आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या का बघायला हवा रणवीर सिंह आणि सारा अली खानचा ‘सिम्बा’, अॅक्शन इमोशनचा आहे दमदार ड्रामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जबरदस्त अॅक्शन, दमदार इमोशन्स आणि ढासू गाणी असलेला ‘सिम्बा’ प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा तर बॉक्स ऑफीसवर कमाई करणारा आहे. रोहित शेट्टीच्या गोलमाल, ऑल द बेस्ट, सिंघम या सर्वच चित्रपटांचं मिश्रण यामध्ये आहे. रणवीर सिंगने सिनेमा एकहाती खेचला आहे, यात शंका नाही मात्र शेवटी अजय देवगणचा सिंघम पंच खास ठरतो. 

 

रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे कॉमेडी आणि अॅक्शनच जबरदस्त मिश्रण आहे, हे त्याच्या सर्वच चित्रपटांतून सिद्ध झाले आहे. सिंघम सिरिजमध्ये एक स्वाभिमानी आणि कर्तबगार पोलिस त्याने भेटीला आणला होता. पण, सिंबा या आदर्श चित्राबाहेरचा आहे. आजच्या काळाशी सुसंगत असलेला चिरीमिरी करणारा पोलिस एका बलात्काराच्या घटनेने हादरतो, अन् मग त्याचे बदललेले रुप हवेची दिशाच बदलून टाकतो. 


सिंघममधील जयकांत शिक्रेला मात्र प्रेक्षक याठिकाणी मिस करतात. कारण, नायक जितक्या ताकदीचा असेल त्याच तोडीचा खलनायक असेल तर चित्रपटाचा समतोल साधला जातो. यामध्ये सोनू सूदने निभावलेला दूर्वा रानडे काहीसा कमजोर वाटतो. जयकांत पडद्यावर येताच जी दहशत जाणवते, ती या चित्रपटात जाणवत नाही. मराठी कलावंत आणि मराठमोळी नाव ही बाब मराठीजनांना सुखावणारी आहे. मात्र, चित्रपटातील विनोद, अॅक्शन पाहताना रोहित शेट्टीच्या आधीच्या चित्रपटात पुन्हा पुन्हा प्रेक्षक जाऊन येत राहतो. 


चित्रपटाचे संवाद ही एक दमदार बाजू आहे. लक्षात राहतील असे संवाद यामध्ये सर्वच पात्रांच्या तोंडी देण्यात आले आहेत. विशेषत: रणवीरने साधलेली संवादफेकीची टायमिंग अचूक जुळली आहे. मात्र, असे असले तरीही बाजीरावच्या मराठी लहेजातून तो अजून बाहेर पडलेला नाही, हे जाणवते. मराठीत संवादाच्या शैलीवर त्याने आणखी वेगळे प्रयोग करणे अपेक्षित होते.

 

हेराफेरीतील बाबुभाईच्या शैलीतील संवादही त्याने उत्तमपणे केले. चित्रपटात रिमिक्स केलेले ‘आँख मारे ओ लडकी आँख मारे’ हे गाणे खूपच छान जमले आहे. यापुर्वी माधुरी दिक्षितच्या सुपरहिट ‘एक दो तीन’ तर बॉम्बेचे ‘हम्मा हम्मा’ या गाण्यांचे रिमिक्स झाले, मात्र ते पसंतीस उतरले नाहीत. त्यावर जबरदस्त टिका झाली. ऑंख मारे गाण्यात अर्शद वारसीला पुन्हा पाहणे खूपच सुखद अनुभव आहे. याशिवाय गाेलमालची पुर्ण टिम नव्याने यामध्ये दिसते. एकूणच फुल टू धमाल यामध्ये पहायला मिळते.  पण, अॅक्शन आणि डान्स कोरिओग्राफी अफलातून आहे. चित्रपटाचा पहिला भाग निव्वळ विनोदी आहे, मात्र नंतर तो रटाळ वाटतो. तर मध्यांतरानंतरचा भाग खिळवून ठेवतो. त्यात बाजीराव सिंघमची एन्ट्री विशेष दाद मिळवून जाते. अगदी शेवटच्या काही सेकंदात अक्षय कुमारची एन्ट्रीही खासच ठरते. रणवीरच्या साथीने चित्रपटातील तरुणाईही गाण्यांवर ताल धरते हे अनेक वर्षांनी चित्रपटगृहात पाहायला मिळते. चाहता वर्गाला सुखावणारा सिंबा पुन्हा एकदा सर्वांवर मोहिनी घालतो. 

 

कथा : 

संग्राम भालेराव(सिम्बा) या प्रचंड भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी गोव्याच्या मिरामार पोलिस ठाण्यात येतो. याठिकाणचा दादा असलेला दुर्गा रानडे (सोनू सूद) याच्याशी सुतही जुळवून घेतो. विनोदी आणि हलके फुलके आयुष्य जगणारा सिम्बा सर्वांना आपलेसे करतो. अनाथ मुलांना रात्रीची शाळा घेऊन शिक्षण देणाऱ्या आकृतीला बहीण मानतो. दुर्गाचे भाऊ या शाळेतील मुलांकडून ड्रग्जचेने आण करुन घेतात. एकदा ही बाब आकृती पकडते. तेव्हा दुर्गाचे भाऊ सदा आणि गिरी तिचा बलात्कार करतात आणि तिला मारुन टाकतात. या घटनेने सिम्बा पुर्णपणे हालून जातो. अन् त्यामधील सिंघम जागा होतो. पुढे चित्रपट सिनेस्टाईल कलाटणी घेतो. 

 

दिग्दर्शन :
रोहित शेट्टीने दिग्दर्शन चांगलेच केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा बरी आहे. पण, संवाद उत्तम असल्याने प्रेक्षकांशी सहज नाते जोडले जाते. रोहित शेट्टीच्या चित्रपटात गाड्या हवेत उडण्याचे दृष्य खास अपेक्षित असते. पण, या चित्रपटात ते नसल्याने प्रेक्षक निराश होऊ शकतात. दिग्दर्शन अचूक झाले आहे. प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताचा उत्तम वापर यामध्ये केलेला आहे. व्यक्तीरेखांच्या मनातील भाव प्रकाशयोजनेच्या कौशल्याने अधिक खुलवण्याचे कौशल्य एका मुरलेल्या दिग्दर्शकात असते, ते यात दिसते. चित्रपट दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे वाक्य रोहितचा चित्रपट पाहताना अनुभवायला येते.  

 

अभिनय : 
रणवीर सिंग खऱ्या आयुष्यात जसा धमाल आहे तसाच तो या चित्रपटात वावरताना दिसतो. त्याने भ्रष्ट अधिकारी आणि तडफदार कर्तबगार पोलिस अधिकारी ताकदीने निभावले आहेत. मराठी माणूस त्याने जीवंत केला आहे. अजय देवगणची छोटीच पण खूप महत्त्वाची भूमिका चित्रपटात रंग भरते. अजयचा अभिनयही क्लिक करतो. तर सारा अलीखानने तिच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. वैदेही, आशुतोष, सिद्धार्थ यांची कामेही साजेशी झाली आहेत. 

 

संगीत : 
'आला रे आला सिम्बा' हे धमाल गाणे आणि त्यावरील एकदम बिनधास्त डान्स हा छान अनुभव आहे. तर 'आँख मारे ओ लडकी आँख मारे 'गाणेही उत्तमच झाले आहे. याशिवाय ‘तेरे बीन’ हे हलके फलके गाणे चांदनीतील श्रीदेवी ऋषीकपूर तसेच डिडीएलजेतील काजोल शाहरुखची आठवण करुन देणारे आहे. 

बातम्या आणखी आहेत...