आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी ठोठावला ६६४ वाहनचालकांना दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पोलिस प्रशासनाने शहरात हेल्मेटसक्ती व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक केले आहे. शनिवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे व सीट बेल्ट न वापरता चारचाकी वाहन चालवणाऱ्यांवर शनिवारी दिवसभर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यात पहिल्याच दिवशी तब्बल ६६४ वाहनचालकांना दंडत्मक कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्याकडून २ लाख ५१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. वाहनचालकांनी मात्र या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. 

 

नगर शहरात वाहतूक व्यवस्थेचा बाेजवारा उडाला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओ, तसेच महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या महिन्यात तब्बल ६१७ जणांना वेगवेगळ्या अपघातात प्राण गमवावे लागले. नगर जिल्हा अपघातमुक्त झाला पाहिजे, अपघातांचे प्रमाण कमी झाले पाहिजे, त्याचबरोबर अपघातात कुणालाही आपला जीव गमवावा लागू नये, या उद्देशाने पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी १ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश मोरे यांनी शनिवारी सकाळपासूनच शर्मा यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. 

 

नगर- औरंगाबाद महामार्गावरील डीएसपी चौक, नेप्ती चौक, दिल्लीगेट आदी ठिकाणी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. पोलिस प्रशासनाने आठ दिवस अगोदरच १ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले होते. असे असले तरी कारवाईच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३४३ वाहनचालक विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे समोर आले. या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात स्वत: हेल्मेट घालून ही कारवाई केली. विनासीट बेल्ट चारचाकी वाहन चालवणाऱ्या १९७ वाहनचालकांवरही अशाच पध्दतीने कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहनचालकांची चांगलीच धावपळ उडाली. ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार आहे. वाहनचालकांनी हेल्मेटसह सीट बेल्ट वापरून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले. 

 

६५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही झाली कारवाई 
शहर वाहतूक शाखेने सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेकांची धावपळ उडाली. हेल्मेट नसल्यामुळे दंडात्मक कारवाई होत असताना अनेकांनी पुढारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केले. परंतु वाहतूक पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात महापालिका, जिल्हा परिषद, आयकर विभाग, पोलिस विभागातील ६५ शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या कारचालकावरही कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.  हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर शनिवारी सकाळी डीएसपी चौकात कारवाई करण्यात आली. 
अनेकांनी कारवाई न करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दबावाला बळी न पडता कारवाई केली. िनरीक्षक अविनाश मोरे यांनी एका वाहनचालकाला चक्क 'हात जोडतो, पण कारवाई करणारच' असे म्हणत कारवाई केली. दुसऱ्या छायाचित्रात आयकर अिधकाऱ्याच्या वाहनचालकावर कारवाई करण्यात आली. 

 

९ महिन्यांत ६१७ जणांनी गमावला जीव 
शहरासह जिल्ह्यात अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १ हजार १७३ अपघात झाले असून त्यात ६१७ जणांनी आपला जीव गमावला. ६९१ जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे हे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी, तसेच अपघातात कुणाचाही जीव जाऊ नये, या उद्देशानेच हेल्मेटसक्ती व सीट बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे िनरीक्षक अविनाश माेरे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना शनिवारी स्पष्ट केले. 

 

कारवाई नागरिकांच्या भल्यासाठीच... 
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. दुचाकीचालकांनी हेल्मेट, तर चारचाकी चालकांनी सीट बेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सक्ती वाहनचालकांच्या भल्यासाठीच करण्यात आली आहे. नऊ महिन्यांत झालेल्या एक हजारपेक्षा अपघातांमध्ये ६१७ जणांचा जीव गेला. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर केला असता, तर यापैकी अनेकांचे जीव वाचले असते. त्यामुळे शहर व उपनगरांतील वाहनचालकांनी कारवाईला विरोध करण्याएेवजी नियम पाळावेत, ते त्यांच्याच भल्यासाठी आहेत. अविनाश मोरे, निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा  

बातम्या आणखी आहेत...