पहिल्या हजार दिवसांची / पहिल्या हजार दिवसांची गुंतवणूक

आपल्या सर्वांनाच आयुष्यभर योग्य पोषणाची आवश्यकता असते. वाढत्या वयातल्या मुलांच्या पोषणाकडे लक्ष पुरवण्याची तर नितांत आवश्यकता असते. त्या दृष्टीनं बाळाच्या जन्मानंतरचे पहिले हजार दिवस महत्त्वाचे ठरतात. यावर आधारित युनिसेफच्या संकल्पनेबद्दल सजग करणारा हा लेख.

हीना कौसर खान पिंजार

Aug 07,2018 06:50:00 AM IST

आपल्या सर्वांनाच आयुष्यभर योग्य पोषणाची आवश्यकता असते. वाढत्या वयातल्या मुलांच्या पोषणाकडे लक्ष पुरवण्याची तर नितांत आवश्यकता असते. त्या दृष्टीनं बाळाच्या जन्मानंतरचे पहिले हजार दिवस महत्त्वाचे ठरतात. यावर आधारित युनिसेफच्या संकल्पनेबद्दल सजग करणारा हा लेख.


आपल्या घरात नवीन बाळ येणार म्हटलं की, आपण बाळासाठी काय काय करायचं याची तयारी सुरू करतो. बाळाची सोय, बाळ आरामात असणं ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट होते. कपडे, खेळणी इतकंच काय, अगदी आपण कुठलं तेल, साबण, काजळ, पावडर याचाही विचार करू लागतो. पण अनेकदा बाळाच्या पोषणमूल्याचाच विचार दुय्यम ठेवला जातो. असं अजिबात नाही की, पालकांना आपल्या बाळाच्या वाढीची काळजी नसते. त्याला पोषणमूल्यं मिळावीत, असंही वाटत नसतं. आपल्या मुलाचं पोट व्यवस्थित भरावं, त्याची भूक नियमितपणे भागावी ही प्रत्येक कुटुंबाची काळजी असते, पण नकळत आपण पोट भरणे आणि पोषणमूल्यांसह भरणे यात फरक करायचंच विसरतो. गर्भधारणेपासून जन्मानंतर बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत जर त्यास योग्य पोषण नाही मिळालं तर त्याचा परिणाम बाळाच्या शारीरिक व बौद्धिक वाढीवर होणार असतो. खरं तर आपल्याला आयुष्यभरच योग्य प्रमाणातील पोषण मिळणं आवश्यक आहे. पण पहिली दोन वर्षं फार महत्त्वाची असतात. या दोन वर्षांत आपल्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा ठरत असतो.


पहिले एक हजार दिवस ही संकल्पना त्यातूनच जन्माला आली आहे. गर्भातील नऊ महिने व पुढील २४ महिने या एकत्रित दिवसांचा कालखंड म्हणजे एक हजार दिवसांचा कालखंड होय. युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्यविषयक कार्य करणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांना आपल्या सातत्यपूर्ण संशोधनातून पहिल्या एक हजार दिवसांतील बाळाची वाढ महत्त्वाची असल्याचे लक्षात आले आहे. या दिवसांचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो.


आपल्या आसपास आपण अशी काही मुलं पाहतो जी योग्य वजन नसल्याने सतत आजारी पडत असतात. ॠतुबदल झाला की, ही मुलं आजारी पडलीच म्हणून समजा. काही मुलांचं वय तर वाढलेलं असतं, पण ती जरा बुटकी दिसत असतात. त्यांच्या वयाच्या मानाने उंची लहान असते. मुलं नीट खेळत नाहीत. उंची वाढण्यासाठीचे खेळ खेळत नाहीत असं म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र, ती मुलं बुटकी नसून पोषणमूल्यांच्या अभावामुळे उंची खुंटलेली असते. आपल्या प्रौढावस्थेतील उंचीचा बहुतांश भाग हा आपल्या जन्माच्या पहिल्या दोन वर्षांतच ठरलेला असतो. उंची, वजन, वाढ, विकास योग्य झाल्यास मन, बुद्धीवरही त्याचा परिणाम होतो. अनेकदा आपण शाळांतून होणाऱ्या गळतीविषयी बोलताना त्या मुलांच्या कुटुंबाचे भटकेपण, गरिबी अशी कारणं पुढे करतो, मात्र कुठे तरी त्याही गोष्टीचं मूळ त्यांच्या शारीरिक क्षमतेतही असतं. मुलं जर आतूनच पोखरलेली असतील, त्यांचे पोषण योग्य झालेले नसेल, त्यांच्या भुकेची योग्य आहाराने काळजी घेतलेली नसेल तर मुलं डोकं वापरण्याच्या ठिकाणी कशी चित्त एकाग्र करू शकतील? शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गळतीमागे अपुरे पोषण हाही भाग असल्याचे म्हटले जात आहे.


म्हणूनच बाळाच्या आगमनासाठी आपण जितकी बाह्य तयारी करतो तितकीच त्याच्या पोषणाची तयारी करणं गरजेचं आहे. बाळाची उंची, त्याच्या डोक्याचा घेर, वजन, बौद्धिक वाढीचा वेग हे सारं काही पहिल्या हजार दिवसांच्या पोषणात दडलेलं असतं. पहिल्या हजार दिवसांत आपल्या बाळाच्या आयुष्यात नेमकं काय घडतं हे आपण समजून घ्यायला हवं तरच आपल्याला या हजार दिवसांचं महत्त्व खऱ्या अर्थाने कळणार आहे. युनिसेफच्या माता बालपोषण राज्य सल्लागार डॉ. गोपाळ पंडगे यांनी पहिल्या दोन वर्षांतील बाळाच्या वाढीविषयी फारच रोचक माहिती सांगितली आणि ती प्रत्येक पालकाने समजून घेणे गरजेचे आहे.


आपल्या बाळाची जन्मत:च उंची साधारण ५० सेंमी असते. त्यानंतर जन्मानंतरच्या वर्षभरात ती २४ सेंमीने वाढते आणि त्यापुढील वर्षात ती १२ सेंमीने वाढते. त्यानंतर साधारण पुढील चार वर्षं सरासरी पाचसहा सेंमीने वाढते. याचाच अर्थ बाळ जन्मतं तेव्हा त्याची ५० सेंमी उंची म्हणजे प्रौढ वयाच्या साधारण ३० टक्के झालेली असते. त्यानंतर वर्षभरात ७४ संेमी उंची म्हणजे ४५ टक्के वाढ, तर दुसऱ्या वर्षात ८६ संेमी म्हणजे प्रौढ वयाच्या उंचीपैकी ५० ते ५२ टक्के उंची पूर्ण झालेली असते. या वयात जर ती उंची खुंटली तर प्रौढ वयातही ती खुंटलेली राहणार हे उघड आहे. उंचीप्रमाणेच डोक्याचा घेरही पहिल्या दोन वर्षांत सर्वाधिक पूर्ण होतो. जन्मत:च सर्वसाधारणपणे बाळाच्या डोक्याचा घेर ३४.५ सेंमी असतो, पहिल्या वर्षात १२ सेंमी व दुसऱ्या वर्षात २ सेंमीने वाढतो. त्यानंतर मात्र पुढच्या चार वर्षांत म्हणजे बाळ सहा वर्षांचं होईपर्यंत डोक्याचा घेर २.९ सेंमीने वाढतो. याचाच अर्थ जन्मत:च बाळ सुदृढ असायला हवे आणि त्यानंतर पुढील दोन वर्षांत त्याच्या डोक्याचा घेरही बहुतांशी पूर्ण होतो. बाळाच्या वजनाच्या बाबतही पहिली दोन वर्षं महत्त्वाची असतात. पोषणमूल्यांनी भरलेले वजन असावे. अन्यथा जंक फूड खाऊन वजन वाढणे म्हणजे विविध आजारांना निमंत्रण देण्यासारखे असते. मात्र, योग्य आहारामुळे वजनवाढीचासुद्धा एक वेग ठरलेला असतो. जन्मत: सुदृढ बालकाचे वजन तीन किलो असते. पहिल्या सहा महिन्यांत बाळाचे वजन दुप्पट म्हणजे ६ किलो होते. पहिल्या वर्षात वजन जन्मवजनाच्या तिप्पट म्हणजे ९ किलो आणि दुसऱ्या वर्षात जन्मवजनाच्या चौपट म्हणजे १२ किलो होते.


पहिली दोन वर्षं केवळ शारीरिक वाढीसाठी महत्त्वाची नाहीत, तर बौद्धिक वाढीसाठीदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. बाळाच्या जन्मत:च त्याच्या मेंदूची ५० टक्के वाढ पूर्ण झालेली असते. पहिल्या दोन वर्षांत ८५ टक्के, तर पाच वर्षांपर्यंत ९० टक्के मेंदू विकसित झालेला असतो. आणि म्हणूनच योग्यरीत्या मेंदूचा विकास होण्यासाठी पहिली दोन वर्षं अत्यंत महत्त्वाची असतात. निसर्गाकडून आपल्या बाळाच्या शारीरिक व मानसिक मशागतीसाठी दोन वर्षं लाभलेली असतात, मात्र या काळात जर आपण दुर्लक्ष केले तर बाळाच्या आयुष्यभराचे ते नुकसान ठरू शकते. अलीकडच्या काळात या दोन वर्षांतील पोषणामध्ये स्तनपानाचाही अंतर्भाव अत्यंत आवश्यक मानला जात आहे. पहिले सहा महिने स्तनपान या संकल्पनेचा विस्तार आता बाळ दोन वर्षं पूर्ण करेपर्यंत स्तनपान असा केला जात आहे. बालपोषणाच्या अनुषंगाने युनिसेफकडून यासाठी प्रचार-प्रसार केला जात आहे. सहा महिन्यांनंतर ज्या प्रकारे बाळाला अन्य प्रकारे आहार दिला जातो तीच कल्पना यातही अंतर्भूत आहे. बाळ २४ महिन्यांचे होईपर्यंत स्तनपान केल्याने बाळाच्या शारीरिक, बौद्धिक वाढीबरोबरच आरोग्यही सुधारते. भलेही आईला सहा महिन्यांनंतर विशेष दूध येत नसेल तरीही तिने बाळाला २४ महिने स्तनपान द्यायला हवे. कारण त्यातून बाळाची विविध आजारांपासून सुरक्षा होते. दीर्घ स्तनपानामुळे मुलांच्या भविष्यातील आरोग्याची काळजी घेतली जाते. बाळाला तर स्तनपानाने पोषण मिळतेच, मात्र आईचीसुद्धा स्तनाचा कर्करोगापासून दूर राहण्याची शक्यता वाढते.


पहिले हजार दिवस आपल्या बाळासाठी आरोग्यदायी गुंतवणूक आहे. बाळ जन्मानंतर निसर्गाने आपल्या हाती तब्बल हजार दिवस दिले आहेत, ज्यात त्या बाळाच्या संपूर्ण आयुष्याची चांगली मशागत करणे शक्य आहे. यातून त्याच्या आयुष्यातील-भविष्यातील आजारपणांना अटकाव घालण्याची मुभा आहे. त्यामुळे आईबाबा होणाऱ्या प्रत्येकानेच आपल्या बाळाच्या इतर विम्याची तरतूद करतो त्याचप्रमाणे या पोषण विम्याचीही तरतूद केलीच पाहिजे हे नक्की!

- हीना कौसर खान पिंजार, पुणे
[email protected]

X
COMMENT