Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | helmet not compulsory in city according rti

शहरात हेल्मेट सक्ती नियमबाह्यच... माहिती अधिकारातून आले सत्य समोर

प्रतिनिधी | Update - Feb 06, 2019, 11:00 AM IST

हेल्मेट नसलेल्या हजारो दुचाकी चालकांकडून लाखो रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला.

 • helmet not compulsory in city according rti

  नगर - गेल्या महिनाभरापासून शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट नसलेल्या हजारो दुचाकी चालकांकडून लाखो रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. मात्र, ही हेल्मेट सक्ती चुकीची असल्याचे माहिती अधिकारातून पुढे अाले आहे. महापालिका हद्दीत हेल्मेट सक्ती करता येत नसल्याचे उत्तर पुणे येथील वाहतूक नियंत्रण शाखेने माहिती अधिकारात दिले आहे. दरम्यान, हेल्मेट सक्ती ही दुचाकीचालकांच्या भल्यासाठीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


  शहरात १ डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. जोपर्यंत शंभर टक्के वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत, तोपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. परंतु केवळ दंडात्मक कारवाई करून हेल्मेट सक्तीची मोहीम यशस्वी झाली नाही. हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने नागरिकांनी नाकं मुरडण्यास सुरुवात केली. अनेकांनी पोलिसांना चकवा देत पर्यायी मार्ग शोधले. पुणे शहराप्रमाणेच नगरमधील काही संघटनांनी देखील या सक्तीला विरोध दर्शवला. पोलिस व जिल्हा प्रशासनाने मात्र हा विरोध झुगारून हेल्मेट सक्ती करत दंडात्मक कारवाई केली. लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, नियमाप्रमाणे महापालिका हद्दीत हेल्मेट सक्ती करताच येत नसल्याची वस्तुस्थिती नुकतीच समोर आली आहे. पुणे येथील एका सामाजिक कार्यकत्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत हेल्मेट सक्तीचे सत्य समोर आणले. महापालिका हद्दीत हेल्मेट सक्ती करता येत नाही, असे उत्तर पुणे वाहतूक नियंत्रण शाखेने माहितीच्या अधिकारात दिले अाहे. त्यामुळे पुणे शहराप्रमाणेच नगर शहरातील हेल्मेट सक्तीची माेहीम वादात सापडली आहे. असे असतानाही पोलिसांकडून मात्र चौकाचौकात हेल्मेट सक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, हेल्मेट सक्ती ही दुचाकीचालकांच्याच भल्यासाठी आहे. हेल्मेट वापरल्यास अनेकांचे जीव वाचतील, त्यामुळे नियम काय सांगतो त्यापेक्षा हेल्मेट वापरण्याच्या फायद्यांकडे पाहिले पाहिजे, अशी पोलिसांची भूमिका आहे.


  आरटीओ कार्यालयात हेलपाटे
  हेल्मेटसक्तीची शिस्त लावण्यासाठी दंडासोबतच वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार अनेकांचे वाहन परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वाहन परवाना काढण्यासाठी चालकांना आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. शहरासह जिल्ह्यात दररोज सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.


  हेल्मेट 'सक्ती' नव्हे तर गरज
  महापालिका हद्दीत अनेकांना हेल्मेट नसल्यामुळे जीव गमवावा लागलेला आहे. मागील काही दिवसांत कोतवाली ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांनी हेल्मेटचा वापर केला असता, तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळेच हेल्मेट वापरण्याकडे 'सक्ती' म्हणून न पाहता एक गरज म्हणून पहावे, अशी नगर पोलिसांची भूमिका आहे.


  पालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही
  महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८८ चे कलम १२९ प्रमाणे पालिका क्षेत्रांमध्ये सर्व दुचाकी चालवणाऱ्या अथवा मागे बसलेल्या व्यक्ती, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता इतर रस्त्यांवर दुचाकी चालवणाऱ्या व्यक्ती, ५० क्यूबिक सेंटीमीटरपेक्षा कमी क्षमतेचे इंजिन बसवलेल्या दुचाकी मोपेड चालवणाऱ्या व्यक्तींना हेल्मेट सक्ती लागू होणार नसल्याचे उत्तर पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने माहितीच्या अधिकारात दिलेले आहे. यावरून हेल्मेट सक्ती कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

Trending