आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heirs Became Competitors; Ashok Chavan Bapusaheb Gorethakar To Contest In Bhokar

वारसदार बनले प्रतिस्पर्धी; भोकरमध्ये अशोक चव्हाण-बापूसाहेब गोरठेकर यांच्यातील लढत रंगतदार ठरणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकरराव चव्हाण, बाबासाहेब गोरठेकर , अशोकराव चव्हाण, बापूसाहेब गोरठेकर - Divya Marathi
शंकरराव चव्हाण, बाबासाहेब गोरठेकर , अशोकराव चव्हाण, बापूसाहेब गोरठेकर

नांदेड - भोकर मतदार संघातून माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपची उमेदवारी मंगळवारी जाहीर झाली. राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश झाल्यानंतर त्यांना भोकरमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांविरुद्ध रिंगणात उतरवले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होतीच. त्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे भोकरमधून अशोक चव्हाण-बापूसाहेब गोरठेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. पूर्वी दोघांच्याही वडिलांत राजकीय संघर्ष झाला. आता त्यांचे वारस राजकीय संघर्षात उतरलेत. 

भोकर हा मतदारसंघ परंपरागत चव्हाणांचा मानला जातो. शंकरराव चव्हाणांनी या मतदार संघातून विधान सभेत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर अशोक चव्हाणांनी प्रदीर्घ काळ या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१४ च्या निवडणुकीत अमिता चव्हाण या मतदार संघातून विजयी झाल्या. बापूसाहेब गोरठेकर यांनीही या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे वडील बाबासाहेब गोरठेकर यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चव्हाण-गोरठेकर कुटुंबीयांचा हा परंपरागत मतदार आहे. १९७८ मध्ये याच मतदार संघात शंकरराव चव्हाण विरुद्ध बाबासाहेब गोरठेकर अशी लढत झाली. त्यावेळी शंकरराव चव्हाणांना ३४ हजार ८९६ मते मिळाली. तर बाबासाहेब गोरठेकर यांना २३ हजार ६४५ मते  मिळाली. तब्बल ४१ वर्षाने या मतदार संघात आता इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. चव्हाण विरुद्ध गोरठेकर ही लढत पुन्हा पाहायला मिळणार आहे. फक्त पूर्वीच्या दोन्ही उमेदवारांचे चिरंजीव रिंगणात आहेत. 
 
 

मराठा मतांवर उमेदवाराचा निर्णय 
या मतदार संघात सर्वाधिक  ६०-६५ हजार मते मराठा समाजाची आहेत. मराठा समाजाचा कौल कोणाच्या बाजुने जातो यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. मुस्लीम आणि दलित मतेही या मतदार संघात निर्णायक ठरणारी आहेत. परंतु यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्हीचे उमेदवार रिंगणात राहणार आहेत. वंचित व एमआयएममध्ये होणाऱ्या मतविभाजनाचा फटका कोणाला बसतो यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. 
 

दोघांसाठी प्रतिष्ठेची लढाई 
अशोक चव्हाण आणि बापूसाहेब गोरठेकर या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून गोरठेकर भाजपवासी झाले. चव्हाणांची राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी गोरठेकरांवर विश्वास टाकला. त्यामुळे त्यांना ही लढाई जिंकणे गरजेचे आहे. अशोक चव्हाणांचा लोकसभेत पराभव झाला. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे त्यांनाही ही निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. तथापि भोकरचे मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात, यावर दोघांचेही राजकीय भवितव्य अवलंबून आहे.