आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महा’वादळाचा पाऊस, महाराष्ट्रावर महाआपत्ती; मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, खरिपाची पिके पाण्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन ते जाफराबाद मार्गावरील केळणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. २० वर्षांतील हा सर्वात मोठा पूर ठरला.   छाया : महेश देशपांडे - Divya Marathi
भोकरदन ते जाफराबाद मार्गावरील केळणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. २० वर्षांतील हा सर्वात मोठा पूर ठरला. छाया : महेश देशपांडे

औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जळगाव - अरबी समुद्रातील ‘महा’ वादळाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने राज्यात ६ बळी घेतले. मान्सूनोत्तर पावसाने हाताशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. रायगड, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त होता. 
 

मराठवाड्यात १४ मंडळांत अतिवृष्टी
औरंगाबाद - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यात शनिवारी जोरदार पाऊस झाला. विभागातील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यात पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, धावडा या तीन मंडळांत तसेच  सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड, भराडी, अंभई, अजिंठा, गोळेगाव, आमठाणा, निल्लोड, बोरगाव बाजार, वडोद बाजार, आळंद आणि सोयगाव या ११ मंडळांत अतिवृष्टी झाली. सिल्लोड-औरंगाबाद महामार्गावर बनकिन्होळा फाट्यावरील पूल खचल्याने औरंगाबादकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. बीड जिल्ह्यात पिंपळनेर व बीड शहरात दोन तास जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही पाऊस झाला.
 

तपानंतर गिरणा धरणाचे ८ दरवाजे  उघडले, हतनूरमधून विसर्ग 
जळगाव | पावसामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली. यामुळे शनिवारी सकाळी १२ वर्षांनंतर धरणाचे ८ दरवाजे १० फुटांनी उघडून नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. हतनूर धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले.
 

चाळीसगावात २० घरांची पडझड 
तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६६ मिमी पाऊस झाला. या अतिवृष्टीत विविध भागात २० घरांची पडझड झाली.
 

बुलडाणा :  खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडले  बुलडाणा जिल्ह्यात पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. खडकपूर्णाचे १९ तर पेनटाकळी प्रकल्पाचे पाच व येळगाव धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले.
 

मनमाडला ४०० घरांत पाणी 
मनमाड | गेल्या १५ दिवसांपासून शहर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा हाहाकार उडवून दिला. पांझण-रामगुळणा नदीला महापूर आला. यामुळे नदीपात्रालगतच्या ४०० घरांत पाणी शिरल्याने दीड हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. 
 

विविध घटनांत ६ जणांचा मृत्यू  

देगलूर : वीज कोसळून आजोबा-नातू ठार :  देगलूर तालुक्यातील मौजे टाकळी जागीर येथे शुक्रवारी सायंकाळी वीज पडून चंदररेड्डी वीररेड्डी बोपावाड (६५) व योगेश गोपाळ रेड्डी बोपावाड (१७) यांचा मृत्यू झाला.

मालेगाव : तलावात बुडून एक ठार : मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर शिवारातील रानमळा नाला तलावात बुडुन दारासिंग अर्जुन गुंजाळ (४३ रा. ढवळेश्वर, मूळ रा. चिखलओहोल) यांचा मृत्यू झाला. 

नागपूर : घराची भिंत कोसळून दोन ठार : बोरूजवाडा या गावात  पावसामुळे घराची जुनी भिंत कोसळून  सुरेश रामकृष्ण कनारकर (३८), अतुल शिवराम उईके (१७) हे दोघे  ठार तर अतुलची आई ऊर्मिला शिवराम उईके (४५)या गंभीर जखमी झाली. 

जालना : एक जण वाहून गेला :  भोकरदन तालुक्यात धामणा धरणातील पाणी पाहण्यासाठी गेलेले गजानन आत्माराम खराटे (३२, रा. शेलूद) हे सांडव्यात वाहून गेले.
 
 

बातम्या आणखी आहेत...