आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलो, इन्स्पेक्टर! मुलगा जिवंत हवा असेल, तर पन्नास लाख द्या !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकांत सराफ

सायंकाळी साडेचार-पाचची वेळ. म्हणजे फार अंधार दाटून आला नव्हता. पण हिवाळा असल्याने वातावरणात थोडासा काळपटपणा आला होता. त्यातच पोस्ट ऑफिस कॉलनीतील दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला रस्ता बुडाला होता. चांगली मोठमोठी झाडं होती. त्यापलीकडे बराचसा निर्जन भाग. त्यात एक नाला. फक्त पावसाळ्यात पाणी असायचं त्यात. वारंवार मागणी करूनही महापालिकेनं नाल्यावर पूल बांधलाच नाही. त्यामुळे शहरात किंवा बाजारपेठेत जायचं तर कॉलनीतील रहिवाशांना किमान एक किलोमीटरचा फेरा पडत होता. अर्थात त्यात रहिवाशांना फारसं वाईट वाटत नव्हतं. कारण प्रत्येक जण किमान पन्नास कोटी रुपयांचा मालक होता. त्यांची गावात एक तर मोठी दुकाने, गोडाउन्स होती किंवा एमआयडीसीमध्ये कारखाने होते. सगळा बडा मामला होता. सगळ्या घरांसमोर चारचाकी होतीच, पण ती दुकान-कारखान्यांवर जाण्यासाठी वापरली जात होती. मुलांना, नातवांना शाळेत नेण्या-आणण्यासाठी रिक्षा लावल्या होत्या. एका रिक्षात एका घरातील दोनच मुले असा नियम त्यांनी केला होता. शहरातील सर्वात प्रसिद्ध जेरोमी वाइन्सचे मालक जोसेफ मिलान यांचा इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आर्मोज तर एकुलता एक होता. त्याच्यासाठी त्यांनी स्वतंत्र रिक्षा लावली होती. तीन वर्षांपासून रिक्षाचालक धीरजचा दिनक्रम ठरला होता. सकाळी ८.५५ वाजता मिलान यांच्या बंगल्यासमोर उभे राहायचे, ८.५८ वाजता आर्मोज रिक्षात बसायचा, ९.२० वाजता शाळेत पोहोचवायचे, संध्याकाळी ४.१० वाजता पुन्हा शाळेत जायचे, आर्मोजला घेऊन ४.३५ च्या सुमारास घरी पोहोचायचे. येताना थोडा जास्त वेळ लागायचा. कारण शाळेत पोहोचण्याची घाई नसल्याने धीरज रिक्षा थोडी हळू चालवायचा. शिवाय सायंकाळी वाहनेही जास्त असायची. 

जोसेफ मिलान यांची वेगवेगळ्या सहा शहरांत वाइन शॉप्स होती. अर्थात त्यातील दोन शॉप्स त्यांना सावत्र भावांच्या-विलिस आणि डेव्हिडच्या नावावर करावी लागली होती. तीन दुकानांचे कामकाज त्यांनी त्यांच्या बहिणीचा नवरा ॲलेक्सवर सोपवले होते. ॲलेक्स महिन्यातून एकदा जोसेफ यांना भेटून पैशांचा हिशेब द्यायचा. दोघांमध्ये फार सौख्याचे संबंध नसले तरी तणावाचेही नव्हते. दुकानांचा कारभार पाहण्याची जबाबदारी दिल्यामुळे ॲलेक्स आपल्या बहिणीकडे दुर्लक्ष करणार नाही, असा जोसेफ यांचा कयास होता. तो अधूनमधून खरा निघायचा. कधी अचानक बहीण ‘ॲलेक्स शिवीगाळ करतोय’, अशी तक्रार करायची. तो एका बाईच्या नादाला लागलाय, असेही म्हणायची. पण काही दिवसांनी आमचं बरं चाललंय, असंही सांगायची. नशीब म्हणजे जोसेफ यांच्यामागे सावत्र भावांची काहीच थेट कटकट नव्हती. आपण जोसेफपेक्षा वयाने, अनुभवाने लहान आहोत. जोसेफनेच दोन दुकानांची सहा दुकाने केलीत, हे त्यांना पक्के ठाऊक होते. आई-वडील जग सोडून गेलेत. जोसेफच आपला त्राता आहे, यावर त्यांच्या बायकांचा फारसा विश्वास नसला, तरी त्यांचा होता. पण जोसेफची गोवेकरी पोर्तुगीज पत्नी मार्थाचं कायम अंतर ठेवून वागणं त्यांना अपमानास्पद वाटायचं. अलीकडे संसारात येऊ लागलेलं स्थैर्य पाहून ते अपमान गिळण्यास शिकले होते. ‘तुम्ही एकदा मार्थाला धडा शिकवलाच पाहिजे’, हे बायकांचे तीव्र शब्दांतील बोलणे दोघेही दुर्लक्षून टाकत. सावत्र भावांच्या बायका मार्थाबद्दल वाईट बोलतात, हे कानावर आल्यापासून जोसेफ यांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे सुरू केले होते. येणाऱ्या काही वर्षांत दारूचे ठेके मिळवून दोन्ही भावांची खेडेगावांमध्ये रवानगी करण्याचा बेत त्यांनी आखला होता आणि दुसरीकडे मार्थालाही डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवण्याचा सल्ला देणे सुरू केले होते. ‘आर्मोजची पूर्ण काळजी घेणारा रिक्षाचालक धीरजशी भांडणे योग्य नाही. महिन्याचे एक हजार रुपये त्याला वाढवून दिल्याने काहीही फरक पडणार नाही’, असे ते सांगत होते. कोणी कसेही वागले तरी त्यांच्याशी भांडून वेळ घालवू नये, हे तत्त्व पाळत होते. तरीही त्यांचा खास मर्जीतला मॅनेजर आणि दूरचा आतेभाऊ रॉजर किरकोळ कारणावरून आरडाओरड का करतोय, सारखे पैसे का पळवतोय, हेच त्यांना कळत नव्हते. त्यांनी त्यांचे मित्र पोलिस इन्स्पेक्टर शेवाळे यांच्या कानावर हा प्रकार घातला होता, पण लेखी तक्रार दिली नव्हती. यातून मार्ग निघेल, असे त्यांना वाटत असतानाच विपरीत घडले. 

आर्मोजला शाळेतून घेऊन येत असताना व्हॅनमधून आलेल्या तीन बुरखाधारी गुंडांनी डोक्याला पिस्तूल लावून धीरजला रोखले. आर्मोजला व्हॅनमध्ये कोंबून ते नाल्यातून पसार झाले. तासाभरात दुकानात फोन आला. पन्नास लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्या मुलाचा मृतदेह पाहण्यास मिळेल, असे ते गुंड म्हणत होते. इन्स्पेक्टर शेवाळेंनी तातडीने हालचाल सुरू केली. इकडे आर्मोजचे अपहरण नेमके कोणी आणि का केले असावे, या विचाराने जोसेफ, मार्था हैराण होऊन गेले होते.     
--------------------------------
कोणी केले असावे आर्मोजचे अपहरणॽ तुमचे पूर्ण नाव, गावाचे नाव यांसह ९३४००६१६२५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर उत्तर पाठवा. अचूक उत्तर देणाऱ्या निवडक वाचकांची नावे पुढील भागात प्रसिद्ध केली जातील.