आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसाव्या 'पुणे फेस्टिव्हल'मध्ये हेमा मालिनींचे २७ वे नृत्य; शुक्रवारी होणार शानदार उद््घाटन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३० वर्ष असून ख्यातनाम अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नृत्याने थेट सत्ताविसाव्यांदा या महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आदींच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी (दि. १४) पुणे फेस्टिव्हलचे उद््घाटन होणार आहे. सार्वजनिक जीवनातून अघोषित निवृत्ती घेतलेल्या कलमाडींनी पत्रकार परिषदेत यंदाच्या पुणे फेस्टिव्हलची घोषणा केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे त्यांनी सांगितले. फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक कृष्णकांत कुदळे आदी या वेळी उपस्थित होते. 


फेस्टिव्हलचे औपचारिक उद््घाटन शुक्रवारी दुपारी हेमा मालिनी यांच्या गणेशवंदन नृत्याने होणार आहे. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार आहे. प्रख्यात कथ्थक नृत्यांगनांचे नृत्य आणि महाराष्ट्र मंडळाच्या मुलामुलींची आकर्षय योग प्रात्यक्षिकेही होतील. १८ महिलांनी केलेले 'पोवाडा फ्यूजन' हे उद््घाटन सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर, ज्येष्ठ गायक सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे सादरीकरण असणारा 'स्वरांजली' कार्यक्रम, अनेक भारतीय नृत्यप्रकारांचा समावेश असणारा 'फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया' हा नृत्याविष्कार, प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र, नौशाद व जयदेव यांच्या स्मरणार्थ 'ट्रिब्यूट टू बॉलीवूड म्युझिक लिजंड्स' आदी नृत्य व संगीत कार्यक्रम ही यंदाची वैशिष्ट्ये असतील. 


विक्रम गोखलेंना पुरस्कार 
विविध क्षेत्रांतील मान्यवरांना दरवर्षी 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड'ने गौरवले जाते. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांना यंदाच्या पारितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...