आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकीवर घातले शिरस्त्राण म्हणून वाचले दाम्पत्याचे प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- यमराज बनून भरधाव वेगात जाणाऱ्या स्कुल बसने आडगाव जवळ दुचाकीला जाेरदार धडक दिली, मात्र सुदैवाने दुचाकी चालकाप्रमाणेच पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नीनेही हेल्मेट परिधान केले असल्याने उभयतांचा जीव वाचला. या भीषण अपघातात पती-पत्नी दाेघेही दुचाकीवरून फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. परंतु हेल्मेटमुळे दाेघांच्याही डाेक्याला इजा पाेहाेचली नाही आणि त्यांचे प्राण वाचले. या निमित्ताने हेल्मेट खऱ्या अर्थाने देवदूत ठरल्याची प्रचिती जखमी गायकवाड दांपत्याला आली. शुक्रवारी (दि. ४) सकाळी पावणे आठला मेडीकल फाटा कच्चा रस्त्यावर हा अपघात घडला. यावेळी सदरहू बस चालकाने जखमींना मदत न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि रवीकिरण गायकवाड (रा. गुलमोहरनगर, म्हसरूळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते दुचाकीने म्हसरूळ लिंक रोडने ओझरकडे जाताना एमएच १५ एफव्ही ७४९२ क्रमांकाच्या बसने त्यांना जाेरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गायकवाड वत्यांच्या पत्नी साक्षी या रस्त्यावर जोराने फेकल्या गेल्या. परिणामी उभयतां गंभीर जखमी झाले. मात्र सुदैवाने दोघांनीही हेल्मेट घातले असल्याने त्यांच्या डोक्याला साधे खरचटलेही नाही. रस्त्यावर जोरात आपटल्याने साक्षी यांचा हात व पाय फ्रॅक्चर झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गायकवाड यांना मुका मार लागला. केवळ हेल्मेटमुळेच दाेघेही वाचले. दरम्यान, आडगाव पोलिसांत बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

हेल्मेटमुळे वाचलो.... 
दुचाकीवर हेल्मेटचा वापर नियमित करतो. तसेच बाहेर कुठेही जातांना पत्नीला देखील हेल्मेट वापरण्यास सांगतो. या गंभीर अपघातात साक्षात मृत्यूच आमच्यासमोर होता. मात्र हेल्मेट घातलेले असल्याने दोघांच्या डोक्याला काहीही इजा झाली नाही. केवळ हातापायाच्या दुखापतीवर निभावले. एवढ्या गंभीर अपघातातूनही जीव वाचल्याचे श्रेय हेल्मेटला द्यावे लागेल. प्रत्येक दुचाकीचालकाने हेल्मेटचा आवर्जून वापर करावा. - रवीकिरण व साक्षी गायकवाड