Home | Editorial | Agralekh | Heavy rain will come

पाऊस येईल मोठा?

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 09:19 AM IST

‘स्कायमेट’ने देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देत चिंता वाढवली होती.

  • Heavy rain will come

    लोकसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत घामाच्या धारा वाहत आहेत. अशा वातावरणातच भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीने यंदा देशात पाऊस सरासरी गाठणार (९६ टक्के ) असा अंदाज वर्तवत सर्वांनाच दिलासा दिला आहे. यंदा अल निनोचे सावट फारसे राहणार नाही, असे सांगत आयएमडीने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्यांवर सुखद शिडकावा केला आहे. मुळात मान्सूनचा पाऊस म्हणजे निव्वळ जुगार असे म्हणतात. मान्सूननेही याचा प्रत्यय वारंवार दिला आहे. अशा परिस्थितीत या अंदाजाचे महत्त्व आणखी वाढते. या पूर्वी ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देत चिंता वाढवली होती. आता आयएमडीच्या अंदाजाने ही चिंता काही अंशी दूर केली आहे. आयएमडीच्या अंदाजातील पहिली महत्त्वाची बाब म्हणजे, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त १७ टक्के आहे. दुसरी, प्रशांत महासागरातील अल निनो हा घटक प्रतिकूल असला तरी, हिंदी महासागरातील पूर्व आणि पश्चिम भागांतील तापमानाचा फरक दर्शवणारा इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक यंदा सकारात्मक राहील. अल निनो सक्रीय असताना आयओडी सकारात्मक असेल तर भारतात चांगला पाऊस पडतो, असा आजवरचा अनुभव आहे. आयएमडीकडून दरवर्षी दोन टप्प्यांत मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्यात येते. आता दुसरा अंदाज मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. जगभरातील हवामान संस्था अल निनोबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवत असताना, आयएमडीने सौम्य अल निनो असल्याचे सांगत पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यांत तो आणखी सौम्य होण्याची शक्यता वर्तवली आहे.


    भारताच्या दृष्टीने या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या मोसमी हवामानाच्या देशात सर्व अर्थकारण, समाजकारण, राजकारण पावसावर अवलंबून असते. पाऊस सरासरी गाठणार, या अंदाजानेच भारतीय शेअर बाजारात नवचैतन्य आले आहे. देशाचा गावगाडा पावसावरच चालतो. यंदा पावसाचे वितरण सर्वत्र समान राहील, असे आयएमडीने म्हटले आहे. ही बाब कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. मात्र मागील नऊ वर्षांत आयएमडीचे अंदाज २०१० आणि २०१७ मध्येच अचूक ठरले आहे. स्कायमेटला तर दोन वर्षांपूर्वी अंदाज चुकले म्हणून जाहीर माफी मागावी लागली होती, हेही लक्षात घ्यावे लागेल. नाहीतर, पैसा झाला मोठा, अंदाज ठरला खोटा... असे यंदा तरी होऊ नये!.

Trending