Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Heavy raining in Maharashtra

राज्यात वादळी पावसाचा धुमाकूळ, मराठवाडा, विदर्भासह नाशिक जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान , राज्यात अनेक जिल्ह्यांत पारा २ ते ४ अंश सेल्सियसने घसरला

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 08:55 AM IST

उष्णतेची लाट ओसरताच गारपीट, विजा कोसळून तीन जण ठार

 • Heavy raining in Maharashtra

  औरंगाबाद- चार दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेने होरपळून निघालेल्या महाराष्ट्राला सोमवारी व मंगळवारी अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपले. विदर्भ, मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाने शेतीचे नुकसान केले. बीड जिल्ह्यात वीज पडून एक शेतकरी ठार झाला. विदर्भात विजा कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यातही वीज कोसळल्याच्या घटनेत महिलेसह दोन बालके भाजली. सोमवारी देशात सर्वाधिक ४५ अंश तापमानासह हॉट ठरलेल्या चंद्रपुरातही पारा तीन अंशांनी घसरला. नाशिक जिल्ह्यात या पावसाने १०० एकरांवरील डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.


  राज्यावरील हवेचा दाब कमी झाल्याने पाऊस
  राज्यावरील हवेचा दाब कमी झाल्याने पूर्व मोसमी पाऊस होत आहे. राज्यावर १००६ ते १००८ हेप्टा पास्कल हवेचा दाब आहे. पूर्व मोसमी हालचालींचा हा एक भाग आहे. मे अखेरपर्यंत अधूनमधून असा पूर्व मोसमी पाऊस होईल. येत्या आठवड्यातही राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
  : डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

  मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात मंगळवारी पहाटे गारपीट झाली. पपई, डाळिंब आणि द्राक्ष बागांना या गारपिटीचा मोठा तडाखा बसला. तालुक्यात ३० एकर फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने मंगळवारी तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. तुगाव, येणेगूर, डाळिंब, कोराळ या भागातील शेतकऱ्यांना या गारपिटीचा मोठा तडाखा बसला. मंगळवारी पहाटे काही भागात वादळी वाऱ्यानेही धुमाकूळ घातला. त्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाले. जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. नांदेडमध्येही दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हिंगोलीमध्येही पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. परभणीमध्ये पाथरी तालुक्यात पाऊस झाला. धारूर येथील दोन मेंढपाळांसह ४० मेंढ्या दगावल्या, तर एक मेंढपाळ यात गंभीर जखमी झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

  माजलगाव तालुक्यात वीज कोसळून शेतकरी ठार | मंगळवारी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड देवदहीफळ येथील एका शेतात वीज कोसळून श्रीहरी उपाख्य बंडू भानुदास वड्डे (वय ४१) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

  नाशिक : १०० एकरांवर डाळिंब बागांचे नुकसान
  नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस होत असल्याने कांदा, गहू आणि द्राक्षांचे नुकसान होत आहे. मंगळवारी बागलाण, निफाड आणि दिंडोरी तालुक्यात ठिकठिकाणी गारांसह अवकाळी पाऊस झाला. भोजापूर खोऱ्यात सोमवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने १०० एकरांवरील डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास सिन्नर व परिसरात सुमारे दीड तास पाऊस झाला.


  विदर्भ : वीज कोसळून दोघांचा मृत्यू
  अकोला- पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील काही भागांत मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही गावांमध्ये गारपीटही झाली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पळसखेड येथे वीज कोसळून एका महिलेचा, तर बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे फळबागा आणि काहींनी उशिरा लागवड केलेल्या गहू व इतर पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला खोळंबा झाला होता. पातूर तालुक्यातील पळसखेड येथील लता संजय चव्हाण (वय ३४) यांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला.
  बुलडाणा जिल्ह्यातही वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. श्रीराम शेषराव जाधव (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याशिवाय विजेमुळे रुईखेड मायंबा येथील एका महिलेसह जळगाव जामोद येथे दोन बालके भाजून जखमी झाली आहेत.

Trending