आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार जिल्ह्यांत जोरदार पाऊस; १४ मंडळांत अतिवृष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड विहिरींची पडझड, शिसारखेड्याचा संपर्क तुटला

सिल्लोड - अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ९८ हजार हेक्टरवरील शेतीमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी खचून गेले असून खायचं काय अन् जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एका रात्रीत आठ मंडळांत अतिवृष्टी होउन सरासरी ७७.८८ मिमी पाऊस झाला. घरे, विहिरींची पडझड झाली. दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील वडाेदबाजार, अाळंद व सोयगाव तालुक्यातील सोयगाव मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच कन्नड तालुक्यात अंजना-पळशी प्रकल्प, पूर्णा-नेवपूर प्रकल्प, वाघदरा, गंधेश्वर, अंबा, तपोवन-निंभोरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले.
 दिवाळीपासून दररोज पाऊस सुरूच असल्याने नुकसान होत असताना ऊन पडल्यास काही प्रमाणात शेतीमाल वाचेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी शुक्रवारी (दि. १) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे निराशा आली. संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस थोडा वेळ उसंत घेउन शनिवारीही (दि. २) सुरूच होता. शुक्रवारी रात्रभर पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाली. यापूर्वीच भरलेली धरणे फुटण्याची भीती निर्माण झाली. धानोरा  येथील धरणाच्या खाली असलेल्या पंचवीस ते तीस घरांच्या वस्तीवरील शंभर ते सव्वाशे शेतकऱ्यांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. सकाळीच त्यांनी आम्हाला वाचवा अशा आवाजात प्रशासन, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर यंत्रणा हलली व या लोकांना धानोरा गावातील जि. प.च्या शाळेत हलवण्यात आले. काहींनी गावात नातेवाइकांकडे आश्रय घेतला. 

नदी, नाले तुडुंब भरल्याने वडोदचाथा, अन्वी,उंडणगाव आदी गावांमध्ये पाणी शिरले. सिमेंट, माती नाला बांध, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरल्याने लगतच्या शेतात पाणी शिरले. या पाण्यात शेतात उभ्या असलेल्या मका, सोयाबीनच्या गंजी नदीपात्रात वाहून गेल्या. गावात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली. तालुक्यातील पूर्णा, खेळणा, वाघूर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सिल्लोड-औरंगाबाद महामार्गावर बनकिन्होळा फाट्यावरील पूल खचल्याने औरंगाबादकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. आमठाणा गावात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने गावात जाण्यासाठी गावकऱ्यांना ट्रॅक्टरचा वापर करावा लागला. भराडी-शिसारखेडा रस्त्यावर पाणी साचल्याने शिसारखेड्याचा संपर्क तुटला होता.
 

बीड जिल्ह्यात पाच लाख ९५,५०० हेक्टर क्षेत्र बाधित

बीड - बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत १२ मिलिमीटर पाऊस झाला. बीड तालुक्यातील अकरा मंडळात ४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर पाटोदा तालुक्यातील चार मंडळात २५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यात चार मिलिमीटर तर गेवराई मंडळात १८ मि.मी. पाऊस झाला आहे.  शिरूर तालुक्यात २८ मि.मी. पाऊस तर अंबाजोगाई तालुक्यात १२ मि.मी पाऊस झाला. माजलगाव तालुक्यात ४९ मि.मी. तर केज तालुक्यात ३५, धारूर तालुक्यात ३५ तर परळी तालुक्यात २५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माजलगाव तालुक्यात पाऊस झाला.  जिल्ह्यातील १४०२  गावांत पावसामुळे नुकसान झाले असून ६ लाख ५१ हजार ७८३  शेतकऱ्यांपैकी  ५ लाख ५८ हजार ३०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यात जिरायती व बागायती  मिळून ५ लाख ९५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
 

कोळवाडीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
शिरूर | मागील पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस कोसळत असल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शिरूर तालुक्यातील कोळवाडी येथील शेतकऱ्याने राहत्या घरी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. दादासाहेब आश्रुबा घोडके (५६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिरूर तालुक्यातील कोळवाडी येथील दादासाहेब आश्रुबा घोडके ( ५६) यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता राहत्या घरी घराच्या अँगलला  गळफास लावून आत्महत्या केली. 
 

जालना : रायघोळ, केळणा, जुईसह पूर्णा नद्या दुथडी भरून वाहिल्या

शुक्रवार रात्री ११ ते शनिवार पहाटे ७ वाजेदरम्यान भोकरदनमध्ये ४४२  मिमी पाऊ
 
जालना - भोकरदन तालुक्यात रात्रीतून ४४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून रायघोळ, केळणा, जुईसह पूर्णा या तीनही नद्या दुथडी भरून वाहिल्या. यामुळे हे नदीपात्र ओलांडून जाणाऱ्या ग्रामस्थांना तासभरासाठी वाट मोकळी होण्याची वाट पाहावी लागली. शनिवारी दुपारनंतर भोकरदन ते प्रल्हादपूर, भोकरदन ते जाफराबाद, लिंगेवाडी ते जालना रोड, पिंपळगाव रेणुकाई ते पारध रस्ता, वालसा खालसा ते दावतपूर टाकळी आणि भोकरदन जाफराबाद रोडवरील सिपोरा ते बोरगाव जहागीर ह्या पुलावरची वाहतूक दोन तास बंद करण्यात आली हाेती.
भोकरदन शहरासह तालुक्यात अतिवृष्टीचा प्रकार मागील दहा दिवसांपासून सुरू असून शुक्रवार आणि शनिवारी पावसाने तालुक्यात कहरच केला. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू झालेल्या पावसाने शनिवारी पहाटे सात वाजता ब्रेक घेतला. हा पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात सुरूच होता. या पावसामुळे पिंपळगाव रेणुकाई, आन्वा तसेच धावडा या तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे केळना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या नदीच्या पुरामुळे भोकरदन-आलापूर रस्ता, नळकांडी पुलावरून पाणी गेल्याने बंद झाला. पुराचे पाणी वाढत गेल्याने पाण्याची उंची वाढून भोकरदन, जाफराबाद रोडवरील पुलावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद करण्यात आली होती. भोकरदनचा शनिवारी आठवडी बाजार असल्याने परिसरातील जवळपास ३० गावांतील ग्रामस्थांना भोकरदन शहरातच थांबावे लागले होते. पोलिसांनी तत्काळ तेथे येऊन बंदोबस्त करीत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, केळणा नदी शिवारातील आव्हाना, गोकुळ, हिसोडा, कोळी कोठा, लेहा, शेलूद, वडोदतांगडा, पारध खुर्द, पारध बुद्रुक या गावांना तहसीलदार संतोष गोरड यांनी सतर्कतेचा इशारा दिला.
 

धामना धरणातील पाणी पाहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता 
धामणा धरणातील पाणीपातळी पाहण्यासाठी गेलेला तरुण सांडव्यात पडून वाहिल्याच्या प्रकार भोकरदन तालुक्यातील शेलुद येथे शनिवारी दुपारच्या वेळी घडला. गजानन आत्माराम खराटे (३२) शेलुद असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.गजानन हा शेलुद येथील प्रकल्पातील पाणी पातळी पाहण्यासाठी दुपारच्या वेळी धरणाकडे गेला होता. धरण परिसरातील सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने गजानन हा सांडव्यातील पाण्यात पडल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.