आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्ये मुसळधार; अनेक नद्यांना पूर, पाच राज्यांत २७ जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- पंजाब, हरियाणा, चंदिगडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपल्याने सोमवारी या भागातील जनजीवन विस्कळीत झाले हाेते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही पावसाचा जाेर साेमवारी कायम हाेता.  परिणाम हिमाचलच्या बहुतांश जिल्ह्यांतील शाळा सोमवारी बंद होत्या. तर पंजाबमध्ये मंगळवारी सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.  


जम्मू-काश्मीरच्या दुर्गम डोडा जिल्ह्यात दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. कठुआ जिल्ह्यात पुरात अडकलेल्या २९ जणांचे प्राण वाचवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिमाचलमधील कांग्रा जिल्ह्यात एक व मनालीमध्ये कारसह पाच प्रवासी वाहून गेले. हिमाचलात सोमवारी सर्वत्र धुवाधार पाऊस झाला. हवामान खात्याने कुलूसाठी अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. हवाई दलाच्या जवानांनी कुलूनजीक नागविन भागातून एकाची सुटका केली.  हिमाचलमधील केलांगमध्ये सप्टेंबर महिन्यात २८ वर्षानंतर बर्फवृष्टी झाली.

 

पंजाबमध्ये पिकांचे मोठे नुकसान  
गेल्या ६० तासांतील सलग पावसामुळे पंजाबमधील धान, ऊस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील धान शेतीचे नुकसान झाले. पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये जगराओ, मलेरकोटला, संगरूर, मोगा, फतेहगड, पतियाळा आणि जालंधरचा समावेश आहे. धानाचे लवकर उत्पन्न येणारे वाण व व ऊस लोळला आहे. जालंधरमध्ये १ लाख ७० हजार हेक्टरमध्ये धान व १० हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. पाणी एक-दोन दिवस शेतात राहिल्यास पीक हातचे जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  

मनालीचा संपर्क तुटला  
मनालीचा जिल्हा मुख्यालय कुलूशी संपर्क तुटला आहे. गेल्या २४ तासांतील पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत.  मनाली-चंदिगड महामार्गावर रविवारी एक ट्रक व बस वाहून गेली. बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  हवामान केंद्रातील सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, गेल्या २४ तासांत चंबा जिल्ह्यातील डलहौसीमध्ये १७० मिमी, मनाली १२१ मिमी, चंबा ११७ मिमी, कांग्रा १२०.८ मिमी, पालमपूर १०८ मिमी, धर्मशाला ६२.६ आणि उनामध्ये ६२ मिमी पाऊस झाला. राजधानी सिमलामध्ये २३.१ मिमी पाऊस पडला.  

 

 

बातम्या आणखी आहेत...