणे रद्द
मंगळवारी सकाळपासूनच मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर पाणी साचले हाेते. त्यातच स्पाइसजेटचे जयपूरहून आलेले विमान धावपट्टीवरून घसरले व मैदानात जाऊन फसले. सुदैवाने काेणतीही दुर्घटना घडली नाही. यामुुळे मुख्य धावपट‌्टीवरुन दिवसभर उड्डाणे बंद ठेवण्यात आली. दिवसभरात ५२ उड्डाणे रद्द करावी लागली तर ५५ विमाने इतरत्र वळवण्यात आली. गुरुवारी धावपट्टीवरून उड्डाणे सुरू हाेण्याची शक्यता आहे.


‘मातोश्री’ परिसर जलमय; आदित्यही अडकले
मुंबई तसेच उपनगरातील मुसळधार पावसाचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बसला. त्यांचे ‘माताेश्री’ निवासस्थान असलेल्या कलानगर परिसरात (वांद्रे पूर्व) गुडघाभर पाणी साचले होते. महापालिकेचा कारभार गेली २५ वर्षे शिवसेनेकडे असून पक्षप्रमुखांनाच फटका बसल्याने त्यांच्यावर टीकेची झाेड उठली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी मुंबई कुठेही तुंबली नसल्याचा दावा केला होता. दुसऱ्याच दिवशी ‘मातोश्री’ जलमय झाली. 


आता काेणती यंत्रणा आणावी : आदित्य
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली. मात्र, त्यांनाही घराबाहेर पडताना अडचणींना ताेंड द्यावे लागले. मुंबईच्या दैन्याला हवामान बदलाची स्थिती कारणीभूत आहे. या परिस्थितीत जगातली कोणतीही यंत्रणा काम करू शकत नाही. अशी कुठली यंत्रणा असेल तर तुम्हीच मला सांगा. आपण मुंबईत ती आणू, असे ते म्हणाले. 


बाळासाहेब ठाकरेही अडकले हाेते पुरात
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत विक्रमी पाऊस पडला होता. त्या वेळी ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानात पाणी घुसले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोटीत बसवून बाहेर काढून दादरमध्ये राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी आणले होते.

बातम्या आणखी आहेत...