सुंठीची कढी / सुंठीची कढी

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे राहात नसलो तरी कारणपरत्वेे खूप वेळा तिकडे जाणं होत असतं. ‘पाटपाणी‘च्या निमित्ताने मी जी पाककृती सांगणार आहे ती आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनते का, मला माहीत नाही. हिचं नाव आहे ‘सुंठीची कढी.’ नावात जरी ‘कढी’ असलं तरीही मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही.

हेमा वेलणकर

हेमा वेलणकर

Aug 28,2018 12:37:00 AM IST

कोकणात आमचं खूप मोठं एकत्र कुटुंब आहे. आम्ही कायम जरी तिकडे राहात नसलो तरी कारणपरत्वेे खूप वेळा तिकडे जाणं होत असतं. ‘पाटपाणी‘च्या निमित्ताने मी जी पाककृती सांगणार आहे ती आमच्या घरची खास चीज आहे. दुसऱ्या कोणाकडे ती बनते का, मला माहीत नाही. हिचं नाव आहे ‘सुंठीची कढी.’ नावात जरी ‘कढी’ असलं तरीही मुख्य जेवणासाठी करायचा हा पदार्थ नाही.


आमच्या घरात काही कार्य झालं किंवा सणावाराचं ओळीने चारपाच दिवस जड जेवण झालं असेल तर पाचक म्हणून, तोंडाला रुची यावी म्हणून ही केली जाते. ‘माझं पोट जरा ठीक नाहीये. सुंठीची कढी केली तर उद्या सकाळी घेईन म्हणतो,’ अशी वातावरण निर्मिती करत माझ्या नणंदबाईंना ही कढी करण्यासाठी त्यांचा एखादा भाऊ गळ घालतो. त्याही ‘मी का म्हणून करू, मी माहेरवाशीण आहे या घरची, हवी असेल तुला तर सांग तुझ्या बायकोला करायला’ वगैरे लटकेच त्याला सुनावतात. पण त्या ही कढी करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांना करायची हौसही आहे हे घरात सगळ्यांनाच माहीत असल्यामुळे त्या उद्या नक्की कढी करतील याबद्दल सगळ्यांनाच खात्री असते.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी चहाकॉफी वगैरे झाली की त्या कढी करायला घेतातच. हिची कृती अशी फार खास नाहीये पण तरीही हा आमच्या घरचा फार खास पदार्थ आहे. अगदी सणावाराच्या पक्वान्नांपेक्षाही घरात सर्वांना आवडणारा. करायचं काय तर आंबट ताकात सुंठ उगाळायची, (कढीसाठी म्हणून खास घरच्या आल्याची सुंठ करून ठेवलेली असते आमच्याकडे.) खरं तर हेच फार किचकट आणि वेळखाऊ काम आहे. सुंठ पूड वापरून तो स्वाद येत नाही. त्यामुळे सुंठ उगाळावीच लागते. आमच्या घरात माणसं खूप असल्याने आणि ही कढी सर्वांचीच आवडती असल्याने तशी करावीही लागते भरपूर प्रमाणात. नणंदबाई माजघरात बसून सहाणेवर सुंठ उगाळत असतात.

स्वयंपाकाच्या गडबडीतून वेळ काढून जरा जास्त दूध, साखर घातलेल्या आणि जायफळ लावलेल्या गरमगरम कॉफीचा कप श्रमपरिहार म्हणून त्यांची एखादी सून त्यांना आणून देते. घरातली मुलंही छोट्याछोट्या सहाणेवर सुंठ उगाळून आत्याआजीला मदत करत असतात. ओटीवरून ही किती झालीय सुंठ उगाळून, लावू का हातभार उगाळायला अशी मदतीची ऑफर येते. कढीच्या आशेने हळू हळू घरातली सगळी मंडळी नणंदबाईंभोवती गोळा होतात आणि सुंठ उगाळता उगाळता तिथेच गप्पाही रंगतात. शेवटी पुरेसा तिखटपणा ताकात उतरतो आणि सुंठ उगाळण्याचे किचकट काम एकदाचे संपते. मग त्यात थोडे मीठ, थोडा हिंग घालतात. आणि शेवटी आमच्याकडे या कढीसाठीचा म्हणून एक खास ठिक्कर/ दगड आहे, तो गॅसवर चांगला गरम करून त्या ताकात घालतात. ठिकरीमुळे ते ताक हलकेसे गरम होतं. बस्स इतकीच कृती. झाली सुंठीची कढी तयार. ती ठिक्कर ताकात घातली की चुर्रर्रर्र असा आवाज येतो त्यामुळे कढी तयार झाल्याचं सगळ्या घराला समजतं. प्रत्येकाला वाटीत कढी दिली जाते. ती हिंगाचा स्वाद असलेली, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट अशी चविष्ट कढी गप्पा मारत मारत, घुटके घेत घेत, नणंदबाईंचं कौतुक करत सगळेजण पितात.


माझ्या नणंदबाई आज ऐंशीच्या पुढे असूनही अजून सुंठ उगाळून कढी करण्याचा त्यांना उत्साह आणि हौस आहे. सुंठीची कढी या शब्दांनाच आमच्या घरात एक वलय प्राप्त झालं आहे कारण मनाला उल्हसित करणाऱ्या अनेक रम्य आठवणी या कढीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढची अनेक वर्षं हा पदार्थ आमच्या घरचा अगदी खास असेल यात तिळमात्र संदेह नाही.

- हेमा वेलणकर, ठाणे
[email protected]

X
COMMENT