आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाते नव्याने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमलता झंवर 

१९८३ ला आजच्याइतकी संपर्काची माध्यमं नव्हती. पण त्यामुळेच सासरमधली नाती नव्यानं बहरल्याचा सुनेचा हा अनुभव...
 
लग्नानंतरच्या पहिली दिवाळी म्हणून मी खूप उत्साहात होते. दिवाळीची जोरदार तयारी सुरू होती. दिवाळीदिवशी पहाटे उठून रांगोळी, उटण्याच्या अंघोळी, देवाचे पूजन करण्याची गडबड सुरू होती. कामं करताना माझ्या सासूबाईंच्या, नणंदेच्या सूचना सुरू होत्या. त्या मला आमच्या घरातील पद्धती समजावून सांगत होत्या. मी गॅसवर दूध तापवायला ठेवलं होतं. दूध उतू जाईल या गडबडीत मी पटकन ते खाली उतरवत होते तोपर्यंत दूध माझ्या डाव्या पायांवर सांडले. दूध उकळलेलं असल्यामुळं मला खूप भाजलं. ते बघून पटकन माझ्या नणंदेने दिरांना रिक्षा आणायला सांगितली तर सासूबाईंनी स्वयंपाकचा ताबा घेतला. माझ्या उजव्या पायाला पोलिओ असल्यामुळे नेहमी मला कॅलिपर घालावे लागते. त्याशिवाय चालताच येत नाही. उजव्या पायाला पोलिओ आणि डाव्या पायाला भाजल्यामुळे मला नीट चालताच येत नव्हतं. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी औषधोपचार केले. पण या घटनेमुळे दिवाळीची मजाच निघून गेली. ३६ वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा काय घरोघरी फोन नव्हता, लगेच माहेरी फोन करून सांगण्याची काही सोय नव्हती. पण माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नणंदेनी माझी इतकी काळजी घेतली की मला घरी कळवण्याची गरजही वाटली नाही. त्यानंतर भाऊबिजेच्या दिवशी भाऊ घरी आला. माझा पाय भाजलेला बघून त्याला धक्काच बसला. तो मला घरी संगमनेरला घेऊन जातो, असा आग्रह करू लागला. पण माझ्या पतीने आणि सासूबाईंनी स्पष्ट नकार दिला. आम्ही काळजी घेऊ, पण हिला इथंच राहू द्या, असं माझ्या भावाला समजावून सांगितलं. घरातील सर्वांनीच माझ्या पायासोबतच माझ्या मनाचीही खूप काळजी घेतली. सासूबाईंवर कामाचा ताण येतोय हे बघून मला अस्वस्थ व्हायचं. त्या काळात फोन नव्हते हेच बरं होतं, नाहीतर फोनमुळे सगळ्यांना समजलं असतं. सतत फोनवर चौकशी सुरू झाली असती. या धांदलीत जे आमचे नव्याने नाते बहरले ते कदाचित बहरले नसते. दर दिवाळीला जेव्हा ही आठवण होते त्या वेळी मन भरून येते.

लेखिकेचा संपर्क : ९९२२०३०५५५