Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Hero Santosh Trophy National Football Tournament

मध्य प्रदेशची विजयी सलामी; यजमान महाराष्ट्र अाज मैदानावर 

अजित संगवे | Update - Feb 08, 2019, 10:24 AM IST

संतोष ट्रॉफी फुटबॉल : दमण-दीव संघाने रंगतदार सामन्यात बलाढ्य गोव्याला शून्य गाेलने बराेबरीत राेखले; स्पर्धेत पहिला ड्रॉ

 • Hero Santosh Trophy National Football Tournament

  सोलापूर - हीरो संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेशने लक्षद्वीपला एका गोलने नमवून विजयी सलामी दिली. नवोदित दमण-दीव संघाने माजी विजेत्या गोव्याला गोलशून्य बरोबरीत रोखण्याची किमया केली. सोलापूर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनमार्फत इंदिरा गांधी स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. यजमान महाराष्ट्राचा संघ अाज शुक्रवारी अापल्या माेहिमेला सुरुवात करणार अाहे. यासाठी महाराष्ट्राचा पहिला सामना गुजरातशी हाेईल.

  गुरुवारी सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात अनपेक्षितपणे नवख्या दमण आणि दीवने माजी विजेत्या गोव्याला गोलशून्य बरोबरीत रोखून पराक्रम केला. सुरुवातीपासून गोवा संघाने सफाईदार खेळ करण्यावर भर दिला. गोव्याच्या कपिल उबाळेने मारलेला जोरदार फटका दमणचा गोलरक्षक हुसेनने उत्कृष्टरीत्या रोखून संघावरचे संकट दूर केले. पाठोपाठ दमणच्या अंकुर राय आणि निर्मल छेत्री यांनी दिशाहीन फटके मारून खाते उघडण्याची संधी दवडली. दमणने संधी मिळालीच तर आक्रमण, अन्यथा सावध खेळ हे धोरण अवलंबवले. त्यामुळे पूर्वार्ध गोलशून्य असाच राहिला.

  तुल्यबळ गोव्याला मध्यंतरापर्यंत बरोबरीत रोखल्याने विश्वास दुणावलेल्या दमण आणि दीवने उत्तरार्धात चिवट बचावाचे धोरण ठेवत केवळ एखादा आघाडीपटू गोव्याचा गोलक्षेत्रात ठेवून उर्वरित दहा खेळाडूंनी बचावासाठी सर्वस्व पणाला लावले. गोव्याचा कर्णधार जेसेल करनरोने दमणच्या दोन बचावपटूंना चकवून आपल्या सहकाऱ्याला अचूक पास देण्यात अपयशी ठरल्याने चाल अयशस्वी ठरली. दमणचा बदली खेळाडू सुहेलने चेंडू हेडद्वारे उत्कृष्टपणे क्लियर करून गोव्याच्या अडचणीत भर टाकली. स्ट्रायकर लालमपुतियाला दमणच्या बचावपटूने पाडल्याने पंचाने दिलेल्या फ्री किकचा गोव्याला फायदा उठवता आला नाही. सामना जसजसा समारोपाच्या जवळ येऊ लागला. त्याचा गोव्याच्या खेळाडूंवरील दबाव वाढत गेला आणि दमणने चेंडू टोलवाटोलवी करून निर्णायक गोलपासून दूरच ठेवण्यात यश मिळवले.

  दुपारच्या सत्रातील कंटाळवाण्या सामन्यात मध्य प्रदेशने लक्षद्वीपला १-० असे नमवून विजयी सलामी दिली. लक्षद्वीपच्या तुलनेत मध्य प्रदेशने सुरुवातीपासून सूत्रबद्ध खेळावर भर दिला. मध्य प्रदेशच्या मणिपुरी उत्तम शिंगणेने मारलेला चांगला फटका गोलखांबावरून गेला. मध्य प्रदेशच्या बचावपटूच्या हाताला चेंडू लागल्याने पंच दिवाकरकुमार यांनी लक्षद्वीपला पेनल्टी बहाल केली. परंतु लक्षद्वीपचा अब्दुल नाजरणेने चेंडू थेट मध्य प्रदेशचा गोलरक्षक अभिजित राॅयच्या हातात मारून गोल करण्याची सुवर्ण संधी गमावली. पुण्यात मध्य प्रदेशने चेंडूवर ताबा ठेवत लहान पासेद्वारे खेळावर नियंत्रण ठेवले. मध्यंतरात काही मिनिटे शिल्लक असताना मध्य प्रदेशच्या अजय पुरियाने मारलेला चांगला फटका लक्षद्वीपचा गोलरक्षक मोहंमदने ड्राइव्ह मारून चेंडू बाहेर काढला.

  उत्तरार्धात मध्य प्रदेश संघानेच वर्चस्व राखले. या संघाच्या आशुतोष मालवीने मारलेली फ्री किक लक्षवेधी ठरली. लक्षद्वीपचा आमिर सोहेलने ४९ व्या मिनिटाला मिळालेली संधी बेजबाबदार फटका मारून वाया घालवली. यानंतर मध्य प्रदेशच्या बराॅन कश्यपने बगलेतून टाकलेल्या क्रॉसपासवर यश लालला हेडद्वारे चेंडू गोल जाळ्यात मारण्यात अपयश आले.

  तुल्यबळ गोव्याला मध्यंतरापर्यंत बरोबरीत रोखल्याने दीव-दमणचा विश्वास द्विगुणित
  महाराष्ट्राचा आज सामना
  सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र विरुद्ध गुजरात
  दुपारी तीन वाजता राजस्थान विरुद्ध दादरा नगर हवेली

  युवांकडून अाशा
  गुजरातविरुद्ध लढतीत यजमान महाराष्ट्र संघाला अापल्या युवा खेळाडूंकडून माेठी अाशा अाहे. यात अाेंकारसह राहुल अाणि विकी दातेचा समावेश अाहे.

Trending