आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील सात मंडळांत अतिवृष्टी, दोन वर्षांनंतर तेरणेला आले पाणी; औरंगाबाद, लातूर, बीड, जालना जिल्ह्यांतही जोरदार पाऊस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - चार महिन्यांच्या पावसाळ्यानंतर शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत झालेल्या परतीच्या पावसाने कळंब, वाशी, परंडा तालुक्यातील ७ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. यामुळे दोन वर्षांनंतर तेरणा नदीला पाणी आले असून धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. उस्मानाबादसह कळंब, भूम, परंडा, वाशी या तालुक्यांतील काही मंडळांत ३० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने पाझर तलाव, साठवण तलावात काही प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे.

यंदा पावसाळा संपून परतीच्या पावसाला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तुळजापूर, लाेहारा, उमरगा तालुक्यांतील काही भागांत हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवार व शनिवारी उस्मानाबादसह कळंब, वाशी, भूम, परंडा तालुक्यांत बऱ्यापैकी हजेरी लावली. यामुळे दोन वर्षांनंतर तेरणा नदीला पाणी आले अाहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत जवळपास ५० टक्केच पाऊस झाला होता. मात्र, परतीच्या पावसाने दोन टप्प्यांत हजेरी लावल्याने सध्या जिल्ह्याची सरासरी ७५.७५ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. शनिवारी दिवसभर पावसाचे वातावरण होते, मात्र, रात्री जिल्ह्यातील काही भागांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे भीषण टंचाई असलेल्या भागात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पाण्यात गेले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे काड पाण्यात भिजल्याने नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी काढून गोळा केलेले सोयाबीन भिजले आहे. सुरुवातीच्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीनची वाढ झाली नाही, तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. यातून शिल्लक राहिलेले पीक काढणीचे काम सुरू होते. मात्र, परतीच्या पावसाने काही प्रमाणात हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

पावसाने शेतकऱ्यांची धावपळ
तेर - तेरसह परिसरामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने तेरणा नदीला पहिल्यांदाच पाणी आले हे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या धांदलीत असले तरी शेतकरी मात्र, सोयाबीन काढणी, भरडणीच्या कामात गुंतला आहे. त्यातच दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने काही भागांत हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक पाण्यात गेले आहे. सुरुवातीला पिकांना अपुरा पाऊस व काढणीच्या वेळी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, सततच्या ढगाळ वातावरणामुळे अळ्यांच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पीक संकटात सापडले. फवारण्या करून कसेबसे पीक वाचवले. परंतु, ऐन काढणीचा हंगाम सुरू झाल्यावर पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी काढून टाकलेले सोयाबीन, तर बहुतांश शेतकऱ्यांची तयार झालेला माल झाकण्यासाठी धांदल उडाली आहे. गत वर्षी पावसाळ्याच्या काळात अवघा ३३९ मिमी पाऊस पडला होता. त्यामुळे गेल्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा पिकांची पेरणी झाली नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. ऑक्टोबर महिन्यात चार दिवसांत ११० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे रब्बीची पेरणी होणार आहे.

शिराढोणमध्ये हातातोंडाशी आलेले सोयाबीन झाले मातीमोल
शिराढोण - कळंब तालुक्यातील शिराढोण येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, १० दिवसांपासून सोयाबीन काढण्यासाठी लगबग करत असलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात गेले आहे. हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याने परिसरातील शेतकरी सोयाबीन काढणीसाठी धावपळ करत होते. मात्र, मजुरांअभावी अनेकांचे सोयाबीन शेतातच असल्याने मातीमोल झाले आहे.

काही वर्षांत खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख निर्माण झाली आहे. या वर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रातील अत्यंत कमी पावसावर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर दोन महिने पावसाने या भागात उघडीप दिली. दोन महिन्यांच्या ओढीने या पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली व शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने थोडीफार हजेरी लावली. सोयाबीन काढणी दरम्यान ढगाळ वातावरणाने सोयाबीनच्या शेंगा वाळल्या, परंतु त्याची पाणे हिरवी राहिल्याने हे पीक काढावे का नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. सोयाबीनची पाने हिरवी राहिल्याने शेंगास बुरा येऊन ते बियाणे काळपट पडू लागले. यामुळे अनेकांनी सोयाबीन काढून शेतात वाळत ठेवले होते. त्या सोयाबीनची दोन दिवसांतल्या पावसामुळे माती झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून काढलेले सोयाबीन तरंगत होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीन मातीमोल
या वर्षी शेतात सर्व सोयाबीनची लागवड केली आहे. सुरुवातीला पावसाची कमतरता व किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले व सध्या काढून ठेवलेले सोयाबीनचे काड पावसाने संपूर्ण पाण्यात असून मातीमोल झाले आहे, अशी माहिती शिराढोणचे शेतकरी अवधूत पाटील यांनी दिली.
 

पावसाने उस्मानाबाद पालिकेची स्वच्छता चव्हाट्यावर
पावसाने शनिवारी (िद. १९) दुपारी उस्मानाबाद शहरासह परिसरात हजेरी लावली. दमदार पावसाने ठिकठिकाणी नाल्या तुंबून रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये-जा करावी लागत होती. यंदा सुरुवातीपासून पाऊस नसल्याने पालिकेने नाल्यातील गाळ काढण्याची तसदी घेतली नाही. परिणामी पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील बहुतांश ठिकाणी नालीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.
 

अतिवृष्टी मंडळनिहाय (पाऊस मिमी)
कळंब ६६
शिराढोण ७०
वाशी ८२
तेरखेडा ८२
पारगाव ७०
परंडा ८०
आसू ६५
 

३० ते ६४ मिमीपर्यंत पाऊस (मिमी)
इटकूर ६१
गोविंदपूर ५८
भूम ५३
ईट ५५
सोनारी ५५
उस्मानाबाद ग्रा.४९
ढोकी ४५
सावरगाव ४६
येरमाळा ४७
वालवड ४२
जवळा (बु.) ४७
अनाळा ४०
 

बातम्या आणखी आहेत...