आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ जाहीर करण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड -  घरात धान्य नाही, गाेठ्यात गुरांना चारा नाही, विहिरीत पाण्याचा थेंब नाही म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना  त्वरित मदत करावी, अशी मागणी सटाणा, गाढे जळगाव, देमणी वाहेगाव, शेकटा (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली.   


पावसाने हुलकावणी दिल्यामुळे औरंगाबाद तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पाणीटंचाई, चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शनिवारी (दि. २७)  पालकमंत्री डॉ. सावंत, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, तहसीलदार सतीश सोनी, तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी औरंगाबाद तालुक्यातील सटाणा, वाहेगाव, गाढेजळगाव आदी गावांचा दौरा केला.  परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर  पिकांची,  पाणीटंचाईची व चाराटंचाईची पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांनी सावंत यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला.  

 

सरकार हे शेतकऱ्यांचे मायबाप असून शेतकऱ्यांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी  ठोस अनुदान जाहीर करावे तसेच जागोजागी चारा छावण्या उभाराव्यात,  वाढीव टँकर उपलब्ध करून द्यावे. मागील वर्षी सरकारने बोंडअळीसाठी हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५०० रुपयेच जमा केले. उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आदी मागण्या  शेतकऱ्यांनी केल्या.  


मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल ठेवू : गाढेजळगाव येथे पालकमंत्री सावंत शेतकऱ्यांना उत्तर देताना म्हणाले की, जिल्ह्याच्या परिस्थितीचा अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाईल व दुष्काळाबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. 

 

चार दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन
पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दुष्काळी दौऱ्याचा ताफा गाढे जळगाव शिवारात येताच शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत कमी पण कृषी सहायकाच्या विरोधात जास्त चर्चा घडवून आणली. या वेळी शेतकऱ्यांनी कृषी सहायक सूर्यवंशींच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. कृषी सहायकाशी आर्थिक तडजोड न झाल्यामुळे अनेक शेतकरी या शासकीय योजनेपासून वंचित राहिले आहेत. या कृषी सहायकावर चार दिवसांत कारवाई केली जाईल, असे शेतकऱ्यांना अाश्वासन पालकमंत्री डॉ. सावंत यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...