आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार बँक घोटाळा : अजित पवारांसह ५० हून अधिक सर्वपक्षीय दिग्गज नेते गोत्यात; पाच दिवसांत गुन्हे नोंदवण्याचे हायकोर्टाचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना दिले. त्यामुळे बँकेचे संचालक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आनंदराव अडसूळ, हसन मुश्रीफ, शिवाजीराव नलावडे, विजयसिंह मोहिते पाटील आदींसह ५० हून अधिक सर्वपक्षीय नेते अडचणीत सापडले आहेत. 

राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांची कर्जे नियमबाह्यपणे वितरित केली होती. या नेत्यांनी आपल्या मर्जीतील संस्था व व्यक्तींना नियमबाह्यपणे कर्जे दिल्याने बँक अडचणीत सापडली होती. तसेच त्यावर प्रशासक नेमणे रिझर्व्ह बँकेला भाग पडले होते. यासंदर्भात नाबार्ड, सहकार व साखर आयुक्त, कॅग इत्यादींचे अहवाल असूनही कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असा आरोप एका याचिकेद्वारे करण्यात आला होता. 
 

उच्च न्यायालयाने विचारला होता जाब...
माहिती अधिकार कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती.  यासंदर्भात  मुंबई पोलिसांनी  सहा महिन्याँपूर्वी अरोरा यांचा जबाब नोंदवून घेतला होता. मात्र, त्यानंतर कोणतीच कार्यवाही केली नव्हती.याबाबत उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला जाब विचारला होता. अरोरा यांच्या तक्रारीत तथ्य आढळले नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असे उत्तर आर्थिक गुन्हे शाखेने तेव्हा दिले होते.
 

काय आहे घोटाळा
१ २००५ ते २०१० मध्ये म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या या कर्जवाटप प्रकरणांमध्ये कर्जवसुली चुकवण्यात आली होती.  

२ २००५ ते २०१० या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या बहुतेक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्ज दिले. 

३ राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्यांसह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचे वाटप झाले होते.

४ २००७ ते २०११ दरम्यान झालेल्या या गैरव्यवहारांमुळे बँकेला १ हजार कोटींहून अधिक रकमेचा फटका बसल्याचा आरोप याचिकेत आहे. 

५ अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. 

६ बँकेचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण या नेत्यांनी स्वतःच्या संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत फायदा घेतला. 
 

या तत्कालीन संचालकांवर गैरव्यवहाराचा ठपका
अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीपराव देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, मधुकरराव चव्हाण, विजय वडेट्टीवार, दिलीप सोपल, अमरसिंह पंडित, सदाशिवराव मंडलिक, यशवंतराव गडाख, प्रसाद तनपुरे, तानाजी चोरगे, पृथ्वीराज देशमुख, आनंदराव अडसूळ, संतोषकुमार कोरपे, रजनी पाटील, जयंत पी. पाटील, मीनाक्षी पाटील (शेकाप), कै. पांडुरंग फुंडकर, ईश्वरलाल जैन, गंगाधर कुंटूरकर, रामप्रसाद बाेर्डीकर, राहुल माेटे, माणिकराव पाटील, माणिकराव काेकाटे, नितीन पाटील, शिवाजीराव नलावडे इत्यादी नेत्यांवर या प्रकरणात आरोप आहेत. 

बातम्या आणखी आहेत...