आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोकरीचे आमिष दाखवून उच्चशिक्षित बेरोजगाराची 10 लाखांची फसवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- जोगेश्वरी तालुका गंगापूर येथील सिद्धिविनायक शिक्षण संस्था संचालित, विनायक माध्यमिक विद्यालय या संस्थेचे सचिव बालचंद देवराव देवकते यांनी उच्चशिक्षित गौतम देवराव साळवे (३२, रा. न्यू लक्ष्मी कॉलनी, औरंगाबाद) या बेरोजगार तरुणाला आपल्या शाळेवर लिपिक पदाकरिता नोकरी देण्याचे आमिष दाखवत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव (रा. सिडको वाळूज महानगर-१) यांच्या मध्यस्थीने १० लाख रुपये नोकरीकरिता घेऊन नोकरी न देता फसवणूक केल्याची फिर्याद वाळूज एमआयडीसी पोलिसांत गौतम साळवेने २ जानेवारी रोजी सायंकाळी दिली आहे. 

 

उल्लेखनीय बाब अशी की, याच लिपिक पदाच्या जागेसाठी यापूर्वीसुद्धा संबंधित संस्थेकडून काचोळे नावाच्या व्यक्तीची फसवणूक केली असून सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुन्हा त्याच पदाकरिता दुसऱ्या एका बेरोजगार तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने शिक्षण क्षेत्रात तसेच बेरोजगारांमध्ये संस्थाचालक व व्यवस्थापन यांच्याविरोधात राग व्यक्त होत आहे. 

 

औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या सिद्धिविनायक शिक्षण संस्था संचालित, विनायक माध्यमिक विद्यालयातील लिपिक पदाकरिता रिक्त असणाऱ्या जागेवर एमबीए, डीआरएम असे उच्च शिक्षण घेतलेल्या गौतमकरिता नोकरी मिळवण्यासाठी गौतमच्या वडिलांनी त्यांच्या परिचित असणाऱ्या अनिलकुमार सकदेव (विस्तार अधिकारी, माध्यमिक विभाग औरंगाबाद) यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ओळखीने सिद्धिविनायक शिक्षण संस्थेचे सचिव बालचंद देवराव देवकते यांच्याशी संपर्क साधला. 

 

जून २०१६ मध्ये अनिलकुमार सकदेव यांच्या सिडको वाळूज महानगर-१ येथील घरी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या भेटीमध्ये नोकरी मिळण्यासाठी देवकते यांनी मागणी केल्याप्रमाणे लिपिक पदाच्या रिक्त जागेसाठी जुलै २०१६ मध्ये गौतमच्या वडिलांच्या खात्यावर सेवानिवृत्तीचे जमा झालेले पैसे काढून अनिलकुमार सकदेव यांच्या सिडको येथील घरी शाळेचे मुख्याध्यापक अतुल बल्लाळ यांच्या समक्ष बालचंद देवकते यांना रोख स्वरूपात १० लाख रुपये देण्यात आले. दरम्यान, देवकते यांनी गौतमला त्यांच्या विनायक माध्यमिक शाळेवर लिपिक पदावर नोकरी देत असल्याचा शिक्का व सही असणारे नेमणुकीचे पत्र दिले. मात्र, नेमणूक आदेशावर त्यांनी मागील २० मार्च सन २०१४ अशी तारीख नमूद केली. 


दरम्यान, १ ऑगस्ट २०१६ ते डिसेंबर २०१६ पर्यंत गौतमने सदरील शाळेवर लिपिक या पदावर काम केले. त्यानंतर गौतमने शाळेचे सचिव देवकते यांच्याकडे पगाराबाबत व जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक मान्यता अॅप्रूव्हलबाबत वेळोवेळी विचारणा केली असता सचिवांकडून टाळाटाळ होत असे. 

 

तरुणाची फसवणूक 
संबंधित संस्थेकडून यापूर्वीसुद्धा याच लिपिक पदाकरिता नेमणूक करण्याच्या उद्देशाने काचोळे नावाच्या एका बेरोजगार तरुणाला नोकरी देऊन त्याचीसुद्धा फसवणूक केल्याचे तसेच हा वाद सध्या न्यायालयात सुरू असल्याचे गौतमच्या डिसेंबर २०१६ मध्ये निदर्शनास आले. 

 

नेमणूक लिपिकाची, नोकरी शिपायाची 
सचिवाकडून फसवणूक झालेल्याचे निदर्शनास येताच गौतमने याबाबत सचिवाला जाब विचारला असता, सचिव देवकते यांनी सांगितले की, तुझ्या नियुक्तीच्या पूर्वीच काचोळे नावाच्या व्यक्तीची लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आलेली होती. त्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्या दरम्यान तुला शिपाई म्हणून काम करावे लागेल. मात्र, हा प्रस्ताव गौतमने अमान्य केला. दरम्यान, त्याला सचिव देवकते यांनी मार्च २०१७ मध्ये १० लाख रुपयांचा चेक दिला. मात्र, तो चेक बाउन्स झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इतर सर्व मार्ग अवलंबून अखेर गौतमने २ जानेवारी रोजी पोलिसांत धाव घेत संबंधित सचिव देवकतेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार माणिक चौधरी करत आहेत.