आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे/ औरंगाबाद - राज्यात २८ दिवसांच्या खंडानंतर गुरुवारी सर्वत्र पाऊस झाला. आषाढात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांनी मान टाकायला सुरुवात केली होती. मात्र, या श्रावणसरींमुळे पिकांना जीवदान मिळाले. विशेषत: सोयाबीन, कापूस व तूर या पिकांना फायदा होणार आहे.
दरम्यान, २० ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. मराठवाड्यात प्रदीर्घ खंडानंतर हा पाऊस झाला. विभागात ७६ तालुक्यांत हा पाऊस असून १३ मंडळांत अतिवृष्टी आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस आहे. औरंगाबादेत ८ तासांत १३०.६ मिमी पावसाची नोंद झाली.
चौघांचा मृत्यू : संततधारेमुळे बुधवारी आळंद तालुक्यात हित्तलशिरुर येथे भिंत कोसळूून लक्ष्मीबाई प्रभू वडेयर (४६) यल्लम्मा (८), अंबिका (६) यांचा मृत्यू झाला. बीड तालुक्यात सौताडा येथे दरड कोसळून राहुल रावसाहेब शेकडे (२३) याचा मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील चिखली गावात सुधाकर काकड नाल्याच्या पुरात वाहून गेले.
मराठवाड्यात ७६ तालुक्यात पाऊस, १३ मंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात सर्व ७६ तालुक्यात सरासरी २५ मिमी पाऊस झाला. यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४७ मिमी पाऊस आहे. या पावसामुळे विभागात पिकांना जीवनदान आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांना या पावससाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यत २ तालुके आणि १३ मंडळात अतिवृष्टी झाली. तर गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सायंकाळपासून पडत असलेल्या या पावसाने परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली.तर बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात रिमझीम पडलेला पाउस गुरुवारी मात्र जोरदार बरसला.
पूर्व विदर्भातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात धुवाधार
बुधवारी दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भाच्या सीमेवरील असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी सकाळी पूर्व विदर्भात नागपूर आणि वर्धा शहरांच्या मध्य भागाकडे सरकल्याने राज्यात सर्वदूर पाऊस झाला. जुलै -ऑगस्टमधील सरासरी २८ दिवसांच्या खंडानंतर मान्सूनचे जोरदार पुनरागमन झाल्याने खरिपाच्या काही पिकांना जीवदान मिळाले आहे.
उत्तरेकडे असलेला मान्सूनचा आस (ट्रफ) आता दक्षिणेकडे सरकला आहे. अरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्रवात स्थिती आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला राहील, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा आयएमडीने दिला आहे.
सोयाबीन, मूग, उडदाचे उत्पादन घटण्याची शक्यता
औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहायक संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी सांगितले, जुलै -ऑगस्टमधील मोठ्या खंडाचा फटका मूग, उडीद आणि सोयाबीनला बसणार आहे. मूग-उडदाचे उत्पादन ३० ते ३५ टक्के, सोयाबीनचे उत्पादन १५ ते २० टक्के घटण्याची शक्यता आहे. कापूस, तूर या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, दीर्घ खंडानंतर मराठवाड्यावर ‘आभाळमाया’...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.