आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातग्रस्तांना मदत करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या विहीणबाई शैला राऊतमारे यांचे घर तार ऑफिसच्या समोर आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली. नुकताच या कुटुंबावर मोठा आघात झाला. 19 एप्रिल रोजी जालना येथे विवाह समारंभास त्या गेल्या होत्या. विवाह आटोपून रात्री 9.30 च्या सुमारास औरंगाबादला उतरल्या. घराजवळच पोहोचले आहे आणि लवकरच घरी पोहोचत असल्याचा निरोप त्यांनी मुलीला दिला. परंतु बराच वेळ झाला, त्या घरी पोहोचल्याच नसल्याने राऊतमारे कुटुंबीय काळजीत पडले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या मुलीला फोन आला की, तुझ्या आईला जालना रोडवर अपघात झाला असून उपचारांसाठी एमजीएममध्ये दाखल करण्यात आले आहे. आपण त्वरित तेथे या. सर्वजण एमजीएममध्ये पोहोचलो. समोरचे दृश्य पाहून सर्वजण सुन्न होऊन गेले. दोन अनोळखी तरुणांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली. पण दवाखान्यात नेण्याची कोणी तयारी दाखवत नव्हते. लोक केवळ अपघात पाहून निघून जात होते. पोलिसांचीही मदत पोहोचली नव्हती. पण दोन तरुण पुढे आले. त्यांनी शैलाताईंना रिक्षातून एमजीएममध्ये अपघात विभागात दाखल केले. त्यांच्या रूपाने देवच भेटला होता. या तरुणांनीच विहीणबाईच्या पर्समधील मोबाइल शोधून कॉल करून माहिती कळवली होती. रक्तस्राव जास्त झाल्याने विहीणबाईचे प्राण वाचवता आले नाहीत. कदाचित, यापूर्वीच कोणीतरी दवाखान्यात नेले असते तर.. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. पण सर्व उपाय हरले. ही मुले त्या घटनेनंतर घरी आली. त्यांनी सर्व प्रसंग सांगितला. बोलण्यातून परिचय झाला. त्यांनाही झालेल्या घटनेने वाईट वाटले. या मुलांनी निदान मदत तरी केली, हे पाहून त्या मुलांनी दाखवलेल्या माणुसकीचे आम्हाला कौतुक वाटले. आम्ही त्यांचे आभार मानले. शेवटी काय तर अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याची वृत्ती सर्वांचीच असली पाहिजे.