आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परोपकारांची परतफेड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन 1971 मधील घटना. त्र्यंबकेश्वरातील रोहिले माझे गाव. मी त्यावेळी बिटको महाविद्यालयात शिकत होतो. माझे वडील गावचे सरपंच होते. ते फक्त पहिली इयत्ता शिकलेले होते. आमचा रोहिले डोंगराळ, दुर्दम व आदिवासी परिसर होता. लोकसभेला ठाणे जिल्ह्यातील डहाणू तर विधानसभेला इगतपुरी मतदारसंघ होता. रोहिले पंचक्रोशीला सरकारी योजनांचा लाभ मिळावा, ग्रामस्थांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून वडिलांनी ग्रामविकासासाठी स्वत:ला झोकून दिले होते. सायफन पद्धतीने पाणीपुरवठा योजना, रस्ते, बससेवा, वीज आणि आरोग्यसेवा, पशुवैद्यकीय सेवा, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, रोहिले आदिवासी विकास संस्था गोडावून बांधण्यासाठी चुलत्यांनी जमीन दान केली. गावात सामंजस्य आणि ऐक्य होते.

लोक वडिलांना आदराने देवमाणूस म्हणत असत. गावात भांडणतंटे झाले तर पोलिस स्टेशनला न जाता, आमच्या वडिलांकडे येत होते. ते सलग 15 वर्षे गावचे सरपंच होते. 1971 मध्ये ते आजारी पडले. पंचवटीत डॉ. जोशींच्या दवाखान्यात त्यांना दाखल केले. आईला त्यांच्या सेवेसाठी महिनाभर दवाखान्यात राहावे लागले. मी कॉलेजात शिकत होतो. शेतीकडे लक्ष देणारे कोणी नव्हते. जुलै -ऑगस्टचा तो काळ भातशेतीसाठी महत्त्वाचा होता. गावक-यांनी स्वयंस्फूर्तीने विनामोबदला आवनात नांगर धरून गाळ तयार करणे, भाताची रोपे खणून आवनात लावणे, अशी सगळी कामे केली. केलेले वाया जात नाही आणि केल्याशिवाय काही मिळत नाही, हा भगवद्गीतेतला सिद्धांत मला प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाला.