आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस दोन दिवसांत चांगलाच बरसला. मराठवाड्यातील ४१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. दीर्घ खंडाने बरसलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. माहूर तालुक्यात तब्बल १८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.
जालना : जिल्ह्यातील ४५ मंडळांत अतिवृष्टी
जालना जिल्ह्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या. दरम्यान, जिल्ह्यात १७ ऑगस्ट सकाळपर्यंतच्या मागील चोवीस तासांत सरासरी ११३.६२ मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पाणी पातळीत मात्र, वाढ झाली नाही. तुरळक ठिकाणी उसाचे नुकसान झाले आहे. चार मंडळ वगळता इतर ४५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जालना- १३२.६३, बदनापूर १४२.६०, भोकरदन ८८.८८, जाफराबाद ९३.८०, परतूर १३४.२०, मंठा ११६.००, अंबड ७७.२९, घनसावंगी १२३.५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड : माहूर १८८ मिमी, ८ तालुक्यांत अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ८ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. माहूरमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत विक्रमी १८८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ७१.८६ मि. मी. पावसाची नोंद झाली. किनवट येथे पैनगंगा आणि नाल्याचे पाणी गावातील इमामपुरा, इस्लामपुरा, रामनगर आदी भागात घुसल्याने जवळपास २०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अद्यापही हे कुटुंब शाळांमध्येच असल्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले. तथापि पावसाचा जोर कमी झाला असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याची पावसाची सरासरी ६०.३३ टक्के झाली आहे. विष्णुपुरी जलाशय भरल्याने रात्रीपासून गोदावरीच्या पात्रात ७६८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
उस्मानाबाद : सलग ४९ तास संततधार बरसला
बुधवारी(दि.१५) दुपारी १ वाजता सुरू झालेल्या संततधार पावसाने शुक्रवारी दुपारी २ वाजता विश्रांती घेतली. सलग ४९ तास झालेल्या पावसाने विशेषत: बळीराजाच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान निर्माण केले. तरी अजूनही पावसाची भूक भागलेली नाही. जिल्ह्यात आजवर ४५.२८ टक्केच पाऊस झाला असून, ५० टक्केही पाऊस न झाल्याने अर्थातच धरणे भरलेली नाहीत. तसेच नद्यांना अजूनही खळखळाट सुरू झालेला नाही. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण २४.९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील इटकळ, मंगरूळसह काही मंडळात बुधवारी अतिवृष्टी झाली होती. गुरुवारी मात्र हलका पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी पावसाने विश्रांती घेतली. जिल्ह्यात आजवर ३४७ मिलिमीटर पाऊस झाला असून,गेल्यावर्षी या तारखेपर्यंत ३०५.७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
लातूर : अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षाच
लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भिजपाऊस पडला. यामुळे भूजल पातळी वाढण्यासह
खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्याप जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. नद्यांमध्ये पाणी आले नसल्यामुळे मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठ्या आणि इतर मध्यम तसेच लघु प्रकल्पांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे जिल्ह्याच्या सरासरीच्या ५० टक्के पाऊस पडल्याची कागदोपत्री नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लातूर ३३.५०, औसा १९.५७, रेणापूर ४०.७५, अहमदपूर ४०.१६, चाकूर ३८.६०, उदगीर १९.८६, जळकोट १४.५०, निलंगा २५.५० देवणी १४.६७ आणि शिरूर अनंतपाळ २२.६७ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
हिंगोली : ३२९.९४ मिमी, नदी-नाले काठोकाठ!
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपूर्वी गेल्या २४ तासांत ३२९.९४ मिमी एवढा पाऊस झाला असून या वर्षीच्या हंगामात एकाच दिवसात झालेला हा सर्वोच्च पाऊस आहे. जिल्ह्यातील लहान-मोठे नदी-नाले काठोकाठ भरून वाहिले आणि छोटे-मोठे तलावही भरण्यास या पावसाची मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत आता तब्बल २७.६६ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त ३५.१३ टक्के पाऊस झाला होता. तर यावर्षी आतापर्यंत ६२.७९ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. गेल्या २४ तासांत हिंगोली तालुक्यात ६०.४३ मिमी, वसमत तालुक्यात ६९.४३, कळमनुरी ८८.३३, औंढा ७८.२५ तर सेनगाव तालुक्यात ३४.५० मिमी असा असा एकूण ३२९.९४, सरासरीच्या ६५.९९ टक्के पाऊस झाला.
बीड : २ दिवस संततधार, खरिपाला जीवदान
जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. खरीप पिकांना जीवदान मिळाले अाहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाच, माजलगाव तालुक्यातील चार व केज तालुक्यातील एक अशा एकूण तीन तालुक्यांतील नऊ महसुली मंडळांत मागील २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला, माजलगाव, दिंद्रुड, किट्टी आडगाव चार चार महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली असून गेवराई तालुक्यातील धोंडराई, तलवाडा, रेवकी व गेवराई अशा चार व केज तालुक्यातील केज महसुली मंडळ अशा एकूण नऊ महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. या पावसामुळे जिल्ह्यात कापूस , सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ पर्यंत २६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात २१.६२ मि.मी. पाऊस झाला होता. जिल्ह्यातील एकूण पावसाची वार्षिक सरासरी ६६६.३६ असताना आजवर केवळ २९७.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ४० टक्केच पावसाची नोंद झाली आहे.
परभणी : नऊ पैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टी
दोन दिवस झालेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील नऊपैकी सहा तालुक्यांतील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७२.८६ मिमी पावसाचे नोंद झाली. एकूण सरासरीच्या ३८०.१६ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवारी सकाळी बहुतांश गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटलेला होता. पावसाने उघडीप दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. आतापर्यंत जिल्ह्यात ४४९ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३८० मिमी पाऊस झाल्याने आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी ८४.७ टक्के इतकीच राहिली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद पाथरी तालुक्यात १०० मिमी झाली आहे. सहा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सिंगणापूर ६८, झरी ८८, पेडगाव ६९, जांब ६६, पूर्णा १०४, ताडकळस ६९, चुडावा ७९, सोनपेठ ९४, सेलू १३७, देऊळगाव ६५, कुपटा ८८, वालूर ८३, चिकलठाणा १०८, पाथरी १४२, बाभळगाव ८०, हादगाव ७९, जिंतूर १०४, सावंगी म्हाळसा ९४, बोरी ७६, चारठाणा ८३, बामणी १२४, मानवत १३३, केकरजवळा ७९, कोल्हा ६८ मि.मी. नोंद झाली आहे. अर्थात या सर्व मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.